मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु दुष्ट तसे नाहीत. ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुश्यासारखे आहेत.

  2. म्हणून दुष्ट न्यायसभेत, किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत.

  3. कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.

  4. राष्ट्रे कट का रचत आहेत, आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?

  5. याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत,

  6. “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.”

  7. स्वर्गातील सिंहासनावर जे विराजमान आहेत ते हसतात; प्रभू त्यांचा उपहास करतात.

  8. ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात,

  9. “सीयोन माझा पवित्र पर्वत, यावर मी माझ्या राजाला नियुक्त केले आहे.”

  10. मी याहवेहच्या नियमांची घोषणा करेन: ते मला असे म्हणतात, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.

  11. माझ्याकडे माग, म्हणजे मी तुला राष्ट्रांचे वतन देईन, पृथ्वीच्या सीमा तुझे धन असेल.

  12. तुम्ही त्यांना लोखंडी राजदंडाने मोडून टाकणार, तुम्ही मातीच्या पात्रांप्रमाणे त्यांचा चुराडा कराल.”

  13. म्हणून अहो राजांनो, शहाणे व्हा; पृथ्वीवरील शासक सावध व्हा.

  14. भय धरून याहवेहची सेवा करा! थरथर कापत त्यांच्या शासनाचा सन्मान करा.

  15. त्यांच्या पुत्राचे चुंबन घ्या, नाहीतर ते रागावतील, आणि तुमचे मार्ग तुम्हाला नाशाकडे घेऊन जातील, कारण एका क्षणात त्यांचा क्रोधाग्नी पेटेल. धन्य आहेत ते सर्वजण जे त्यांना शरण जातात.

  16. दावीदाचे स्तोत्र. जेव्हा तो त्याचा पुत्र अबशालोम याच्यापासून पळाला. याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे! कितीतरी लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत!

  17. पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात, “परमेश्वर त्याची सुटका करणार नाही.” सेला

  18. परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात. माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात.

  19. मी याहवेहचा धावा करतो, आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला

  20. मी पहुडतो आणि झोप घेतो; मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात.

  21. असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील, तरी मला मुळीच भीती वाटणार नाही.

  22. याहवेह, उठा! हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा! माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा; त्या दुष्टांचे दात पाडून टाका.

  23. कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला

  24. संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरील दावीदाचे स्तोत्र. हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन, तेव्हा मला उत्तर द्या. माझ्या संकटात तुम्हीच मला साहाय्य करा. माझ्यावर दया करा, माझी प्रार्थना ऐका.

  25. अहो मनुष्यांनो, किती वेळा तुम्ही माझ्या गौरवाला काळिमा लावणार? किती काळ तुम्ही फसवणुकीवर प्रीती कराल आणि खोट्या दैवतांचा शोध कराल? सेलाह