The Miracles of Christ बद्दल बायबलमधील वचने: His transfiguration
His transfiguration बद्दल वचने
सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले;
तिथे त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले, त्यांचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्यांची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.
त्याचवेळी मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले.
तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “प्रभूजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल. आपली इच्छा असेल, तर मी येथे तीन मंडप उभारेन एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.”
पण तो हे बोलत असतानाच, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी ऐकू आली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका!”
ही वाणी कानी पडताच, शिष्य अतिशय भयभीत झाले आणि जमिनीवर पालथे पडले.
पण येशूंनी येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाले, “उठा, भिऊ नका!”
जेव्हा त्यांनी वर पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांना कोणीही दिसले नाही.