Syria बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.
अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.
मग त्या सेवकाने अब्राहामाचे दहा उंट घेऊन, आपल्या धन्याच्या मालमत्तेतील उत्तमोत्तम वस्तू निवडून त्या सर्व उंटांवर लादल्या. मग तो प्रवास करीत अराम-नहराईम मधील नाहोराच्या नगरास गेला.
जेव्हा इसहाकाने रिबेकाहशी विवाह केला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता. रिबेकाह पद्दन-अराम येथील अरामी बेथुएलाची कन्या आणि लाबानाची बहीण होती.
अशा रीतीने इसहाकाने याकोबाला पद्दन-अराम येथे अरामी बेथुएलाचा पुत्र आणि याकोब व एसाव यांची आई रिबेकाहचा भाऊ, लाबान याच्याकडे पाठविले.
तेव्हा बलामाने आपला संदेश सांगितला: “बालाकाने मला अरामाहून आणले, मोआबाच्या राजाने पूर्वेकडील डोंगरातून मला आणले. तो म्हणाला, ‘ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे; ये, इस्राएलाचा धिक्कार कर.’
नंतर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर म्हणावेः “आमचे पूर्वज अरामी, हे निर्वासित होऊन आश्रयासाठी इजिप्त देशास गेले. ते संख्येने अगदी थोडे होते, पण इजिप्त देशात ते एक विशाल, बलाढ्य आणि थोर राष्ट्र बनले.
इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले.
जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना मारून टाकले.
नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथे कुठे गेला, तिथे तिथे याहवेहने त्याला विजय दिला.
दावीद राजाने या वस्तू, सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही:
अराम व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली.
क्षार खोर्यातील अठरा हजार अरामी लोकांना मारून परत आल्यावर दावीदाचे नाव प्रसिद्ध झाले.
जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा त्यांनी बेथ-रहोब व अराम-झोबाह येथून वीस हजार अरामी पायदळ, तसेच माकाहच्या राजाबरोबर एक हजार लोक आणि तोब कडून बारा हजार माणसे भाड्याने आणली.
हे ऐकून, दावीदाने युद्ध करणाऱ्या माणसांच्या संपूर्ण सैन्यासह योआबाला पाठवले.
तेव्हा अम्मोन्यांचे सैन्य बाहेर आले आणि युद्धाच्या तयारीने त्यांच्या नगरवेशीच्या दरवाजाजवळ येऊन थांबले आणि अराम-झोबाह आणि रहोबचे अरामी आणि तोब आणि माकाहची माणसे मोकळ्या प्रदेशात एकटीच होती.
शत्रूचे सैन्य आपल्यापुढे व मागे आहे हे योआबाला समजले; तेव्हा त्याने इस्राएली सैन्यातून उत्तम योद्धे निवडले व त्यांना अरामी सैन्याशी लढण्यास पाठविले.
बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठवले.
योआब म्हणाला, “जर अरामी सैन्य माझ्यावर भारी झाले तर तुम्ही माझी सुटका करण्यास यावे; परंतु जर अम्मोनी सैन्य तुझ्यावर भारी झाले तर मी तुला सोडविण्यास येईन.
खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.”
तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले पण ते त्याच्यापुढून पळून गेले.
जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा ते अबीशाईपुढून पळून शहरात गेले. तेव्हा योआब अम्मोनी सैन्याबरोबर युद्ध करून यरुशलेमास आला.
नंतर अरामी लोकांनी पाहिले इस्राएलकडून त्यांचा पराभव झाला आहे, तेव्हा ते पुन्हा एकत्र झाले.
हादादेजरने फरात नदीपलीकडून अरामी सैन्य आणले; हादादेजरच्या सैन्याचा सेनापती शोबाक याच्या नेतृत्वाखाली ते हेलाम येथे गेले.
याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले, यार्देन नदी पार करून ते हेलामकडे गेले. अरामी सैन्याने दावीदाला भेटण्यासाठी त्यांच्या युद्धाच्या रांगा तयार केल्या आणि त्याच्याविरुद्ध युद्ध केले.