Skip to content

Midianites बद्दल बायबलमधील वचने

83 वचने · 28 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह मोशेला म्हणाले,

  2. “मिद्यानी लोकांना शत्रू समजून त्यांना जिवे मारा.

  3. कारण त्यांनी तुम्हाला शत्रू मानले, जेव्हा पेओरच्या घटनेत तुम्हाला फसविण्यासाठी आपली बहीण, मिद्यानी पुढार्‍याची मुलगी कजबी हिचा त्यांनी उपयोग केला व त्या घटनेमुळे पीडा आली, तेव्हा तिला जिवे मारण्यात आले.”

  4. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  5. “इस्राएली लोकांसाठी मिद्यानी लोकांचा सूड घे. त्यानंतर तू तुझ्या लोकांत मिळविला जाशील.”

  6. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “मिद्यानी लोकांशी युद्ध करावे म्हणून तुम्ही आपल्यातील काही पुरुषांना सिद्ध करा, म्हणजे ते याहवेहच्या वतीने त्यांचा सूड घेतील.

  7. इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक हजार पुरुषांना युद्धासाठी पाठवा.”

  8. तेव्हा युद्धासाठी बारा हजार पुरुष सशस्त्र झाले, प्रत्येक गोत्रातून एक हजार असे इस्राएलच्या कुळातून ते पुरविण्यात आले.

  9. एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासाने आपल्याबरोबर पवित्रस्थानातील साहित्य व इशारा देण्यासाठी कर्णे घेतले होते, त्याच्यासह मोशेने प्रत्येक गोत्रातील एक हजार पुरुषांना युद्धात पाठवले.

  10. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे ते मिद्यानी लोकांशी लढले व त्यांनी प्रत्येक पुरुषाला जिवे मारले.

  11. ज्या लोकांचा त्यांनी वध केला ते मिद्यानांचे पाच राजे म्हणजे एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा हे होते. त्यांनी बौराचा पुत्र बलाम यालाही तलवारीने जिवे मारले.

  12. इस्राएली लोकांनी मिद्यानी स्त्रिया व लेकरे यांना कैद केले आणि मिद्यानी गुरे व शेरडेमेंढरे व मालमत्ता लूट म्हणून घेतले.

  13. मिद्यानी लोक ज्या नगरांमध्ये स्थायिक होते त्यांच्या सर्व छावण्या त्यांनी जाळून टाकल्या.

  14. त्यांनी सर्व लोक व जनावरे यासह सर्व लूट व मालमत्ता घेतली,

  15. आणि कैदी, लूट, जनावरे यांना मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेकडील छावणीत मोशे, एलअज़ार याजक आणि इतर इस्राएलच्या मंडळीसमोर आणले.

  16. इस्राएली लोकांनी पुन्हा याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले, म्हणून त्यांनी त्यांना सात वर्षे मिद्यानी लोकांच्या हाती दिले.

  17. कारण मिद्यानाचे सामर्थ्य अत्यंत जुलमी असल्यामुळे, इस्राएली लोकांनी डोंगरातील फटी, गुहा आणि किल्ल्यांमध्ये स्वतःसाठी आश्रयस्थान तयार केले.

  18. जेव्हा कधी इस्राएली लोक आपल्या पिकांची पेरणी करीत, तेव्हा मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील लोक देशावर आक्रमण करत असत.

  19. त्यांनी तेथील जमिनीवर तळ ठोकला आणि गाझापर्यंत पिकांची नासाडी केली आणि इस्राएलसाठी मेंढ्या, गुरे, गाढवेही त्यांनी जिवंत ठेवली नाहीत.

  20. ते टोळांच्या समुहासारखे त्याचे तंबू आणि त्यांचे पशुधन घेऊन आले. त्यांना किंवा त्यांचे उंट मोजणे शक्य नव्हते; त्यांनी ती भूमी उद्ध्वस्त करण्यासाठी आक्रमण केले.

  21. अशा रीतीने या मिद्यानी लोकांमुळे इस्राएलाची अवस्था इतकी निकृष्ट व कंगाल झाली, की ते मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले.

  22. याहवेहचा दूत आला आणि ओफराह येथील एला वृक्षाखाली बसला. तो वृक्ष अबियेजरी योआशच्या मालकीचा होता, जिथे त्याचा पुत्र गिदोन मिद्यानी लोकांपासून वाचविण्यासाठी द्राक्षकुंडात गहू मळत होता.

  23. जेव्हा याहवेहचा दूत गिदोनाच्या पुढे प्रगट झाला आणि त्यास म्हणाला, “हे बलवान सैनिका, याहवेह तुझ्याबरोबर आहेत.”

  24. गिदोन त्यास म्हणाला, “महाराज, मला माफ करा, परंतु जर याहवेह आमच्यासह असते तर हे सर्व आमच्यासोबत का घडले? आमच्या पूर्वजांनी सांगितलेले त्यांचे सर्व चमत्कार कुठे आहेत, जेव्हा ते म्हणाले, ‘परमेश्वराने आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले नाही का?’ पण आता याहवेहने आम्हाला सोडून दिले आहे आणि आम्हाला मिद्यानच्या हाती दिले आहे.”

  25. याहवेह त्याच्याकडे वळून म्हणाले, “आपल्या बळाचा उपयोग कर आणि जा इस्राएलला मिद्यान्यांच्या हातून सोडव. मी तुला पाठवित नाही का?”