मुख्य मजकुरावर जा

Select Readings बद्दल बायबलमधील वचने

802 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे परमेश्वरा, तुमचे मार्ग पवित्र आहेत. आपल्या परमेश्वरासारखा समर्थ ईश्वर कोणी आहे का?

  2. चमत्कार व अद्भुत गोष्टी करणारे परमेश्वर तुम्हीच आहात; तुम्ही आपले सामर्थ्य लोकांमध्ये प्रगट करता.

  3. जे याकोबाचे आणि योसेफाचे वंशज आहेत, त्यांना तुम्ही आपल्या भुजांनी मुक्त केले आहे. सेला

  4. परमेश्वरा, जलांनी तुम्हाला पाहिले, जलांनी तुम्हाला पाहिले आणि ते धडपडू लागले! त्यांच्या खोल तळापर्यंत धक्का बसला.

  5. मेघांनी मुसळधार पाऊस पाडला; मेघगर्जनेने गडगडाट करून आकाश दुमदुमून टाकले; तुमचे बाण आकाशातून या टोकापासून त्या टोकापर्यंत चमकले.

  6. चक्रीवादळामध्ये गर्जना झाली; विजेच्या लखलखाटाने संपूर्ण जग प्रकाशित झाले; पृथ्वी थरारली आणि डळमळली.

  7. तुमच्या पावलांचे ठसे दिसत नसले, तरी तुमची वाट समुद्रातून गेली होती; तुमचा मार्ग प्रचंड जलाशयातून गेला होता.

  8. मोशे व अहरोन यांच्याद्वारे मेंढरांच्या कळपाप्रमाणे तुम्ही आपल्या लोकांना नेले.

  9. संगीत निर्देशकाकरिता. गित्तीथ वर आधारित. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. हे सर्वशक्तिमान याहवेह, तुमचे निवासस्थान किती रम्य आहे!

  10. याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी, मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे; माझा जीव व माझा देह जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.

  11. हे सर्वशक्तिमान याहवेह, माझ्या राजा आणि माझ्या देवा, तुमच्या वेद्यांजवळ चिमणीला घरटी बांधण्याचे, व निळवीला देखील आपली पिल्ले ठेवण्याचे ठिकाण सापडले आहे.

  12. जे तुमच्या मंदिरात राहू शकतात, ते किती धन्य आहेत; ते निरंतर तुमचे स्तवन करतात. सेला

  13. ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत, ज्यांचे अंतःकरण तुमच्या मार्गाचे यात्रेकरू आहेत.

  14. ते बाका दरीतून जात असताना, ती त्यांना झर्‍यांचे स्थान होईल; शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील.

  15. सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत, त्यांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढेल.

  16. याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका; याकोबाच्या परमेश्वरा, माझे ऐका. सेला

  17. हे परमेश्वरा, तुम्ही आमच्या ढालीवर दृष्टी टाका; आपल्या अभिषिक्तावर कृपादृष्टी करा.

  18. तुमच्या अंगणात घालविलेला एक दिवस, इतर कुठेही घालविलेल्या सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या मंडपात राहण्यापेक्षा, माझ्या परमेश्वराच्या भवनाचा द्वारपाल होऊन राहण्यात मला अधिक आनंद आहे.

  19. कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत; ते आम्हाला कृपा व गौरव देतात; जे निष्कलंक असतात, त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.

  20. सर्वशक्तिमान याहवेह, जे लोक तुमच्यावर भाव ठेवतात, ते कितीतरी धन्य होत.

  21. एक स्तोत्र. याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा, कारण त्यांनी अद्भुत कार्य केले आहे; त्यांच्या उजव्या हाताने व पवित्र बाहूंनी तारण मिळविण्याचे कार्य केले आहे.

  22. याहवेहने त्यांचे तारण सर्व पृथ्वीला दाखविले आहे, आणि राष्ट्रांसमक्ष आपली नीतिमत्ता प्रकाशित केली आहे.

  23. इस्राएलवरील त्यांची प्रीती आणि त्यांच्या विश्वसनीयतेचे त्यांना स्मरण झाले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आपल्या परमेश्वराने केलेले तारण पाहिले आहे.

  24. अगे पृथ्वी, याहवेहकरिता अत्यानंदाने हर्षोल्लास कर, संगीतासह उचंबळून हर्षगीत गा;

  25. वीणेवरील संगीताच्या साथीने याहवेहचे स्तवन करा, वीणेच्या तालात आणि गीतांच्या सुरात गा,