Skip to content

Sodom बद्दल बायबलमधील वचने

91 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ही गोष्ट तुमच्यापासून दूर असो—की तुम्ही दुष्टांच्या बरोबर नीतिमान लोकांनाही मारून टाकावे, नीतिमान आणि दुष्टांना सारखेच लेखावे हे तुमच्यापासून दूर असो! सर्व पृथ्वीचे न्यायाधीश, जे योग्य ते करणार नाहीत का?”

  2. याहवेहने उत्तर दिले, “त्या सदोम शहरात मला जर पन्नास नीतिमान लोक आढळले, तर त्यांच्यासाठी मी त्या सर्व शहराची गय करेन.”

  3. मग अब्राहाम पुन्हा म्हणाला, “मी धूळ आणि राख असून, मी प्रभूशी बोलण्याचे धैर्य केले आहे,

  4. जर नीतिमानांची संख्या पाच कमी पन्नास असली तर काय? पाच लोक कमी आहेत म्हणून तुम्ही त्या संपूर्ण शहराचा नाश करणार काय?” याहवेहने उत्तर दिले “मला तिथे पंचेचाळीस भेटले, तरी मी त्याचा नाश करणार नाही.”

  5. अब्राहाम पुन्हा याहवेहला म्हणाला, “तिथे फक्त चाळीस असले तर काय?” याहवेहने उत्तर दिले, “त्या चाळिसांसाठी, मी नाश करणार नाही.”

  6. मग तो म्हणाला, “प्रभूला राग येऊ नये, पण मला बोलू द्यावे. फक्त तीसच मिळाले तर?” याहवेहने उत्तर दिले, “तिथे तीस सापडले, तरी मी नाश करणार नाही.”

  7. मग अब्राहाम म्हणाला, “मी प्रभूशी बोलण्याचे खूप धैर्य केले आहे, तिथे जर वीसच नीतिमान लोक असले तर?” त्यांनी म्हटले, “त्या विसांसाठी मी त्यांचा नाश करणार नाही.”

  8. मग तो म्हणाला, “प्रभूला राग न येवो, पण मला एकदाच बोलू द्यावे. तिथे फक्त दहाच सापडले तर?” याहवेहने उत्तर दिले, “त्या दहांच्यासाठी मी त्याचा नाश करणार नाही.”

  9. जेव्हा याहवेहने अब्राहामाशी आपले बोलणे संपविले, ते निघून गेले आणि अब्राहाम घरी परतला.

  10. त्याच संध्याकाळी ते दोन दूत सदोमास पोहोचले. लोट नगराच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना भेटण्यासाठी तो उठून उभा राहिला आणि आपले डोके भूमीकडे लववून त्याने दंडवत घातले.

  11. लोट त्यांना म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून आज रात्री तुम्ही आपल्या सेवकाच्या घरी या. आपण आपले पाय धुवावे आणि रात्री इथे मुक्काम करावा, मग पहाटे तुमच्या पुढील प्रवासास निघा.” ते म्हणाले, “नको, आम्ही चौकातच रात्र घालवू.”

  12. पण लोटाने फारच आग्रह केल्यामुळे ते त्याच्याबरोबर त्याच्या घरात गेले. त्याने त्यांच्यासाठी बेखमीर भाकरीचे भोजन तयार केले, आणि ते जेवले.

  13. ते झोपण्याच्या आधी, सदोम शहराच्या प्रत्येक भागातील सर्व पुरुषांनी—तरुणांपासून वृद्धांपर्यंत—लोटाच्या घराला वेढा घातला.

  14. लोटाला ते ओरडून म्हणाले, “जे पुरुष तुझ्याकडे आज रात्री आले ते कुठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.”

  15. लोट त्यांच्याबरोबर बोलण्यास बाहेर गेला आणि आपल्यामागे दार लावून घेतले.

  16. “आणि म्हणाला, नाही माझ्या मित्रांनो, असे भयंकर दुष्कर्म करू नका.

  17. पाहा, मला दोन कन्या आहेत ज्या अजून कुमारिका आहेत. त्यांना मी तुमच्या स्वाधीन करतो; त्यांच्याशी तुम्हाला पाहिजे तसे वागा, पण या दोन माणसांच्या वाटेला जाऊ नका, कारण ते माझ्या आश्रयाला आले आहेत.”

  18. “आमच्या मार्गातून दूर जा,” ते म्हणाले. “हा मनुष्य इथे परदेशी म्हणून आला होता आणि आता त्याला न्यायाधीशाची भूमिका करावयाची आहे! आम्ही तुम्हाला त्याच्यापेक्षा वाईट वागवू.” ते लोटावर दबाव टाकत राहिले आणि दार तोडण्यासाठी पुढे गेले.

  19. पण आतील त्या पुरुषांनी लोटाला घरात ओढून घेतले आणि दार बंद केले.

  20. मग तरुण आणि वृद्ध पुरुष जे घराच्या दरवाजात होते, त्यांना त्यांनी अंधत्वाचा असा फटका दिला की त्यांना दरवाजा सापडेना.

  21. ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “या ठिकाणी तुझे जावई, मुले किंवा मुली किंवा अजून कोणी या शहरात जे तुझे आपले असे आहे काय? त्यांना येथून बाहेर काढ,

  22. कारण आम्ही या शहराचा नाश करणार आहोत. याहवेहपर्यंत या लोकांविरुद्ध आलेला आक्रोश इतका मोठा आहे की त्यांनी आम्हाला त्याचा नाश करण्यासाठी पाठविले आहे.”

  23. तेव्हा लोट आपल्या जावयांकडे गेला, जे त्याच्या मुलींशी विवाह करण्यास वचनबद्ध होते. तो म्हणाला, “घाई करा आणि या ठिकाणातून बाहेर चला, कारण याहवेह या शहराचा नाश करणार आहेत!” पण त्याच्या जावयांना वाटले की, तो विनोद करीत आहे.

  24. पहाट होताच, दूत लोटाला आग्रह करीत म्हणाले, “त्वरा कर! तुझी पत्नी व तुझ्या दोन कन्या ज्या इथे आहेत त्यांना घेऊन नीघ, नाहीतर या नगराचा नाश होत असताना तुझाही नाश होईल.”

  25. पण लोट आढेवेढे घेऊ लागला, तेव्हा दूतांनी त्याचा, त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोन्ही कन्यांचे हात धरून त्यांना नगराबाहेर एका सुरक्षित ठिकाणी आणून सोडले, कारण त्या कुटुंबावर याहवेहची कृपा होती.