Psalms बद्दल बायबलमधील वचने: Prophetic Psalms
Prophetic Psalms बद्दल वचने
राष्ट्रे कट का रचत आहेत, आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?
याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत,
“चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.”
स्वर्गातील सिंहासनावर जे विराजमान आहेत ते हसतात; प्रभू त्यांचा उपहास करतात.
ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात,
“सीयोन माझा पवित्र पर्वत, यावर मी माझ्या राजाला नियुक्त केले आहे.”
मी याहवेहच्या नियमांची घोषणा करेन: ते मला असे म्हणतात, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.
माझ्याकडे माग, म्हणजे मी तुला राष्ट्रांचे वतन देईन, पृथ्वीच्या सीमा तुझे धन असेल.
तुम्ही त्यांना लोखंडी राजदंडाने मोडून टाकणार, तुम्ही मातीच्या पात्रांप्रमाणे त्यांचा चुराडा कराल.”
म्हणून अहो राजांनो, शहाणे व्हा; पृथ्वीवरील शासक सावध व्हा.
भय धरून याहवेहची सेवा करा! थरथर कापत त्यांच्या शासनाचा सन्मान करा.
त्यांच्या पुत्राचे चुंबन घ्या, नाहीतर ते रागावतील, आणि तुमचे मार्ग तुम्हाला नाशाकडे घेऊन जातील, कारण एका क्षणात त्यांचा क्रोधाग्नी पेटेल. धन्य आहेत ते सर्वजण जे त्यांना शरण जातात.
दावीदाचे मिक्ताम परमेश्वरा, माझे रक्षण करा, कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे.
मी याहवेहला म्हणालो, “तुम्हीच माझे प्रभू आहात; तुमच्याशिवाय दुसरे चांगले असे काहीच माझ्याकडे नाही.”
पृथ्वीवरील लोक जे पवित्र आहेत, “ते आदरणीय आहेत, त्यांच्याठायी मी प्रसन्न आहे.”
जे अन्य दैवतांच्या भजनी लागतात, ते अनेक दुःखांनी ग्रासले जातील. अशा दैवतांना मी रक्तमय पेयार्पणे अर्पिणार नाही किंवा त्यांची नावेही मी माझ्या ओठांनी उच्चारणार नाही.
याहवेह तुम्हीच माझे वतन, माझा प्याला आहात; तुम्हीच माझा वाटा सुरक्षित करता.
माझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत; माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर वारसा आहे.
मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे; रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते.
मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे; ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.
यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील सुरक्षिततेत विसावा घेईल.
कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही.
तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल, तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.
कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. एक गीत. त्यांनी पवित्र पर्वतावर त्यांच्या नगरीचा पाया घातला.
याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा, सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे.