Skip to content

Sodom बद्दल बायबलमधील वचने

91 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, माझ्या जिवाची शपथ, तू व तुझ्या मुलींनी केलेली कृत्ये तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुलींनी केली नाहीत.

  2. “ ‘तुझी बहीण सदोम हिचे अपराध हे होते: ती व तिच्या मुली अहंकारी, खादाड व इतरांची काळजी न करणार्‍या अशा होत्या; त्यांनी गरीब व गरजवंतांना मदत केली नाही.

  3. त्या उन्मत्त असून माझ्यासमोर त्यांनी अमंगळ कृत्ये केली. म्हणून मी त्यांना माझ्यापासून दूर केले ते तर तू पाहिलेच आहे.

  4. शोमरोनने तर तुझ्या तुलनेत अर्धीसुद्धा पातके केली नाहीत. तू त्यांच्यापेक्षा अधिक अमंगळ कृत्ये केली आहेत आणि तू अशी कृत्ये करून तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे.

  5. आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींचे काही प्रमाणात समर्थन केले आहे. कारण तुझी पापे त्यांच्याहून अधिक घाणेरडी होती, तुझ्या बहिणी तुझ्यापेक्षा अधिक नीतिमान दिसतात. तर मग, लाज धर आणि आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे.

  6. “ ‘तथापि, सदोम व तिच्या मुलींची संपत्ती मी पुनर्स्थापित करेन आणि शोमरोन व तिच्या मुली व त्यांच्याबरोबर तुझीही संपत्ती पुनर्स्थापित करेन,

  7. यासाठी की त्यांचे सांत्वन करताना तू तुझा कलंक वाहून घेशील आणि तू केलेल्या कृत्यांची तुला लाज वाटेल.

  8. तुझ्या बहिणी सदोम व तिच्या मुली आणि शोमरोन व तिच्या मुली, त्यांच्या पूर्वस्थितीत परत जातील; आणि तू व तुझ्या मुली सुद्धा तुमच्या पूर्वस्थितीत परत जाल.

  9. तुझ्या गर्वाच्या दिवसात जेव्हा तुझी दुष्टता प्रगट झाली नव्हती, तेव्हा तू तर तुझी बहीण सदोमचे नाव देखील घेत नसे. त्याचप्रमाणे, आता, अरामाच्या कन्या व त्यांचे सर्व शेजारी आणि पलिष्ट्यांच्या कन्या यांनी तुझी अप्रतिष्ठा केली—तुझ्या सभोवती असलेल्या सर्वांनी तुला तुच्छ मानले.

  10. “तुमच्यातील काहींचा नाश असा केला जसा मी, परमेश्वराने, सदोम आणि गमोराचा केला. तुम्ही अग्नीच्या भट्टीतून ओढून काढलेल्या जळत्या काठीप्रमाणे होता, तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.

  11. म्हणून माझ्या जिवाची शपथ,” इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. “निश्चितच मोआब हा सदोमासारखा, अम्मोनी गमोरासारखा होईल तण वाढलेले ठिकाण व मिठाची आगरे कायमची ओसाड ठिकाणे होतील. माझे अवशिष्ट लोक त्यांची लूट करतील; माझे अवशिष्ट राष्ट्र त्यांच्या भूमीचे वारस बनतील.”

  12. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल.

  13. ज्या दिवशी लोटाने सदोम शहर सोडले, त्याच दिवशी अग्नी आणि गंधकाचा स्वर्गातून वर्षाव झाला आणि त्या सर्वांचा नाश झाला.

  14. यशायाहने आधी म्हटल्याप्रमाणे: “सेनाधीश प्रभूने जर आमचे वंशज वाचविले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो आणि गमोरासारखी आमची गत झाली असती.”

  15. पुढे येणार्‍या अनीतिमानास उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्यांची राख केली व त्यांनी त्यांना विध्वंसाची शिक्षा केली.

  16. त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.