मुख्य मजकुरावर जा

National Sins बद्दल बायबलमधील वचने

152 वचने · 34 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पायाच्या तळव्यापासून ते डोक्याच्या टाळूपर्यंत काहीही चांगले तिथे राहिले नाही— फक्त जखमा आणि खरचटलेले, आणि उघडे व्रण आहेत, त्या स्वच्छ केलेल्या किंवा पट्ट्यांनी बांधलेल्या नाहीत किंवा जैतुनाच्या तेलाने त्या पुसलेल्या नाहीत.

  2. तुमचा देश उद्ध्वस्त झाला आहे, तुमची शहरे अग्नीमध्ये जळाली आहेत; पाडाव केल्यानंतर करावे तसे, तुमच्यादेखत तुमची शेते परदेशीयांनी ओरबाडून घेतली आहेत.

  3. अहो, सदोमाचे राज्यकर्ते, याहवेहचे शब्द ऐका; तुम्ही गमोराचे लोकहो, आमच्या परमेश्वराची सूचना ऐका!

  4. “तुमची असंख्य होमर्पणे— ती माझ्यासाठी काय आहेत?” असे याहवेह म्हणतात. “होमार्पणासाठी माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त मेंढे आणि पुष्ट वासरे यांची चरबी आहे; बैलांच्या, मेंढरांच्या किंवा शेळ्यांच्या रक्तामध्ये मला काही आनंद नाही.

  5. जेव्हा तुम्ही माझ्यासमोर येता, तुम्हाला कोणी सांगितले, की माझ्या मंदिरांचे अंगण तुडवा?

  6. अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा! तुमच्या सुगंधी धूपाचा मला तिटकारा वाटतो. नवचंद्र उत्सव, शब्बाथ आणि समारंभ— अशा तुमच्या निरर्थक सभा मी सहन करू शकत नाही.

  7. तुमचे अमावस्याचे उत्सव आणि तुमचे नेमलेले सण यांचा मी माझ्या संपूर्णतेने तिरस्कार करतो. ते मला भार असे झाले आहेत; त्यांना सहन करता मी थकून गेलो आहे.

  8. प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!

  9. “धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. तुमची दुष्कृत्ये माझ्या दृष्टीबाहेर करा; वाईट कृत्ये करणे थांबवा.

  10. म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे महाशक्तिमान असे जाहीर करतात: “अहा! मी माझ्या शत्रूंवर माझा क्रोध मोकळा करेन आणि माझ्या शत्रूंचा मी स्वतः सूड घेईन.

  11. यरुशलेम डगमगत आहे, यहूदीया कोसळत आहे; त्यांचे बोलणे आणि कृत्ये याहवेहच्या विरोधात आहेत, त्यांच्या गौरवशाली उपस्थितीला त्यांनी विरोध केला.

  12. माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे त्यापेक्षा जास्त मी काय करू शकलो असतो? मी जेव्हा चांगल्या द्राक्षांची अपेक्षा केली, तेव्हा तिथे फक्त वाईट फळे का उपजली?

  13. आता मी तुम्हाला सांगेन, मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे: मी त्याचे कुंपण काढून टाकेन, आणि त्याचा नाश होईल; मी त्याची भिंत पाडेन, आणि ते तुडविले जाईल.

  14. मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”

  15. इस्राएल राष्ट्र सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे, आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत, ज्यामध्ये त्यांना आनंद होतो. आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला; नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले.

  16. पृथ्वीला तिच्या लोकांनी भ्रष्ट केले आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, कायदे भंग केले आहेत आणि अनंतकाळाचा करार मोडला आहे!

  17. याहवेह असे घोषित करतात, “दुराग्रही संततीचा धिक्कार असो, ज्या योजना माझ्या नाहीत, त्या ते पूर्ण करतात, नाते जोडतात, परंतु माझ्या आत्म्याने नाही, पापावर पापाचा ढीग रचतात;

  18. आता जा, त्यांच्यासाठी ते एका पाटीवर लिहा, चर्मपत्राच्या गुंडाळीवर ते कोरून टाका, म्हणजे येणाऱ्या दिवसात ते सर्वकाळासाठी साक्षीदार असेल.

  19. कारण हे बंडखोर लोक आहेत, फसवणारी मुले आहेत, याहवेहची शिकवण ऐकायला तयार नसलेली मुले.

  20. “उंच स्वरात गर्जना करा, रोखून ठेऊ नका. रणशिंगाच्या निनादाप्रमाणे तुमचा आवाज उंच करा. माझ्या लोकांची बंडखोरी आणि याकोबाच्या वंशजांना त्यांची पापे जाहीर करा.

  21. परंतु तुमच्या पातकांनी तुम्हाला तुमच्या परमेश्वरापासून दूर केले आहे; तुमच्या पापांनी त्यांचे मुख तुमच्यापासून लपविले आहे, जेणेकरून त्यांना ऐकू येणार नाही.

  22. “यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर, शोध घे व विचार कर, तिच्या चौकात तपास कर. असा एक जरी मनुष्य आढळला जो प्रामाणिक व सत्यशोधक आहे, तरी मी या नगराला क्षमा करेन.

  23. ‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात पण ते ही खोटीच शपथ घेतात.”

  24. हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का? तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही. तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात. आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले.

  25. मी विचार केला, “हे फार गरीब आहेत; ते निर्बुद्ध आहेत, त्यांना त्यांच्या याहवेहचे मार्ग काय आहे हे ठाऊक नाही त्यांना त्यांच्या परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत नाही.