मुख्य मजकुरावर जा

Church (2) बद्दल बायबलमधील वचने

158 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या दिवसात, याहवेहची शाखा सुंदर आणि गौरवशाली असेल, त्या भूमीतील पिकांचा इस्राएलातील अवशिष्टांना अभिमान व गौरव वाटेल.

  2. सीयोनात उरलेले लोक जे यरुशलेममध्येच राहिले, त्यांची नावे नोंदवली गेली आहेत, ते पवित्र म्हणविले जातील.

  3. प्रभू परमेश्वर सीयोनच्या स्त्रियांची घाण धुवून टाकतील; ते न्यायाच्या आत्म्याने आणि अग्नीच्या आत्म्याने यरुशलेममधील रक्ताचे डाग स्वच्छ करतील.

  4. त्यानंतर याहवेह संपूर्ण सीयोन पर्वतावर आणि तिथे जमलेल्या सर्वांवर दिवसा धुराचा ढग आणि रात्रीच्या वेळेस प्रखर अग्नी प्रज्वलित करतील; या सर्व गोष्टींवर गौरवाचे एक छत असेल.

  5. दिवसाच्या उष्णतेपासून ते एक आश्रय व सावली आणि वादळ व पावसापासून ते एक आश्रयस्थान आणि लपण्याचे ठिकाण असेल.

  6. त्या दिवशी— “फलवंत द्राक्षमळ्याबद्दल गीत गा:

  7. मी, याहवेह, त्यावर लक्ष ठेवतो; मी त्याला सतत पाणी देतो. मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करतो जेणेकरून कोणीही त्याला इजा करणार नाही.

  8. याहवेह मला असे म्हणतात: “जसा सिंह गुरगुरतो, एक मोठा सिंह त्याच्या भक्ष्यावर— आणि त्याला विरोध करण्यासाठी जरी मेंढपाळांची संपूर्ण टोळी एकत्र बोलावली जाते, तरी तो त्यांच्या ओरडण्याने घाबरत नाही किंवा त्यांच्या मोठ्या गोंधळ्याच्या आवाजाने अस्वस्थ होत नाही, म्हणून सर्वसमर्थ याहवेह सीयोन पर्वतावर आणि त्याच्या उंचीवर युद्ध करण्यासाठी खाली येतील.

  9. ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात, त्याप्रमाणे सर्वसमर्थ याहवेह यरुशलेमची ढाल होतील; ते तिला संरक्षण देऊन सोडवतील, ते त्यांना ओलांडून जातील आणि त्याला सोडवतील आणि त्याचा बचाव करतील.”

  10. आमच्या सणांचे शहर, सीयोनाकडे पहा; तुमची दृष्टी यरुशलेम पाहतील, शांत असलेले निवासस्थान, हालविल्या न जाणारा तंबू; त्याच्या खुंट्या कधीही उपटल्या जाणार नाहीत, किंवा त्याच्या कोणत्याही दोऱ्या तोडल्या जाणार नाहीत.

  11. आमचे प्रतापी याहवेह तिथे असतील. विस्तीर्ण नद्या आणि प्रवाह असलेले ते ठिकाण असेल. कोणत्याही लहान जहाजाचे वल्हे त्यांच्यावर स्वार होणार नाही, कोणतेही प्रचंड जहाज त्यांच्यावरून जाणार नाही.

  12. कारण याहवेह आमचे न्यायाधीश आहेत, याहवेह आम्हाला कायदा प्रदान करणारे आहेत, याहवेह आमचे राजा आहेत; तेच आम्हाला वाचविणार आहेत.

  13. तुमच्या जहाजांना आधार देण्याऱ्या दोऱ्या सैल सोडलेल्या आहेत: जहाजाची शीडकाठी सुरक्षित धरलेली नाही, जहाजाचे शीड पसरलेले नाही. तेव्हा लूट केलेल्या विपुल मालाची वाटणी केली जाईल आणि लंगडेसुद्धा लूट घेऊन जातील.

  14. सीयोनमध्ये राहणारा कोणीही असे म्हणणार नाही, “मी आजारी आहे;” आणि तिथे जे राहणारे आहेत, त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल.

  15. वाळवंट आणि शुष्क भूमी आनंदित होईल; अरण्य हर्षोल्हास करेल आणि बहरून येईल. केशराच्या फुलाप्रमाणे,

  16. त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. लबानोनचे गौरव, कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; ते याहवेहचे गौरव, आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.

  17. अशक्त हात बळकट करा, निर्बल झालेले गुडघे स्थिर करा;

  18. भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा, “बलवान व्हा, घाबरू नका; तुमचे परमेश्वर येतील, ते सूड घेण्यास येतील. दैवी प्रतिफळ देऊन तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.”

  19. तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान उघडले जातील.

  20. तेव्हा पांगळे हरिणाप्रमाणे उड्या मारतील, आणि मुकी जीभ आनंदाने ओरडेल. अरण्यामध्ये पाणी आणि वाळवंटात झरे उफाळून वर येतील.

  21. तप्त झालेली वाळू एक जलाशय होईल, आणि तहानलेल्या जमिनीवर उफाळणारे झरे येतील. जिथे कधी कोल्हे निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल.

  22. आणि तिथे एक महामार्ग असेल; त्याला पवित्रतेचा मार्ग म्हटले जाईल; तो त्यांच्यासाठी असेल जे त्या पवित्र मार्गावरून चालतात. अशुद्ध असलेले त्यावरून प्रवास करणार नाहीत. दुष्ट मूर्ख लोक त्यावरून चालणार नाहीत.

  23. तिथे कोणताही सिंह नसेल, किंवा कोणताही वखवखलेला हिंस्र पशू नसेल. ते तिथे सापडणार नाहीत. फक्त तारण झालेलेच तिथे चालतील,

  24. आणि ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.

  25. तुम्ही जे सीयोनसाठी सुवार्ता आणता, उंच डोंगरावर जा. यरुशलेममध्ये सुवार्ता आणणारे तुम्ही, तुमचा आवाज उंचावून आरोळी द्या, आवाज उंच करा, घाबरू नका; यहूदीयाच्या नगरांना सांगा, “तुमचे परमेश्वर येत आहेत!”