Skip to content

The First Temple बद्दल बायबलमधील वचने

365 वचने · 72 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता मी या उद्देशाने इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्याशी एक करार करतो की, जेणेकरून त्यांचा भयंकर क्रोध आपल्यापासून दूर होईल.

  2. माझ्या मुलांनो, आता निष्काळजी राहू नका, कारण याहवेहनी तुम्हाला त्यांच्यासमोर उभे राहण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचे सेवक होण्यासाठी आणि धूप जाळण्यासाठी निवडले आहे.”

  3. तेव्हा या लेवीय लोकांनी कामास सुरुवात केली: कोहाथी वंशातील: अमासय याचा पुत्र महथ आणि अजऱ्याह याचा पुत्र योएल; मरारी वंशातील: अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजर्‍याह; गेर्षोनी वंशातील: जिम्माहचा पुत्र योवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन;

  4. एलीजाफानच्या वंशातील: शिम्री आणि ईयेल; आसाफाच्या वंशातील: जखर्‍याह आणि मत्तन्याह;

  5. हेमानच्या वंशातील: यहीएल आणि शिमी; यदूथूनच्या वंशातील: शमायाह आणि उज्जीएल.

  6. जेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या लेवींना एकत्र जमविले आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले, तेव्हा ते याहवेहच्या वचनाचे पालन करून, राजाज्ञेनुसार याहवेहच्या मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी मंदिरात गेले.

  7. याजक याहवेहच्या पवित्रस्थानात त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आत गेले. त्यांना याहवेहच्या मंदिरात जे काही अशुद्ध सापडले ते सर्व त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या अंगणात आणले. लेव्यांनी ते घेतले आणि किद्रोन खोऱ्याकडे नेऊन फेकले.

  8. पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी शुद्धीकरण सुरू केले आणि पहिल्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते याहवेहच्या मंदिराजवळ पोहोचले. आणखी आठ दिवस त्यांनी पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी काम पूर्ण करून याहवेहचे मंदिर पवित्र केले.

  9. मग ते हिज्कीयाह राजाकडे गेले आणि त्यांनी अहवाल दिला: “आम्ही याहवेहचे संपूर्ण मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यातील सर्व भांडी आणि पवित्र भाकर ठेवण्यासाठी असलेला मेज, त्याच्या सर्व वस्तू शुद्ध केल्या आहेत.

  10. राजा आहाज राजा असताना त्यांच्या अविश्वासूपणामध्ये त्यांनी काढून टाकलेल्या सर्व वस्तू आम्ही तयार केल्या आहेत आणि पवित्र केल्या आहेत. त्या सर्व वस्तू आता याहवेहच्या वेदीसमोर आहेत.”

  11. दुसऱ्याच दिवशी पहाटेच्या वेळेस राजा हिज्कीयाहने शहरातील अधिकाऱ्यांना एकत्र केले आणि तो याहवेहच्या मंदिरात गेला.

  12. त्यांनी सात गोर्‍हे, सात मेंढे, सात नरकोकरे आणि सात बोकडे हे राष्ट्राच्या पापार्पणासाठी, पवित्रस्थानासाठी आणि यहूदीयासाठी आणले. राजाने याजकांना, अहरोनाच्या वंशजांना हे सर्व याहवेहच्या वेदीवर अर्पण करण्यास सांगितले.

  13. तेव्हा त्यांनी गोर्‍ह्यांचा वध केला आणि याजकांनी रक्त घेऊन वेदीवर शिंपडले; नंतर त्यांनी मेंढ्यांची कत्तल केली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. त्यानंतर त्यांनी कोकऱ्यांचा वध केला आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले.

  14. पापार्पणासाठी असलेले बोकड राजा आणि जमलेल्या मंडळीसमोर आणले आणि त्यांनी त्यांचे हात त्यांच्यावर ठेवले.

  15. याजकांनी नंतर बोकडांचा वध केला आणि त्यांचे रक्त सर्व इस्राएलसाठी प्रायश्चिताचे पापार्पण म्हणून वेदीवर अर्पण केले, कारण राजाने सर्व इस्राएलसाठी होमार्पण आणि पापार्पण करण्याची आज्ञा दिली होती.

  16. दावीद राजा, राजाचा संदेष्टा गाद आणि नाथान संदेष्ट्यांनी सांगितल्याप्रमाणे झांजा, वीणा आणि तंतुवाद्ये घेऊन त्याने लेवींना याहवेहच्या मंदिरात ठेवले; अशी आज्ञा याहवेहनी त्यांच्या संदेष्ट्यांद्वारे दिली होती.

  17. म्हणून लेवीय लोक दावीदाची वाद्ये आणि याजक तुतारी घेऊन तयार उभे राहिले.

  18. हिज्कीयाहने वेदीवर बलिदानांचे होमार्पण करण्याची आज्ञा दिली. अर्पण सुरू झाले तेव्हाच इस्राएलचा राजा दावीदाची वाद्ये आणि कर्ण्यांसह याहवेहसाठी गीते गाण्यास सुरुवात झाली.

  19. जमलेल्या संपूर्ण सभेतील लोकांनी वाकून आराधना केली, त्यावेळेस वादक वाद्य आणि कर्णे वाजवित होते. बलिदानांचे होमार्पण पूर्ण होईपर्यंत हे सर्व सुरू होते.

  20. जेव्हा अर्पणे करण्याचे संपले, तेव्हा राजा आणि त्याच्याबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येकजणांनी गुडघे टेकले आणि आराधना केली.

  21. राजा हिज्कीयाह आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी लेवींना दावीद आणि संदेष्टा आसाफ यांच्या शब्दांमध्ये याहवेहची स्तुती करण्याचा आदेश दिला. म्हणून त्यांनी आनंदाने स्तुतिगीते गायली आणि खाली वाकून आराधना केली.

  22. तेव्हा हिज्कीयाह म्हणाला, “तुम्ही आता स्वतःला याहवेहना समर्पित केले आहे. या आणि याहवेहच्या मंदिरात बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणा.” म्हणून जमलेल्या लोकांनी बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणली आणि ज्या सर्वांची अंतःकरणापासून इच्छा होती त्यांनी होमार्पणे आणली.

  23. तिथे जमलेल्या लोकांनी आणलेल्या होमार्पणांची संख्या सत्तर गोऱ्हे, शंभर मेंढे आणि दोनशे नरकोकरे होती; हे सर्व याहवेहसमोर होमार्पणासाठी आणले होते.

  24. बलिदाने म्हणून शुद्ध केलेल्या प्राण्यांमध्ये सहाशे गोऱ्हे, आणि तीन हजार मेंढ्या आणि बोकडे होते.

  25. तरीसुद्धा सर्व होमार्पणाची कातडी काढण्यासाठी याजक फारच कमी होते. म्हणून त्यांचे नातेवाईक लेवी लोकांनी त्यांना दिलेले काम पूर्ण होईपर्यंत आणि इतर याजकांचे शुद्धीकरण होईपर्यंत मदत केली, कारण लेवी लोक स्वतःचे शुद्धीकरण करण्यामध्ये याजकांपेक्षा अधिक प्रामाणिक होते.