मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास २८:६सुमारे इ.स.पू. ७४२

    रमाल्याह याचा पुत्र पेकहने एका दिवसात यहूदीयामधील एक लाख वीस हजार सैनिकांना ठार केले—कारण यहूदीयाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता.

  2. 2 इतिहास २८:७सुमारे इ.स.पू. ७४२

    एफ्राईम येथील योद्धा जिक्रीने राजाचा पुत्र मासेयाह, राजवाड्याचा प्रभारी अधिकारी अज्रीकाम आणि राजाच्या नंतरचा सर्वात उच्चाधिकारी एलकानाह यांना ठार मारले.

  3. 2 इतिहास २८:८सुमारे इ.स.पू. ७४२

    इस्राएली लोकांनी यहूदीया येथून आलेल्या त्यांच्या बंधूइस्राएली लोकांमधून दोन लाख स्त्रिया, पुत्र आणि कन्यांना कैद केले. त्यांनी पुष्कळ लूट घेतली व ती शोमरोनला नेली.

  4. 2 इतिहास २८:९सुमारे इ.स.पू. ७४२

    परंतु ओदेद नावाचा याहवेह यांचा एक संदेष्टा तिथे होता आणि जेव्हा सैन्य शोमरोनकडे परत आले, तेव्हा तो त्यांची भेट घेण्यासाठी निघाला. तो त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यहूदीयावर रागावले होते म्हणून त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले. परंतु इतक्या क्रोधाने तुम्ही त्यांची कत्तल केली आहे की, त्याचे पडसाद स्वर्गापर्यंत पोहोचले.

  5. 2 इतिहास २८:१०सुमारे इ.स.पू. ७४२

    आणि आता तुमचा असा उद्देश आहे की, यहूदीया आणि यरुशलेममधील स्त्री-पुरुषांना तुमचे गुलाम बनवावे. परंतु तुमचे परमेश्वर याहवेह यांच्याविरुद्ध केलेल्या पापाबद्दल तुम्हीदेखील दोषी नाहीत का?

  6. 2 इतिहास २८:११सुमारे इ.स.पू. ७४२

    आता माझे ऐका! तुम्ही कैदी म्हणून आणलेल्या तुमच्या सहइस्राएली लोकांना परत पाठवा, कारण याहवेहचा क्रोधाग्नी तुमच्यावर भडकलेला आहे.”

  7. 2 इतिहास २८:१२सुमारे इ.स.पू. ७४२

    नंतर एफ्राईममधील काही पुढारी—यहोहानानचा पुत्र अजर्‍याह, मेशिल्लेमोथचा पुत्र बेरेख्याह, शल्लूमचा पुत्र यहिज्कीयाह आणि हदलैचा पुत्र अमासा—यांनी जे युद्धातून परत येत होते त्यांचा सामना केला.

  8. 2 इतिहास २८:१३सुमारे इ.स.पू. ७४२

    ते म्हणाले, “तुम्ही त्या कैद्यांना इकडे आणू नये, नाहीतर याहवेहसमोर आपण दोषी ठरले जाऊ. आपल्या पापामध्ये आणि दोषामध्ये आणखी भर घालण्याचा तुमचा विचार आहे काय? कारण आधीच आमचे पाप मोठे आहे आणि त्यांचा क्रोधाग्नी आम्हा इस्राएलींवर भडकलेला आहे.”

  9. 2 इतिहास २८:१४सुमारे इ.स.पू. ७४२

    त्यामुळे शिपायांनी अधिकारी आणि जमलेल्या सर्व मंडळीच्या उपस्थितीत लूट आणि कैदींना सोडून दिले.

  10. 2 इतिहास २८:१५सुमारे इ.स.पू. ७४२

    ज्या माणसांची नेमणूक करण्यात आली होती, त्यांनी कैद्यांना घेतले आणि जे वस्त्रहीन होते त्या सर्वांना कपडे घातले. त्यांनी त्यांना कपडे आणि पायताणे, अन्न आणि पेय आणि बरे होण्यासाठी मलम हे सर्व दिले. जे अशक्त होते त्या सर्वांना त्यांनी गाढवावर बसविले. तेव्हा ते त्यांना त्यांच्या इस्राएली बांधवांकडे यरीहो, खजुरीचे नगर येथे घेऊन गेले आणि ते शोमरोनकडे परत आले.

  11. 2 इतिहास २८:१६सुमारे इ.स.पू. ७४२

    त्यावेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजांकडे मदतीसाठी बोलाविणे पाठविले होते.

  12. 2 इतिहास २८:१७सुमारे इ.स.पू. ७४२

    एदोमी लोक पुन्हा आले होते आणि त्यांनी यहूदीयावर हल्ला केला आणि कैद्यांना पळवून नेले.

  13. 2 इतिहास २८:१८सुमारे इ.स.पू. ७४२

    त्यावेळेस पलिष्ट्यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या नगरांवर आणि यहूदीयाच्या नेगेवमधील गावांवर हल्ला केला. त्यांनी बेथ-शेमेश, अय्यालोन आणि गदेरोथ, तसेच सोकोह, तिम्नाह आणि गिम्झो आणि त्यांच्या आजूबाजूची गावे काबीज केली.

  14. 2 इतिहास २८:१९सुमारे इ.स.पू. ७४२

    इस्राएलचा राजा आहाजमुळे याहवेहनी यहूदीयाला नम्र केले होते, कारण त्याने यहूदीयामध्ये दुष्टमार्गाला चालना दिली होती आणि तो याहवेहबरोबर अत्यंत अविश्वासू राहिला.

  15. 2 इतिहास २८:२०सुमारे इ.स.पू. ७४०

    अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर त्याच्याकडे आला, परंतु त्याने त्याला मदत करण्याऐवजी त्याला त्रास दिला.

  16. 2 इतिहास २८:२१सुमारे इ.स.पू. ७४०

    आहाज राजाने याहवेहच्या मंदिरातून आणि राजवाड्यातून आणि अधिकाऱ्यांकडून काही वस्तू घेतल्या आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

  17. 2 इतिहास २८:२२सुमारे इ.स.पू. ७४०

    त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला.

  18. 2 इतिहास २८:२३सुमारे इ.स.पू. ७४०

    त्याने दिमिष्कच्या दैवतांना बलिदान केले, ज्यांनी त्याचा पराभव केला होता; कारण त्याला वाटले, “अरामच्या राजांच्या दैवतांनी त्यांना मदत केली म्हणून मी त्यांना बलिदान करेन म्हणजे ते मला मदत करतील.” परंतु तेच त्याचे आणि सर्व इस्राएलचे पतन होण्याचे कारण होते.

  19. 2 इतिहास २८:२४सुमारे इ.स.पू. ७४०

    आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातील इतर वस्तू एकत्र केल्या आणि कापून त्याचे तुकडे केले. त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे बंद केले आणि यरुशलेममधील प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात वेद्या बसविल्या.

  20. 2 इतिहास २८:२५सुमारे इ.स.पू. ७४०

    यहूदीयामधील प्रत्येक गावात त्याने इतर दैवतांना बलिदाने अर्पिण्यासाठी उच्च स्थाने बांधली आणि याहवेहच्या, त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वराच्या रागाला चेतावणी दिली.

  21. 2 इतिहास २८:२६सुमारे इ.स.पू. ७४०

    त्याच्या राज्यकाळातील इतर घटना आणि त्याचे सर्व मार्ग, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यहूदीया आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.

  22. 2 इतिहास २८:२७सुमारे इ.स.पू. ७२६

    आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला यरुशलेम शहरात पुरण्यात आले, परंतु त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत ठेवण्यात आले नाही. त्याचा पुत्र हिज्कीयाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  23. 2 इतिहास २९:१सुमारे इ.स.पू. ७२६

    वयाच्या पंचवीसाव्या वर्षी हिज्कीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीयाह, ती जखर्‍याहची कन्या होती.

  24. 2 इतिहास २९:२सुमारे इ.स.पू. ७२६

    त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

  25. 2 इतिहास २९:३सुमारे इ.स.पू. ७२६

    त्याच्या राज्यकाळाच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली.