मुख्य मजकुरावर जा

Saul

265 वचने · 11 कुटुंब सदस्य

Saul चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा दावीदाला समजले की, शौल त्याच्याविरुद्ध कट करीत आहे, तेव्हा तो अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आणा.”

  2. दावीद म्हणाला, “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, शौल माझ्यामुळे या कईलाह नगराचा नाश करण्यास पाहत आहे, असे तुमच्या दासाने नक्की ऐकले आहे.

  3. कईलाहचे लोक मला त्याच्या स्वाधीन करतील काय? तुमच्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल इकडे येईल काय? याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला हे सांगा.” आणि याहवेहने उत्तर दिले, “तो येईल.”

  4. पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाहचे लोक मला आणि माझ्या माणसांना शौलाच्या स्वाधीन करतील काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, ते करतील.”

  5. तेव्हा दावीद आणि त्याची सुमारे सहाशे माणसे यांनी कईलाह सोडले आणि ते ठिकठिकाणी फिरत राहिले. जेव्हा शौलाला सांगण्यात आले की, दावीद कईलाहतून निसटून गेला आहे, तो तिकडे गेला नाही.

  6. दावीद अरण्यातील गडांमध्ये आणि जीफच्या डोंगराळ प्रदेशातील रानामध्ये राहू लागला. दिवसेंदिवस शौल त्याचा शोध घेत होता, परंतु परमेश्वराने दावीदाला त्याच्या हाती दिले नाही.

  7. दावीद जीफच्या वाळवंटातील होरेश येथे असताना त्याला कळले की, शौल त्याचा प्राण घेण्यासाठी बाहेर पडला आहे.

  8. आणि शौलाचा पुत्र योनाथान होरेश येथे दावीदाकडे गेला आणि त्याने दावीदाला मदत केली व परमेश्वराठायी सबळ केले.

  9. तो म्हणाला, “भिऊ नकोस, माझा पिता शौल तुझ्यावर हात टाकणार नाही. तू इस्राएलचा राजा होशील आणि मी तुझा दुय्यम होईन, हे माझा पिता शौलसुद्धा जाणून आहे.”

  10. जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “होरेशच्या गडांमध्ये, हकीलाहच्या डोंगरात, यशीमोनच्या दक्षिणेकडे दावीद आमच्यामध्ये लपून राहत नाही काय?

  11. शौलाने उत्तर दिले, “तुम्ही माझ्यावर जी दया दाखविली त्यामुळे याहवेह तुमचे कल्याण करो.

  12. तेव्हा ते बाहेर पडले आणि शौलाच्यापुढे जीफकडे गेले. आता दावीद आणि त्याची माणसे यशीमोनच्या दक्षिणेकडील अराबाह येथे माओनच्या वाळवंटात होती.

  13. शौल आणि त्याच्या माणसांनी शोध सुरू केला आणि जेव्हा दावीदाला याबद्दल सांगण्यात आले तेव्हा तो खाली खडकाकडे गेला आणि माओनच्या वाळवंटात राहिला. जेव्हा शौलाने हे ऐकले तेव्हा तो दावीदाचा पाठलाग करीत माओनच्या वाळवंटात गेला.

  14. शौल डोंगराच्या एका बाजूने जात होता तर दावीद आणि त्याची माणसे दुसर्‍या बाजूला होती, शौलापासून दूर जाण्याची ते घाई करत होते. कारण शौल आणि त्याचे सैनिक दावीद व त्याच्या माणसांना पकडण्यास जवळ येत होते,

  15. एक संदेशवाहक शौलाकडे आला, व म्हणाला, “लवकर या! पलिष्ट्यांनी देशावर हल्ला केला आहे.”

  16. तेव्हा शौलाने दावीदाचा पाठलाग करण्याचे सोडून दिले आणि तो पलिष्ट्यांशी लढण्यास गेला. याच कारणामुळे या ठिकाणाला सेला-हम्माहलेकोथ असे म्हटले जाते.

  17. पलिष्ट्यांचा पाठलाग करून परत आल्यानंतर शौलाला सांगण्यात आले, “दावीद एन-गेदीच्या वाळवंटात आहे.”

  18. तेव्हा शौलाने सर्व इस्राएलमधून सक्षम असलेले तीन हजार तरुण पुरुष घेतले आणि ते दावीदाचा व त्याच्या माणसांचा शोध करण्यासाठी रानबकर्‍यांच्या खडकाळ भागात गेले.

  19. रस्त्याने फिरत तो मेंढवाड्याच्या जवळ आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दिशेस गेला, दावीद आणि त्याची माणसेही त्या गुहेत अगदी लांब आतील बाजूस होती.

  20. दावीदाची माणसे म्हणाली, “हाच तो दिवस आहे, ज्याविषयी याहवेहने तुम्हाला सांगितले होते, ‘मी तुझ्या शत्रूला तुझ्या हाती देईन तेव्हा तुला वाटेल तसे तू त्याचे कर.’ ” तेव्हा दावीदाने हळूवारपणे सरकत जाऊन शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतला.

  21. त्यानंतर शौलाच्या झग्याचा काठ आपण कापला म्हणून दावीदाचे मन त्याला टोचू लागले.

  22. या शब्दांनी दावीदाने त्याच्या माणसांचा कडकपणे निषेध केला आणि शौलावर हल्ला करण्यास आवरले. तेव्हा शौल गुहेतून बाहेर निघून आपल्या मार्गाने गेला.

  23. नंतर दावीद गुहेच्या बाहेर आला आणि शौलाला हाक मारली, “महाराज, माझ्या धन्या!” जेव्हा शौलाने मागे पाहिले, तेव्हा दावीदाने भूमीकडे आपले तोंड करून दंडवत घातले.

  24. तो शौलाला म्हणाला, “तुम्ही लोकांचे का ऐकता, जेव्हा ते म्हणतात, ‘दावीद तुला इजा करण्यास पाहत आहे’?

  25. जेव्हा दावीदाने त्याचे हे बोलणे संपविले तेव्हा शौलाने विचारले, “दावीदा, माझ्या पुत्रा, हा तुझाच आवाज आहे काय?” आणि शौल मोठ्याने रडला,