मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते सतत मनात दुष्ट योजना करीत असतात व दररोज युद्ध भडकावित असतात.

  2. त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे; नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला

  3. दुष्टांपासून माझे रक्षण करा, याहवेह; त्या हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा, कारण मला पाडण्याचा ते कट करीत आहेत.

  4. या गर्विष्ठ लोकांनी मला पकडण्यासाठी पाश लपविले आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूस दोरांचे जाळे पसरले आहे, आणि माझ्या मार्गावर सापळे रचले आहेत. सेला

  5. याहवेहला मी म्हणतो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.” याहवेह, माझ्या विनवणीकडे कान द्या.

  6. सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या, युद्ध समयी तुम्हीच माझे शिरस्त्राण व्हा.

  7. या दुष्ट लोकांची अभिलाषा पूर्ण होऊ देऊ नका, याहवेह, त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नका. सेला

  8. ज्यांनी मला वेढा घातला आहे, त्यांचे मस्तक गर्वाने उंचावलेले आहे; त्यांच्या मुखातून निघालेले कपट त्यांच्यावरच उलटो.

  9. त्यांच्या मस्तकांवर निखारे पडोत; ते अग्नीत फेकले जावोत, जिथून सुटका होणार नाही, अशा खोल खाचात ते टाकले जावोत.

  10. या आमच्या भूमीवर निंदकांची वस्ती होऊ नये; संकटे त्यांना शोधून त्यांचा नाश करोत.

  11. मला माहीत आहे की याहवेह गरिबांना न्याय देतात, आणि गरजवंतांना खात्रीने साहाय्य करतात.

  12. निश्चितच नीतिमान लोक तुमची उपकारस्तुती करतील; आणि नीतिमान तुमच्या समक्षतेत राहतील.

  13. दावीदाचे एक स्तोत्र. हे याहवेह, मी तुमचा धावा करतो, त्वरा करा व मजकडे या, जेव्हा तुमचा धावा करतो, तेव्हा माझे ऐका.

  14. तुम्हाला माझी प्रार्थना सुगंधी धुपाप्रमाणे प्रसन्न करो; माझे हात उभारणे सायंकाळच्या यज्ञाप्रमाणे होवो.

  15. हे याहवेह, माझ्या मुखावर पहारा ठेवा; माझ्या ओठांच्या द्वारावर नजर ठेवा.

  16. माझ्या हृदयास अनीतीकडे ओढले जाऊ देऊ नका, पातक्यांच्या सहवासात राहून, कुकृत्यामध्ये सामील होण्यापासून मला दूर ठेवा; त्यांची मिष्टान्ने खाण्यापासून मला अलिप्त ठेवा.

  17. नीतिमान मला शासन करो—ते माझ्यासाठी कृपाच ठरेल; त्यांनी केलेली कान उघाडणी—मला तैलाभ्यंगासारखी वाटते. माझे मस्तक ते कधीही नाकारणार नाही, दुष्ट माणसांच्या दुराचाराविरुद्ध मी सतत प्रार्थना करेन.

  18. दुर्जनांचे पुढारी दोषी ठरून, त्यांना कडेलोटाचे शासन होईल; तेव्हा त्यांच्या हितासाठी असलेल्या माझ्या वक्तव्याचे त्यांना स्मरण होईल.

  19. ते म्हणतील, “नांगर चालविल्यानंतर जसे मातीची ढेकळे मोडून विखुरतात, तशी आमची हाडे अधोलोकाच्या मुखावर विखुरली गेली आहेत.”

  20. परंतु सार्वभौम याहवेह, मी तुमच्यावरच दृष्टी केंद्रित केली आहे; तुम्हीच माझा आश्रय आहात—मला मृत्यूच्या हवाली करू नका.

  21. दुष्टांच्या फासातून माझा बचाव करा, त्यांनी टाकलेल्या पाशापासून मला सोडवा.

  22. दुर्जन त्यांच्याच जाळ्यांमध्ये अडकू दे, आणि मी मात्र सुखरुपपणे निसटून जाईन.

  23. दावीदाची मासकीलज्यावेळी तो गुहेमध्ये होता. एक अभ्यर्थना मी अगदी काकुळतीला येऊन याहवेहला विनवणी करतो; मी उच्चस्वरात याहवेहला दयेची विनंती करतो.

  24. माझी तक्रार मी त्यांच्यापुढे ओतत आहे, आणि माझे कष्ट मी त्यांच्यासमोर प्रकट करत आहे.

  25. कारण माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे, तुमच्यासमोर माझी नियती नेहमी स्पष्ट असते. माझ्या शत्रूंनी माझ्या मार्गात सापळे लावले आहेत.