मुख्य मजकुरावर जा

The Miracles of Christ बद्दल बायबलमधील वचने

193 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एक कनानी स्त्री त्या भागातून येशूंकडे आली आणि त्यांना विनवणी करून म्हणाली, “प्रभू, दावीद राजाचे पुत्र, माझ्यावर दया करा! माझी मुलगी भूतग्रस्त झाली असून, ती पुष्कळ छळ सहन करीत आहे.”

  2. पण येशूंनी एका शब्दानेही तिला उत्तर दिले नाही; तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विनंती केली, “प्रभूजी, तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागे सारखी ओरडत येत आहे.”

  3. तेव्हा येशू त्या स्त्रीला म्हणाले, “हरवलेल्या इस्राएली मेंढराकडेच मला पाठविले आहे.”

  4. परंतु ती बाई पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.”

  5. येशू म्हणाले, “लेकरांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.”

  6. “हे प्रभू आपले म्हणणे अगदी बरोबर आहे!” स्त्रीने उत्तर दिले, “स्वामीच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”

  7. ते ऐकून येशू तिला म्हणाले, “बाई, तुझा विश्वास फार मोठा आहे! म्हणून तुझी विनंती मान्य करण्यात आली आहे.” आणि त्याच क्षणी तिची मुलगी बरी झाली.

  8. खूप मोठी गर्दी त्यांच्याजवळ जमली. लोकांनी आपल्यातील लंगडे, आंधळे, मुके, अपंग आणि इतर रोगांनी आजारी असलेल्यांना त्यांच्या चरणांजवळ आणले आणि त्या सर्वांना त्यांनी बरे केले.

  9. येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलाविले आणि म्हणाले, “मला या लोकांचा कळवळा येतो. कारण ते तीन दिवसापासून आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. त्यांना तसेच उपाशी पाठवून देण्याची माझी इच्छा नाही, तसे केले तर ते रस्त्यातच कोसळून पडतील.”

  10. शिष्यांनी उत्तर दिले, “एवढ्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?”

  11. येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात आणि काही लहान मासे.”

  12. तेव्हा त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले.

  13. मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले आणि त्या मोडल्या व शिष्यांना दिल्या आणि त्यांनी ते लोकांना वाढले.

  14. ते सर्वजण जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या.

  15. स्त्रिया व लेकरांशिवाय जे जेवले ते चार हजार पुरुष होते.

  16. सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले;

  17. तिथे त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले, त्यांचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्यांची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.

  18. त्याचवेळी मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले.

  19. तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “प्रभूजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल. आपली इच्छा असेल, तर मी येथे तीन मंडप उभारेन एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.”

  20. पण तो हे बोलत असतानाच, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी ऐकू आली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका!”

  21. ही वाणी कानी पडताच, शिष्य अतिशय भयभीत झाले आणि जमिनीवर पालथे पडले.

  22. पण येशूंनी येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाले, “उठा, भिऊ नका!”

  23. जेव्हा त्यांनी वर पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांना कोणीही दिसले नाही.

  24. जेव्हा ते समुदायाकडे आले, त्यातील एक मनुष्य येशूंकडे आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला,

  25. “प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेपरेकरी आहे आणि त्यामुळे त्याला फार यातना भोगाव्या लागतात. तो वारंवार अग्नीत नाही तर पाण्यात पडतो.