मुख्य मजकुरावर जा

Parents बद्दल बायबलमधील वचने: Involved in children's wickedness

23 वचने · 48 पैलू

Involved in children's wickedness बद्दल वचने

  1. परमेश्वराचा एक मनुष्य एलीकडे आला आणि त्याला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तुझे पूर्वज इजिप्तमध्ये फारोहच्या दास्यात असताना मी त्यांना स्पष्टपणे प्रगट झालो नाही काय?

  2. माझे याजक व्हावे, धूप जाळावे, माझ्या वेदीकडे जावे व माझ्या समक्षतेत एफोद घालावा म्हणून इस्राएलच्या सर्व गोत्रांतून मी तुझ्या पूर्वजांना निवडले. त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी दिलेले सर्व अन्नार्पण मी तुझ्या पूर्वजांच्या कुटुंबांला दिले.

  3. माझे जे यज्ञ व अर्पणे मी माझ्या मंदिरासाठी नेमून दिली आहेत त्याचा तुम्ही अवमान का करता? माझ्या इस्राएली लोकांनी केलेल्या अर्पणातून सर्वोत्तम भाग खाऊन तू स्वतःला पुष्ट करून माझ्यापेक्षा तुझ्या पुत्रांचा जास्त सन्मान का करतो?’

  4. “म्हणून याहवेह इस्राएलचे परमेश्वर, असे जाहीर करतात: ‘मी वचन दिले होते की, तुझ्या कुटुंबातील सदस्य सर्वकाळ माझ्यासमोर सेवा करतील.’ परंतु आता याहवेह असे जाहीर करतात: ‘ते माझ्यापासून दूर असो! जे माझा सन्मान करतात त्यांचा मी सन्मान करेन, परंतु जे माझा अवमान करतात त्यांचा अवमान होईल.’

  5. अशी वेळ येत आहे की, मी तुझी आणि तुझ्या याजकीय घराण्याची शक्ती कमी करेन, म्हणजे त्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाही,

  6. आणि माझ्या वस्तीत तू मोठे दुःख पाहशील. जरी इस्राएली लोकांचे भले केले जाईल तरी तुझ्या घराण्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाहीत.

  7. तुमच्यापैकी ज्यांना मी माझ्या वेदीवरील सेवा करण्यापासून दूर करणार नाही, त्यांच्यापैकी तुझी मात्र नजर मी क्षीण करेन व तुझ्या शक्तीचा नाश करेन आणि तुझे सर्व वंशज भर तारुण्यात मरतील.

  8. “ ‘आणि तुझे दोन पुत्र, होफनी आणि फिनहास यांच्यावर जे येईल, ते तुला एक चिन्ह असे असतील—ते दोघेही एकाच दिवशी मरण पावतील.

  9. मी माझ्यासाठी एक विश्वासू याजक पुढे आणेन, जो माझ्या अंतःकरणात आणि माझ्या मनात जे आहे त्यानुसार करेल. मी त्याचे याजकीय घराणे स्थिर स्थापित करेन आणि ते निरंतर माझ्या अभिषिक्तासमोर सेवा करतील.

  10. नंतर तुझ्या घराण्यातील राहिलेला प्रत्येकजण येईल आणि चांदीच्या तुकड्यासाठी आणि भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यासमोर वाकतील आणि विनंती करतील, “मला खाण्यासाठी अन्न असावे म्हणून माझ्यासाठी काही याजकीय पद द्या.” ’ ”

  11. तेव्हा पलिष्टी लढले आणि इस्राएली लोकांचा पराभव झाला आणि प्रत्येक पुरुष आपआपल्या छावणीकडे पळून गेला. आघात खूप मोठा होता; इस्राएलने तीस हजार पायदळ गमावले.

  12. परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आणि एलीचे दोन्ही पुत्र होफनी आणि फिनहास मारले गेले.

  13. त्याच दिवशी बिन्यामीन वंशातील एक मनुष्य, फाटलेले कपडे आणि डोक्यावर धूळ घातलेला असा युद्धभूमीतून निघून पळत शिलोह येथे गेला.

  14. जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा एली रस्त्याच्या कडेला त्याच्या आसनावर बसून पाहत होता, कारण परमेश्वराच्या कोशासाठी त्याचे हृदय कापत होते. जेव्हा तो मनुष्य नगरात आला आणि जे घडले ते सांगितले तेव्हा संपूर्ण नगरात मोठ्याने आकांत सुरू झाला.

  15. एलीने हे रडणे ऐकून विचारले, “हा मोठ्याने रडण्याचा आवाज कशाचा आहे?” तो मनुष्य घाईने एलीकडे गेला,

  16. एली अठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद असल्याने त्याला दिसत नव्हते.

  17. त्याने एलीला सांगितले, “मी आताच युद्धभूमीवरून आलो आहे; मी आजच तिथून पळून आलो आहे.” एलीने विचारले, “माझ्या मुला, काय घडले आहे?”

  18. ज्या मनुष्याने बातमी आणली होती त्याने उत्तर दिले, “इस्राएलने पलिष्ट्यांपुढून पळ काढला आणि सैन्याचा मोठा वध झाला. तुझे दोघे पुत्र होफनी आणि फिनहास सुद्धा मारले गेले आहेत आणि परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”

  19. जेव्हा त्याने परमेश्वराच्या कोशाचा उल्लेख केला, एली वेशीजवळच्या आसनावरून मागे खाली पडला. त्याची मान मोडली आणि तो मरण पावला, कारण तो वृद्ध आणि जड अंगाचा मनुष्य होता. त्याने चाळीस वर्षे इस्राएली लोकांचे पुढारीत्व केले होते.

  20. त्याची सून फिनहासाची पत्नी, तेव्हा गरोदर असून तिचा प्रसूतिकाळ जवळ आला होता. जेव्हा तिने ऐकले की, परमेश्वराचा कोश हस्तगत केला गेला आहे आणि तिचा सासरा आणि तिचा पती मरण पावले आहेत, तेव्हा तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या व ती प्रसूत झाली, परंतु तिच्या प्रसूती वेदनांनी तिच्यावर मात केली.

  21. तिच्या मरणाच्या वेळी, तिच्या सभोवताली ज्या स्त्रिया होत्या, त्या म्हणाल्या, “भिऊ नकोस; तू एका मुलाला जन्म दिलेला आहेस.” परंतु तिने काही उत्तर दिले नाही किंवा लक्षही दिले नाही.

  22. त्या मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवत ती म्हणाली, “इस्राएलचे वैभव निघून गेले आहे,” कारण परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे आणि तिच्या सासर्‍याचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.

  23. ती म्हणाली, “इस्राएलमधून वैभव निघून गेले आहे, परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”