मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने

163 वचने · 41 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला रानात चाळीस वर्षात कसे चालविले, त्यांनी तुम्हाला कसे नम्र केले व तुमची परीक्षा कशी पाहिली, याची तुम्ही आठवण करा. तुमच्या अंतःकरणात काय होते, तुम्ही त्यांच्या आज्ञा पाळणार की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी असे केले.

  2. विषारी सापाचा आणि विंचवांचा धोका असलेल्या अफाट व भयानक रानातून व उष्ण आणि कोरड्या भूमीतून त्यांनी तुम्हाला आणले. शुष्क भूमीत खडक फोडून तुम्हाला पाणी दिले.

  3. परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे स्मरण ठेवा, कारण संपत्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ तेच तुम्हाला पुरवितात, आणि आजच्या प्रमाणेच ते तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेल्या कराराची पुष्टी करतात.

  4. “सकाळी तुम्ही तुमच्या गोत्राप्रमाणे याहवेहसमोर उपस्थित व्हावे. जे गोत्र याहवेह निवडतील त्यांनी त्यांच्या कुळाप्रमाणे पुढे यावे; ज्या कुळाची याहवेह निवड करतील, त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रमाणे पुढे यावे; आणि ज्या कुटुंबाची याहवेह निवड करतील त्यातील प्रत्येक पुरुषाने पुढे यावे.

  5. याहवेहने इस्राएली लोकांना दिलेली जी चांगली अभिवचने होती त्यातील एकही निष्फळ झाले नाही; त्यातील प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले.

  6. गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात; ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात.

  7. ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात; ते त्यांना राजपुत्रांबरोबर बसवितात, आणि त्यांना वतन म्हणून सन्मानाचे आसन प्राप्त होते. “कारण पृथ्वीचा पाया याहवेहचा आहे; त्यावरच त्यांनी जग स्थापले आहे.

  8. “तर आता एक नवीन गाडी तयार करा व दोन दुभत्या गाई ज्यांच्या मानेवर कधीही जू ठेवलेले नाही घेऊन त्यांना त्यास जुंपा, परंतु त्यांची वासरे त्यांच्यापासून काढून त्यांना गोठ्यात ठेवा.

  9. याहवेहचा कोश घ्या आणि तो त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही पाठवित आहात त्या एका पेटीत ठेवून त्या कोशाजवळ ठेवा व त्या गाडीला पाठवून द्या,

  10. परंतु त्याच्यावर लक्ष ठेवा. जर ते आपली सीमा बेथ-शेमेशपर्यंत गेले तर याहवेहने हे मोठे संकट आपल्यावर आणले आहे. परंतु जर ते तसे गेले नाहीत, तर याहवेहच्या हाताने आम्हाला मारले नाही परंतु ते योगायोगाने घडून आले आहे.”

  11. तेव्हा त्यांनी हे केले. त्यांनी तशा दोन दुभत्या गाई घेतल्या आणि त्यांना गाडीला जुंपले आणि त्यांच्या वासरांना गोठ्यामध्ये ठेवले.

  12. तेव्हा त्या गाई सरळ बेथ-शेमेशच्या रस्त्याने निघाल्या आणि जाताना संपूर्ण रस्त्यावर त्या हंबरत गेल्या; त्या उजवीकडे किंवा डावीकडे वळल्या नाहीत. पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले.

  13. दावीद फार संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावी असे तेथील माणसे बोलत होती; आपआपली मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या हृदयात अतिशय कटुत्वाने भरले होते, परंतु दावीदाला याहवेह त्याचा परमेश्वर यांच्यामध्ये शक्ती प्राप्त झाली.

  14. तेव्हा अबशालोम आणि सर्व इस्राएली लोक म्हणाले, “हूशाई अर्कीचा सल्ला अहीथोफेलच्या सल्ल्यापेक्षा अधिक बरा आहे.” कारण अबशालोमवर अरिष्ट आणावे म्हणून अहीथोफेलचा चांगला सल्ला विफल करण्याची याहवेहने योजना केली होती.

  15. हूशाईने सादोक आणि अबीयाथार याजकांना सांगितले, “अहीथोफेलने अबशालोम आणि इस्राएलच्या वडीलजनास अमुक करण्याचा सल्ला दिला होता, परंतु मी त्यांना असे करण्याचा सल्ला दिला आहे.

  16. त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू एका मनुष्याचा खून करून त्याची मालमत्ता ताब्यात घेतली नाही काय?’ तेव्हा त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथचे रक्त चाटले, त्याच ठिकाणी कुत्रे तुझे रक्त; होय, तुझेच रक्त चाटतील!’ ”

  17. इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “मी वेश बदलून युद्धात प्रवेश करेन, परंतु तुम्ही तुमची राजवस्त्रे घाला.” म्हणून इस्राएलच्या राजा वेश बदलून युद्धात गेला.

  18. पण कोणीतरी सहजच आपला बाण सोडला आणि तो जाऊन इस्राएलच्या राजाच्या चिलखतामधून गेला. राजाने आपल्या रथस्वाराला सांगितले, “रथ मागे फिरव आणि मला युद्धातून बाहेर काढ कारण मी घायाळ झालो आहे.”

  19. राजा मरण पावला आणि त्याला शोमरोनात आणले व तिथे त्याला पुरण्यात आले.

  20. शोमरोनाच्या तळ्याकडे (जिथे वेश्या आंघोळ करीत असत), आणि याहवेहच्या वचनानुसार कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले.

  21. श्रीमंती व सन्मान तुमच्याकडूनच येतात; तुम्ही सर्व गोष्टीचे शासक आहात. सर्वांना मोठेपणा व सामर्थ्य देण्याकरिता केवळ तुमच्याच बाहूत सामर्थ्य आणि अधिकार आहे.

  22. केवळ तुम्हीच एकटे याहवेह आहात. तुम्ही आकाश, अत्युच्च स्वर्ग व त्यातील सर्व तारकामंडल, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. तुम्ही सर्वांना जीवन देता आणि स्वर्गातील असंख्य सेना तुमची आराधना करतात.

  23. आणि म्हणाला: “आईच्या उदरातून मी नग्न आलो, आणि नग्नच मी परत जाईन, याहवेहने दिले आणि याहवेहने परत घेतले; त्या याहवेहचे नाव धन्यवादित असो.”

  24. त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे प्रकाश व अंधकारासाठीही सीमा आखून दिल्या आहेत.

  25. त्यांच्या भवनामधून तुफान येते, आणि वादळी वार्‍यातून थंडी येते.