मुख्य मजकुरावर जा

Select Readings बद्दल बायबलमधील वचने: Paul and Silas in prison

25 वचने · 47 पैलू

"Select Readings" साठी शोधा

Paul and Silas in prison बद्दल वचने

  1. एकदा आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असताना, आम्हाला एक गुलाम मुलगी भेटली जिच्यामध्ये अशुद्ध आत्मा असून त्याच्या साहाय्याने ती भविष्य सांगत असे. भविष्यकथन करून ती आपल्या धन्यांना खूप पैसा मिळवून देत असे.

  2. ती पौलाच्या आणि आमच्यामागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर परमेश्वराचे सेवक आहेत आणि तारण कसे मिळेल याचा मार्ग हे तुम्हाला सांगत आहेत.”

  3. असे ती पुष्कळ दिवस करत होती. शेवटी पौल अत्यंत त्रस्त झाला आणि तिच्याकडे वळून तिच्यातील आत्म्याला म्हणाला, “मी येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला आज्ञा करतो की तिच्यातून बाहेर नीघ!” आणि त्या क्षणी तो आत्मा तिच्यातून निघून गेला.

  4. आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्‍यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले.

  5. त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, “ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत

  6. आम्ही रोमी लोकांनी जे नियम स्वीकारणे व आचरणे योग्य नाहीत, अशा नियमांची ते वकिली करत आहेत.”

  7. मग पौल व सीलावर हल्ला करण्यात लोकसमूह सामील झाला, तेव्हा न्यायाधीशांनी त्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारण्याचा हुकूम दिला.

  8. त्यांना निष्ठुरपणे पुष्कळ फटके मारल्यानंतर तुरुंगात टाकण्यात आले आणि तुरुंगाच्या पहारेकर्‍याला त्यांच्यावर बंदोबस्ताने पहारा ठेवण्याचा हुकूम देण्यात आला.

  9. असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले.

  10. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते.

  11. अचानक तीव्र भूकंपाने तुरुंगाचा पाया डळमळला. एकाएकी तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि सर्व कैद्यांचे साखळदंड मोकळे झाले.

  12. तुरुंगाचा नायक झोपेतून जागा झाला आणि तुरुंगाचे सर्व दरवाजे सताड उघडे पाहून, सर्व कैदी पळून गेलेले असावेत असे समजून तो तलवार उपसून स्वतःला ठार करणार होता.

  13. परंतु पौल ओरडून म्हणाला, “तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!”

  14. तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला.

  15. त्याने त्यांना बाहेर आणले आणि विचारले, “महाराज, माझे तारण व्हावे, म्हणून मी काय करावे?”

  16. त्यांनी सांगितले, “प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”

  17. तेव्हा त्यांनी त्याला व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.

  18. मग रात्रीच्या त्याच घटकेस तुरुंगाच्या नायकाने त्यांच्या जखमा धुतल्या आणि लगेच त्याने व त्याच्या सर्व कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला.

  19. त्या नायकाने त्यांना आपल्या घरी आणले व त्यांच्यापुढे भोजन वाढले; तो व त्याच्या कुटुंबातील सर्व लोक परमेश्वरावरील विश्वासात आल्यामुळे अत्यंत आनंदित झाले होते.

  20. पहाट झाल्यानंतर, न्यायाधीशांनी त्यांच्या अधिकार्‍यांना त्या तुरुंगाच्या नायकाकडे पाठवून त्यांना हुकूम दिला: “त्या माणसांना सोडून द्या.”

  21. तेव्हा तुरुंगाच्या नायकाने पौलाला सांगितले, “न्यायाधीशांनी हुकूम दिला आहे की, पौल व सीला यांना जाऊ द्यावे, आता तुम्ही जाऊ शकता. शांतीने जा.”

  22. परंतु पौल अधिकार्‍यांना म्हणाला: “त्यांनी आमची चौकशी न करता आम्हाला जाहीरपणे फटके मारले आणि आम्ही रोमी नागरिक असतानाही आम्हास तुरुंगात डांबले. आता आम्ही गुपचूप निघून जावे, अशी त्यांची इच्छा आहे काय? त्यांनी स्वतः येऊन आम्हास मुक्त करावे.”

  23. अधिकार्‍यांनी जाऊन हे शब्द न्यायाधीशांना कळविले, पौल व सीला हे रोमी नागरिक आहेत, हे त्यांना समजले तेव्हा ते घाबरले.

  24. आणि त्यांना शांत करण्यासाठी ते स्वतः तुरुंगात आले आणि तुरुंगाच्या बाहेर आणून, ते शहर सोडून जावे अशी त्यांना विनंती केली.

  25. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पौल व सीला हे लुदियेच्या घरी गेले आणि बंधू भगिनींना भेटून त्यांना उत्तेजित केले. नंतर ते तिथून निघाले.