मुख्य मजकुरावर जा

The Power of God बद्दल बायबलमधील वचने

89 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल.”

  2. तेव्हा ते जादूगार फारोहला म्हणाले, “ही परमेश्वराची अंगुली आहे.” पण याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहचे हृदय कठीण होते आणि त्याने त्यांचे ऐकले नाही.

  3. तर शेतातील तुमची जनावरे—घोडे, गाढवे, उंट व शेळ्यामेंढ्यांचे कळप यांच्यावर याहवेहचा हात भयानक पीडा आणेल.

  4. वास्तविक मी आतापर्यंत माझा हात लांब करून तुला व तुझ्या लोकांना अशा पीडेने मारून या पृथ्वीतून तुम्हाला नष्ट केले असते.

  5. परंतु मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.

  6. हे याहवेह, तुमचा उजवा हात, सामर्थ्याने ऐश्वर्यमान आहे. हे याहवेह तुमच्या उजव्या हाताने, शत्रूला हादरून टाकले.

  7. सर्व दैवतांमध्ये हे याहवेह तुमच्यासारखे कोण आहे? पवित्रतेत ऐश्वर्यमान; वैभवात अद्वितीय, आश्चर्यकर्मे करणारे, असे तुमच्यासारखे कोण आहे?”

  8. तुम्ही आपला उजवा हात उगारला, आणि पृथ्वीने तुमच्या शत्रूंना गिळून टाकले.

  9. “हे सार्वभौम याहवेह, तुमची महानता आणि तुमचा बलवान हात तुमच्या दासाला दाखविण्यास तुम्ही आरंभ केला आहे. स्वर्गात किंवा पृथ्वीवर असे कोणते दैवत आहे की, ज्याला तुमच्यासारखी थोर व महान कृत्ये करता येतील?

  10. “आता पाहा मीच एकमेव आहे तो आहे! माझ्याशिवाय इतर कोणताही ईश्वर नाही. माझ्या आदेशानेच मृत्यू येतो आणि जीवनही मीच प्रदान करतो. मी जखम केली आणि मी ती बरीही करेन, माझ्या हातून सोडविणारा कोणीही नाही.

  11. योनाथान त्याच्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंती लोकांच्या चौकीकडे जाऊ या. कदाचित याहवेह आपल्या बाजूने कार्य करतील, कारण याहवेहने आमचे तारण करू नये म्हणून त्यांना कोण अडखळविणार? मग ते पुष्कळांद्वारे असो किंवा थोडक्यांद्वारे.”

  12. याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे; गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो, पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे! याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे; तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.

  13. श्रीमंती व सन्मान तुमच्याकडूनच येतात; तुम्ही सर्व गोष्टीचे शासक आहात. सर्वांना मोठेपणा व सामर्थ्य देण्याकरिता केवळ तुमच्याच बाहूत सामर्थ्य आणि अधिकार आहे.

  14. कारण ज्यांची अंतःकरणे याहवेह यांच्याबरोबर पूर्णपणे वचनबद्ध आहेत, त्यांना बळ देण्यासाठी त्यांची दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर व्याप्त आहे. तुम्ही मूर्खपणा केला आहे आणि आतापासून तुम्ही युद्धात असाल.”

  15. कारण प्रवासात शत्रूपासून संरक्षण मिळावे म्हणून राजाजवळ सैनिक व स्वार मागण्याची मला लाज वाटली. आम्ही राजाला आधीच सांगितले होते, “जे आमच्या परमेश्वराची भक्ती करतात, त्यांचा वरदहस्त त्यांच्यावर असतो आणि जे त्यांना सोडतात, त्यांच्यावरच अरिष्ट येते.”

  16. “ते तुमचेच सेवक व लोक आहेत, ज्यांना तुम्ही आपल्या महान शक्तीने व समर्थ हाताने सोडविले आहे.

  17. आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे, व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात.

  18. त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे. त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?

  19. आकलन करू शकत नाही अशी अद्भुत कृत्ये; आणि मोजता येत नाहीत असे चमत्कार ते करतात.

  20. परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत; आम्ही मात्र त्यांचा कानोसा घेऊ शकतो! त्यांच्या सामर्थ्याचा गडगडाट कोण समजू शकणार?”

  21. “परमेश्वर त्यांच्या सामर्थ्यात उंचावलेले आहेत. त्यांच्यासारखा दुसरा शिक्षक कोण आहे?

  22. तुझा बाहू परमेश्वरासारखा आहे काय, तुझा आवाज त्यांच्यासारखा गडगडाट करू शकतो काय?

  23. जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो,

  24. याहवेह, तुम्ही आपल्या शक्तीने उंचविले जावो; आम्ही तुमच्या सामर्थ्याचे गुणगान व स्तुतिगान करू.

  25. याहवेहची वाणी जलांवर आहे; गौरवशाली याहवेहची वाणी महा जलाशयांवर गर्जत आहे.