मुख्य मजकुरावर जा

Paul बद्दल बायबलमधील वचने

619 वचने · 103 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा दुसर्‍या दिवशी, अग्रिप्पा व बर्णीका ही न्यायालयात मोठ्या रुबाबाने लष्करी अधिकार्‍यांच्या समवेत व शहरातील प्रमुख पुरुषांसह आले. फेस्ताच्या आदेशानुसार पौलाला न्यायालयात आणण्यात आले.

  2. मग फेस्त म्हणाले: “अग्रिप्पा महाराज आणि सर्व उपस्थिती लोकहो, या मनुष्याला पाहा! याच्याविरुद्ध सर्व यहूदी समाजाने यरुशलेम व कैसरीया, यांनी माझ्याकडे विनंती केली आहे आणि अशी ओरड करीत आहेत की त्याने अधिक काळ जिवंत राहू नये.

  3. माझ्या मते त्याने मृत्युदंडास योग्य असे काहीही केलेले नाही, परंतु त्याने बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला रोम या ठिकाणी पाठविण्याचे मी ठरविले आहे.

  4. परंतु मी महाराजांना निश्चित काय लिहून कळवावे हे मला समजत नाही आणि म्हणूनच मी त्याला तुम्हासर्वांपुढे व विशेषकरून अग्रिप्पा राजांपुढे चौकशी साठी आणले आहे, यासाठी की मला जे योग्य ते लिहिता येईल.

  5. कारण एखाद्या कैद्यावर असलेल्या कोणत्याही आरोपाचे स्पष्ट वर्णन केल्याशिवाय त्याला रोमला पाठविणे योग्य होणार नाही.”

  6. “मी लहानपणापासून स्वतःच्या देशात आणि यरुशलेममध्ये माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कसे जगलो हे सर्व यहूदीयांस चांगले माहीत आहे.

  7. ते मला बर्‍याच काळापासून ओळखतात आणि त्यांना मान्य असेल तर माझ्याबद्दल साक्षही देऊ शकतील, की आपल्या धर्माच्या पंथाबाबतीत मी नेहमीच कट्टर परूशी म्हणून जीवन जगलो.

  8. “मला वाटत होते की नासरेथकर येशूंच्या नावाविरुद्ध जितके काही शक्य होईल तितके करावे.

  9. आणि त्याप्रकारे मी यरुशलेममध्ये केले होते. तिथे प्रभूच्या अनेक लोकांना महायाजकाच्या अधिकाराने तुरुंगात डांबले आणि त्यांचा वध करण्याकरिता मी संमती देत असे.

  10. अनेकदा मी एका सभागृहातून दुसर्‍या सभागृहात जात असे व त्यांना शिक्षा करून, बळजबरीने ईश्वरनिंदा करावयास भाग पाडीत असे. त्यांचा छळ करण्यास मी इतका झपाटलेला होतो की परकीय शहरात देखील मी त्यांचा पाठलाग करीत असे.

  11. “मी अशाच एका प्रवासात असताना दिमिष्कमधून महायाजकांचे अधिकारपत्र व नियुक्तपत्र बरोबर घेऊन जात होतो.

  12. महाराज अग्रिप्पा, मी वाटेने जात असताना दुपारच्या सुमारास, सूर्यप्रकाशाहून अधिक तेजस्वी प्रकाश माझ्या आणि माझ्या सोबत्यांच्या भोवती आकाशातून तळपताना मी पाहिला.

  13. आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो, तेव्हा अरामी भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली. ‘शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस? पराणीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.’

  14. “मी विचारले, ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ “प्रभूने त्याला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे,

  15. आता उठून आपल्या पायांवर उभा राहा. मी तुला यासाठी दर्शन दिले आहे की जे तू माझ्याविषयी पाहिले व जे प्रकट होणार आहे त्याविषयी तुला सेवक व साक्षी नेमावे.

  16. मी तुझे लोक व गैरयहूदी लोक यांच्यापासून तुझी सुटका करेन. मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे

  17. यासाठी की त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी अंधकारातून प्रकाशाकडे, सैतानाच्या अधिकाराऐवजी परमेश्वराच्या सत्याकडे यावे, म्हणजे त्यांना पापक्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे पवित्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना वतन मिळावे.’

  18. आम्ही इटलीस तारवातून जावे असे ठरले, तेव्हा पौल आणि इतर काही बंदिवानांना बादशाही रक्षकांच्या फलटणीतील यूल्य नावाच्या शताधिपतीच्या ताब्यात देण्यात आले.

  19. तेव्हा आशियाच्या प्रांतातील किनार्‍यावरील अनेक बंदरावर थांबत जाणार्‍या व अद्रमुत्तीय शहरापासून निघालेल्या जहाजात बसून आम्ही समुद्राकडे निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथील रहिवासी अरिस्तार्ख नावाचा एक मनुष्य आमच्याबरोबर होता.

  20. दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोन बंदरात पोहोचलो; तेव्हा यूल्याने प्रेमाने पौलाला किनार्‍यावर उतरून मित्रांकडे जाण्याची परवानगी दिली म्हणजे त्याच्या मित्रांद्वारे त्याच्या गरजा भागविल्या जातील.

  21. तिथून आम्ही पुन्हा समुद्र प्रवासास निघाल्यावर तोंडासमोर वारा येत असल्यामुळे सायप्रसच्या उत्तरेला असलेले बेट आणि मुख्य भूमी यांच्यामधून गेलो.

  22. आम्ही समुद्राची यात्रा करून किलिकिया व पंफुल्या या प्रांतांच्या किनार्‍याने जाऊन लुक्यातील मूर्या येथे जाऊन पोहोचलो.

  23. तिथे शताधिपतीला इटलीस जाणारे आलेक्सांद्रियाचे तारू सापडले तेव्हा त्याने आम्हाला त्या तारवात बसविले.

  24. मग पुष्कळ दिवस आम्हाला मंद गतीने प्रवास करावा लागला आणि शेवटी आम्ही कनीदस बंदराजवळ आलो. वारा अद्याप तोंडासमोर येत असल्यामुळे क्रेताला वळसा घालून सलमोने शहराकडे जावे लागले.

  25. पुढे वादळी वार्‍यातून मोठ्या प्रयासाने हळूहळू मार्ग काढीत दक्षिणेकडील किनार्‍याने आम्ही सुंदर बंदर जे लसया शहराच्या जवळ होते तिथे आलो.