मुख्य मजकुरावर जा

Holy Land बद्दल बायबलमधील वचने

108 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे की वाईट आहे? कोणत्या प्रकारच्या नगरांमध्ये त्यांची वस्ती आहे? ते उजाड आहेत की तटबंदीची आहेत?

  2. तेथील जमीन कशी आहे? ती सुपीक आहे की नापीक? त्यात झाडे आहेत की नाही? तुम्ही परत येताना त्या देशातील काही फळे तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा कसोशीने प्रयत्न करा.” (तो प्रथमपक्व द्राक्षाच्या फळांचा हंगाम होता.)

  3. मग ते गेले आणि सीन रानापासून हमाथाच्या जवळील रहोबा पर्यंतचा देश त्यांनी हेरला.

  4. ते वरती नेगेवमधून गेले आणि हेब्रोनात आले, जिथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते. (हेब्रोन हे इजिप्त देशातील सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले गेले होते.)

  5. ते जेव्हा अष्कोल खोर्‍याजवळ आले. तिथे त्यांनी एक द्राक्षांचा घड असलेली फांदी कापून घेतली. दोन माणसांनी त्यांच्यामध्ये तो एका काठीवर घालून वाहून नेला. त्याचबरोबर त्यांनी काही डाळिंबे आणि अंजिरेही घेतली.

  6. त्या खोर्‍याचे नाव अष्कोल असे ठेवले कारण इस्राएली लोकांनी तिथून द्राक्षाचा घड कापून घेतला होता.

  7. देश हेरून चाळीस दिवसानंतर ते परत आले.

  8. पारान रानातील कादेश येथे मोशे आणि अहरोन व सर्व इस्राएली लोकांकडे ते परत आले. तिथे त्यांनी त्यांना व सर्व समुदायाला अहवाल दिला व त्या देशाची फळे दाखविली.

  9. त्यांनी मोशेला अहवाल दिला तो असा: “जो देश हेरण्यास तुम्ही आम्हाला पाठविले तिथे आम्ही गेलो, त्यात खरोखरच दूध व मध वाहतात! ही पाहा तेथील फळे.

  10. परंतु तिथे राहत असलेले लोक बलवान आहेत, त्यांची शहरे तटबंदीची व पुष्कळ मोठी आहेत. आम्ही त्या ठिकाणी अनाकाचे वंशजही पाहिले.

  11. नेगेवमध्ये अमालेकी लोक राहतात. डोंगराळ प्रदेशात हिथी, यबूसी आणि अमोरी लोक राहतात. समुद्राच्या किनार्‍यावर आणि यार्देन नदीच्या खोर्‍यात कनानी लोक राहतात.”

  12. तेव्हा मोशेसमोर कालेबाने लोकांना शांत केले व म्हणाला, “आपण वर जाऊन तो देश ताब्यात घेतला पाहिजे, कारण आपण खचितच ते करू शकतो.”

  13. परंतु जे पुरुष त्याच्याबरोबर वर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर आपण हल्ला करू शकत नाही; ते आपल्यापेक्षा बलवान आहेत.”

  14. आणि जो देश ते हेरण्यास गेले होते त्याबद्दल त्यांनी इस्राएली लोकांमध्ये वाईट अहवाल पसरविला. ते म्हणाले, “जो देश आम्ही हेरला तो देश त्यांच्या रहिवाशांना खाऊन टाकणारा आहे. जे लोक आम्ही पाहिले ते धिप्पाड आहेत.

  15. तिथे आम्ही नेफिलीम (अनाकाचे महाबलाढ्य वंशज नेफिलीम पासून आहेत) लोकांना बघितले. आमच्याच दृष्टीत आम्ही नाकतोड्याप्रमाणे होतो आणि त्यांनाही आम्ही तसेच भासलो.”

  16. याहवेह मोशेला म्हणाले,

  17. “इस्राएली लोकांस आज्ञा देऊन सांग: ‘जो देश तुम्हाला तुमचे वतन म्हणून दिला जाणार आहे त्या कनान देशात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा त्याच्या सीमा अशाप्रकारे असाव्यात:

  18. “ ‘तुमच्या दक्षिणेचा विभाग सीन रानाच्या काही भागापासून एदोमाच्या सीमेपर्यंत असावा. तुमची दक्षिणेची सीमा मृत समुद्राच्या पूर्वेच्या टोकाकडून असावी,

  19. तिथून तुमची सीमा अक्राब्बीमच्या चढावाच्या दक्षिणेस पोचून तिथून ती पुढे सीन पर्यंत जाऊन कादेश-बरनेआच्या दक्षिणेपर्यंत आणि हाजार अद्दारपर्यंत जाऊन आजमोनास पोचावी.

  20. आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल.

  21. तुमची पश्चिमेकडील सीमा भूमध्य समुद्राचा किनारा असेल. ही तुमची पश्चिम सीमा असावी.

  22. तुमच्या उत्तरेकडील सीमेसाठी भूमध्य समुद्रापासून होर पर्वतापर्यंत रेखा आखावी.

  23. आणि होर पर्वतापासून लेबो हमाथपर्यंत व तिथून ती सीमा जेदादपर्यंत न्यावी.

  24. जिफरोनपर्यंत जाऊन तिचा शेवट हाजार-एनान येथे संपेल. ही तुमची उत्तरेकडील सीमा असेल.

  25. तुमच्या पूर्वेकडील सीमेसाठी हाजार-एनानपासून शेफम पर्यंत रेखा आखावी.