Shimei बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
गेर्षोनाच्या पुत्रांची त्यांच्या कुळांनुसार नावे ही: लिब्नी व शिमी.
गेर्षोनाच्या कुळांची नावे ही होती: लिब्नी आणि शिमी.
दावीद राजा बहूरीमजवळ पोहोचताच, एक मनुष्य बाहेर आला, जो शौलाच्या घराण्यातील एका कुळातील होता. त्याचे नाव शिमी होते, तो गेराचा पुत्र होता, तो बाहेर येताच शाप देऊ लागला.
त्याने दावीद व राजाच्या सर्व अधिकार्यांवर धोंडमार केली, सर्व सैन्यदल व विशेष अंगरक्षक दावीदाच्या उजव्या व डाव्या बाजूंना होते.
शाप देत शिमी म्हणाला, “निघून जा, अरे तू खुनी, हलकट मनुष्या, चालता हो!
ज्याच्या जागी तू राज्य केलेस त्या शौलाच्या घराण्याचा जो रक्तपात तू केला त्याचा मोबदला याहवेह तुला देत आहेत. आता याहवेहने ते राज्य तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती दिले आहे. तू खुनी आहेस म्हणून तू नाशास येऊन ठेपला आहेस!”
तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीला का शाप द्यावा? मला त्याच्याकडे जाऊन त्याचा शिरच्छेद करू द्या.”
परंतु राजा म्हणाला, “अहो जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला याचे काय? याहवेहनेच जर त्याला सांगितले असले, ‘दावीदाला शाप दे,’ तर ‘तू असे का करतोस,’ असे त्याला कोणी विचारावे?”
तेव्हा दावीद अबीशाई व त्याच्या सर्व अधिकार्यांना म्हणाला, “माझा पुत्र, माझे स्वतःचे रक्त-मांस मला मारून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, तर हा बिन्यामीन किती अधिक करेल! त्याला जाऊ द्या; व शाप देऊ द्या, कारण याहवेहने त्याला तसे करण्यास सांगितले आहे.
मला होत असलेल्या त्रासाकडे कदाचित याहवेह पाहतील आणि या शापाऐवजी मी गमावलेला त्यांच्या कराराचा आशीर्वाद मला मिळवून देतील.”
दावीद आणि त्याची माणसे त्यांच्या वाटेने पुढे जात राहिले आणि शिमी त्यांच्या समोरच्या टेकडीकडून, दावीदाला शाप देत, त्याच्यावर दगडफेक करीत व त्याच्यावर धूळ उधळत चालत होता.
यहूदीयाच्या लोकांबरोबर बहूरीम येथील बिन्यामीन गोत्रातील, गेराचा पुत्र शिमी हा सुद्धा घाईने दावीद राजाला भेटण्यासाठी गेला.
त्याच्याबरोबर बिन्यामीन कुळातील एक हजार माणसे होती, त्याचप्रमाणे शौलाच्या घराचा कारभारी सीबा आणि त्याचे पंधरा पुत्र आणि वीस सेवक हे त्याच्याबरोबर होते. यार्देनेकडे जिथे राजा होता तिथे ते घाईने गेले.
राजाच्या घराण्याला घेण्यासाठी आणि राजाला हवे त्याप्रमाणे करण्यास, ते नदीचे पात्र पार करून आले. जेव्हा गेराचा पुत्र शिमी यार्देन पार करून आला, तेव्हा त्याने राजासमोर दंडवत घातले.
आणि तो राजाला म्हणाला, “माझ्या स्वामीने माझा दोष मोजू नये. माझ्या स्वामीने ज्या दिवशी यरुशलेम सोडले, तेव्हा आपल्या दासाने केलेल्या वाईट कृत्याचे आपण स्मरण करू नये. राजाने ते आपल्या मनातून काढून टाकावे.
कारण आपल्या सेवकाला (म्हणजे मला) माहीत आहे की, मी पाप केले आहे, परंतु आज योसेफाच्या गोत्रातील मी पहिलाच माझ्या स्वामीस भेटावयास आलो आहे.”
तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई म्हणाला, “शिमीने याहवेहच्या अभिषिक्ताला शाप दिला यामुळे शिमीला जिवे मारावे की नाही?”
तेव्हा दावीद म्हणाला, “जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला त्याचे काय? तुम्हाला लुडबुड करण्याचा अधिकार कोणी दिला? इस्राएलमध्ये आज कोणाचा मृत्यू व्हावा काय? आज मी इस्राएलचा राजा आहे हे मला समजत नाही काय?”
तेव्हा राजाने शिमीला म्हटले, “तू मरणार नाहीस.” आणि राजाने त्याला शपथ घेऊन अभिवचन दिले.
परंतु सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, नाथान संदेष्टा, शिमी आणि रेई आणि दावीदाचा खास रक्षक हे अदोनियाहला जाऊन मिळाले नाही.
नंतर राजाने शिमीला बोलावून सांगितले, “तुझ्यासाठी यरुशलेमात घर बांध आणि तिथे राहा, इतर कुठेही जाऊ नकोस.
ज्या दिवशी तू निघून किद्रोनचे खोरे पार करशील, तेव्हा हे समज की तू खचितच मरशील; आणि तुझे रक्त तुझ्याच माथ्यावर असणार.”
शिमीने राजाला उत्तर दिले, “तुम्ही जे म्हणता ते योग्य आहे. माझे स्वामी जे म्हणतात त्याप्रमाणे आपला सेवक करेल.” आणि शिमी बराच काळ यरुशलेमात राहिला.
परंतु तीन वर्षानंतर, शिमीचे दोन गुलाम, माकाहचा पुत्र आखीश, गथच्या राजाकडे पळून गेले आणि शिमीला सांगण्यात आले, “तुझे गुलाम गथमध्ये आहेत.”
हे ऐकताच, त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि त्याच्या गुलामांचा शोध करीत आखीशकडे गथ येथे गेला. शिमीने जाऊन गथवरून आपल्या गुलामांना परत आणले.