मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 राजे १७:१०सुमारे इ.स.पू. ९०९

    तेव्हा तो सारेफथला गेला. जेव्हा तो नगराच्या वेशीजवळ आला, तेव्हा काटक्या गोळा करीत असलेली एक विधवा तिथे होती. त्याने तिला बोलावून विचारले, “एका भांड्यात मला पिण्यासाठी पाणी आणशील काय?”

  2. 1 राजे १७:११सुमारे इ.स.पू. ९०९

    ती पाणी आणायला जात असताना, त्याने तिला आवाज देऊन म्हटले, “आणि कृपया येताना माझ्यासाठी भाकरीचा एक तुकडा घेऊन ये.”

  3. 1 राजे १७:१२सुमारे इ.स.पू. ९०९

    ती म्हणाली, “याहवेह तुझ्या जिवंत परमेश्वराची शपथ, माझ्याकडे भाकर नाही; केवळ मूठभर पीठ व कुपीत थोडे जैतुनाचे तेल आहे. मी काही काटक्या गोळा करीत आहे, म्हणजे मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी भोजन बनवीन व आम्ही ते खाऊ व मरून जाऊ.”

  4. 1 राजे १७:१३सुमारे इ.स.पू. ९०९

    एलीयाह तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि तू म्हटल्याप्रमाणे कर. परंतु तुझ्याजवळ जे आहे त्यातून प्रथम माझ्यासाठी एक लहान भाकर बनव आणि माझ्याकडे आण आणि मग तुझ्यासाठी व तुझ्या मुलासाठी बनव.

  5. 1 राजे १७:१४सुमारे इ.स.पू. ९०९

    कारण याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘याहवेह देशात पाऊस पाठवेपर्यंत, तुझ्या भांड्यातील पीठ संपणार नाही आणि तुझी तेलाची कुपी कोरडी होणार नाही.’ ”

  6. 1 राजे १७:१५सुमारे इ.स.पू. ९०९

    ती गेली आणि एलीयाहने तिला सांगितल्याप्रमाणे केले, म्हणून एलीयाह, आणि ती स्त्री व तिचे कुटुंब यांच्यासाठी रोज भोजन मिळत असे.

  7. 1 राजे १७:१६सुमारे इ.स.पू. ९०९

    एलीयाहद्वारे दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार भांड्यातील पीठ संपले नाही आणि तेलाची कुपी कोरडी झाली नाही.

  8. 1 राजे १७:१७सुमारे इ.स.पू. ९०८

    काही काळानंतर जी घर मालकीण स्त्री होती तिचा मुलगा आजारी पडला. त्याचा आजार वाढतच गेला आणि त्याचा श्वास थांबला.

  9. 1 राजे १७:१८सुमारे इ.स.पू. ९०८

    ती एलीयाहला म्हणाली, “अहो परमेश्वराच्या मनुष्या, तुम्ही माझ्याविरुद्ध आहात काय? माझ्या पापाची मला आठवण करून द्यायला व माझ्या मुलाला मारून टाकण्यास आला आहात काय?”

  10. 1 राजे १७:१९सुमारे इ.स.पू. ९०८

    एलीयाह म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” त्याने त्याला तिच्या हातून घेतले आणि माडीवरील खोलीत जिथे तो राहत होता तिथे नेऊन आपल्या बिछान्यावर ठेवले.

  11. 1 राजे १७:२०सुमारे इ.स.पू. ९०८

    मग त्याने याहवेहचा धावा करीत म्हटले, “याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी या विधवेच्या घरात राहत आहे, तिच्या मुलाला मारून आपण तिच्यावर अरिष्ट आणले काय?”

  12. 1 राजे १७:२१सुमारे इ.स.पू. ९०८

    मग त्याने तीन वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि याहवेहकडे आरोळी केली, “याहवेह, माझ्या परमेश्वरा, या मुलाचा जीव पुन्हा त्याच्यात येऊ द्यावा!”

  13. 1 राजे १७:२२सुमारे इ.स.पू. ९०८

    याहवेहने एलीयाहची प्रार्थना ऐकली, आणि त्या मुलाचा जीव त्याच्यात परत आला आणि तो जिवंत झाला.

  14. 1 राजे १७:२३सुमारे इ.स.पू. ९०८

    मग एलीयाहने मुलाला उचलून त्या खोलीतून खाली आणले. त्याने त्याला त्याच्या आईच्या हाती दिले आणि म्हटले, “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे!”

  15. 1 राजे १७:२४सुमारे इ.स.पू. ९०८

    तेव्हा ती स्त्री एलीयाहला म्हणाली, “आता मला ठाऊक झाले की आपण परमेश्वराचे मनुष्य आहात आणि आपल्या मुखातील याहवेहचे वचन सत्य आहे.”

  16. 1 राजे १८:१सुमारे इ.स.पू. ९०६

    काही काळानंतर, म्हणजे तिसऱ्या वर्षी याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: “जा आणि अहाबाच्या समोर हजर हो, आणि मी देशावर पाऊस पाठवेन.”

  17. 1 राजे १८:२सुमारे इ.स.पू. ९०६

    म्हणून एलीयाह अहाबासमोर हजर झाला. याकाळात शोमरोनामध्ये अतिशय तीव्र दुष्काळ पडला होता,

  18. 1 राजे १८:३सुमारे इ.स.पू. ९०६

    आणि अहाबाने आपल्या राजवाड्याचा कारभारी ओबद्याहला बोलाविले. (ओबद्याह याहवेहचे फार भय बाळगणारा होता.

  19. 1 राजे १८:४सुमारे इ.स.पू. ९०६

    जेव्हा ईजबेल याहवेहच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, तेव्हा ओबद्याहने शंभर संदेष्ट्यांना प्रत्येकी पन्नास असे दोन गुहांमध्ये लपविले होते, आणि त्यांना अन्नपाणी पुरविले.)

  20. 1 राजे १८:५सुमारे इ.स.पू. ९०६

    अहाबाने ओबद्याहला म्हटले, “देशातील सर्व झरे व ओढे शोध, घोडे व खेचरे जिवंत राहावे म्हणून कदाचित आपल्याला थोडे गवत मिळेल म्हणजे आपल्याला त्यांना मारून टाकावे लागणार नाही.”

  21. 1 राजे १८:६सुमारे इ.स.पू. ९०६

    मग ज्या प्रदेशात फिरायचे आहे त्या भागाचे त्यांनी दोन भाग केले, अहाब एका दिशेने जाणार व ओबद्याह दुसर्‍या बाजूने.

  22. 1 राजे १८:७सुमारे इ.स.पू. ९०६

    ओबद्याह वाटेने चालत असता, त्याला एलीयाह भेटला. ओबद्याहने त्याला ओळखले व जमिनीकडे लवून त्याला दंडवत घालत म्हटले, “माझे स्वामी, एलीयाह ते आपणच आहात काय?”

  23. 1 राजे १८:८सुमारे इ.स.पू. ९०६

    एलीयाह म्हणाला, “होय, जा, तुझ्या धन्याला सांग एलीयाह येथे आहे.”

  24. 1 राजे १८:९सुमारे इ.स.पू. ९०६

    तेव्हा ओबद्याहने विचारले, “माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे, की तुम्ही आपल्या सेवकाला मारून टाकावे म्हणून अहाबाच्या स्वाधीन करीत आहात?

  25. 1 राजे १८:१०सुमारे इ.स.पू. ९०६

    याहवेह, आपल्या जिवंत परमेश्वराची शपथ, आपला शोध करण्यासाठी माझ्या धन्याने लोक पाठवले नाही असा एकही देश किंवा राज्य नाही. आणि त्या देशात किंवा राज्यात एलीयाह नाही असे कोणी सांगितले, तर एलीयाह त्यांना सापडला नाही असे त्यांना शपथ घेऊन सांगावे लागत असे.