मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेमधून येते, आणि गमोराच्या मळ्यातून येते. त्यांचे द्राक्ष विषाने भरलेले आहेत, आणि द्राक्षाचे घड कडू चवीचे आहेत.

  2. त्यांचे द्राक्षारस सर्पाचे विष, ते नागांचे घातक विष आहे.

  3. “यांना मी राखून ठेवलेले नाही काय, आणि यांना माझ्या तिजोरीत सुरक्षित ठेवले नाही काय?

  4. सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन. ठरल्या वेळेवर त्यांचे पाय घसरतील; त्यांच्या नाशाचा दिवस जवळ आलेला आहे, आणि त्यांचा सर्वनाश वेगाने त्यांच्या दिशेने सरसावत आहे.”

  5. याहवेह आपल्या लोकांचा न्याय करतील, आणि त्यांच्या सेवकांसाठी त्यांच्या मनाला पाझर फुटेल जेव्हा त्यांच्यातील सर्व शक्ती संपून जाईल, आणि दास किंवा स्वतंत्र असे कोणीही उरणार नाहीत.

  6. मग ते विचारतील: “आता त्यांची दैवते कुठे आहेत, त्यांचे आश्रयाचे खडक कुठे आहेत?

  7. ज्या दैवतांनी त्यांच्या यज्ञातील चरबीचे सेवन केले आणि त्यांच्या द्राक्षारसाचे रसपान केले, ती दैवते आता कुठे आहेत? त्या दैवतांनी तुमच्या मदतीसाठी आता जागे व्हावे! त्यांनी त्यांचे आश्रयस्थान व्हावे!

  8. “आता पाहा मीच एकमेव आहे तो आहे! माझ्याशिवाय इतर कोणताही ईश्वर नाही. माझ्या आदेशानेच मृत्यू येतो आणि जीवनही मीच प्रदान करतो. मी जखम केली आणि मी ती बरीही करेन, माझ्या हातून सोडविणारा कोणीही नाही.

  9. मी माझा हात स्वर्गाकडे उंचावतो आणि म्हणतो: शपथ माझ्या जीवनाची,

  10. जेव्हा मी माझी लखलखणारी तलवार पाजळेन आणि न्याय देण्यासाठी ती माझ्या हातात घेईन, मी माझ्या शत्रूचा सूड घेईन, आणि जे माझा तिरस्कार करतात त्यांची परतफेड करेन.

  11. वधलेल्या व कैद केलेल्यांच्या रक्ताने, शत्रूंच्या सरदारांच्या मस्तकाच्या रक्ताने मी माझे बाण मदमस्त करेन, आणि माझी तलवार मांस गिळून टाकेल.”

  12. अहो राष्ट्रांनो, त्यांच्या लोकांबरोबर जयजयकार करा, कारण आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा ते सूड उगवतील; आणि शत्रूंचा प्रतिशोध घेतील, आणि आपला देश आणि आपले लोक यांच्याकरिता प्रायश्चित करतील.

  13. तेव्हा हन्नाहने प्रार्थना केली आणि म्हणाली: “माझे हृदय याहवेहमध्ये आनंद करीत आहे; याहवेहमध्ये माझे शिंग उंच केलेले आहे. माझे मुख माझ्या शत्रूंपुढे बढाई मारते, कारण याहवेहने दिलेल्या उद्धारात मी आनंद करते.

  14. “याहवेहसारखे कोणीही पवित्र नाही; तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही; आमच्या परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खडक नाही.

  15. “फार गर्वाने बोलत राहू नका, किंवा तुमच्या मुखाला उद्धट बोलणे करू देऊ नका, कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत, आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात.

  16. “योद्ध्यांचे धनुष्य तुटलेले आहेत, परंतु जे अडखळले, ते शक्तीने सज्ज झाले आहेत.

  17. ज्यांच्याकडे भरपूर होते ते आता अन्नासाठी मजुरी करीत आहेत, परंतु जे भुकेले होते ते आता भुकेले नाहीत. जी अपत्यहीन होती तिने सात लेकरांना जन्म दिला आहे, परंतु जिला अनेक मुले होती ती क्षीण झाली आहे.

  18. “याहवेह मृत्यू आणतात आणि जिवंतही करतात; ते कबरेत घेऊन जातात आणि तिथून वरही काढतात.

  19. गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात; ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात.

  20. ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात; ते त्यांना राजपुत्रांबरोबर बसवितात, आणि त्यांना वतन म्हणून सन्मानाचे आसन प्राप्त होते. “कारण पृथ्वीचा पाया याहवेहचा आहे; त्यावरच त्यांनी जग स्थापले आहे.

  21. ते आपल्या प्रामाणिक सेवकांची पावले सांभाळतील, परंतु दुष्ट अंधकारमय ठिकाणी शांत केले जातील. “कोणीही बळाने विजय पावत नाही;

  22. जे याहवेहचा विरोध करतात त्यांचा चुराडा होईल. सर्वश्रेष्ठ याहवेह स्वर्गातून गर्जना करतील; पृथ्वीच्या शेवटचा न्याय याहवेह करतील. “ते आपल्या राजाला सामर्थ्य देतील, आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करतील.”

  23. धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्‍यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.

  24. पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.

  25. ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्‍या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.