मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ६०:९सुमारे इ.स.पू. ६९८

    निश्चितच द्वीप माझ्याकडे बघतात; सर्वात पुढे तार्शीशची गलबते आहेत, तुझी लेकरे दूरवरून तुझ्याकडे आणत आहेत, त्यांनी आपले चांदी व सोनेही बरोबर आणले आहे, इस्राएलचे पवित्र परमेश्वर याहवेह, आमच्या परमेश्वराला गौरविण्यासाठी त्यांनी तुला ईश्वरदत्त तेजस्विता बहाल केली आहे.

  2. यशायाह ६०:१०सुमारे इ.स.पू. ६९८

    “परदेशी तुझ्या तटबंदीची पुनर्बांधणी करतील, राजे तुझी सेवा करतील. जरी मी माझ्या क्रोधाने तुला फटकारले, तरी आता कृपावंत होऊन मी तुझ्यावर दया करेन.

  3. यशायाह ६०:११सुमारे इ.स.पू. ६९८

    तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या रात्री वा दिवसा, बंद केल्या जाणार नाहीत, जेणेकरून अनेक देशातून लोक तुझ्याकडे संपत्ती आणू शकतील— त्यांचे राजे विजयोत्सवाने मिरवणूक चालवितील.

  4. यशायाह ६०:१२सुमारे इ.स.पू. ६९८

    जी राष्ट्रे वा देश तुझ्या अधीन होण्याचे नाकारतील, ती पूर्णपणे उद्ध्वस्त होतील.

  5. यशायाह ६०:१३सुमारे इ.स.पू. ६९८

    “लबानोनांचे वैभव तुझ्याकडे येईल, सुरू, देवदारू व भद्रदारू माझे पवित्रस्थान शोभिवंत करतील; आणि माझ्या पावलांचे स्थान गौरवशाली करतील.

  6. यशायाह ६०:१४सुमारे इ.स.पू. ६९८

    तुमच्यावर अत्याचार करणार्‍यांचे पुत्र येऊन तुला नमन करतील; जे सर्व तुझा तिरस्कार करीत, ते तुझ्या पायावर लोटांगण घालतील. ते तुला याहवेहचे शहर, आणि इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचे सीयोन असे म्हणतील.

  7. यशायाह ६०:१५सुमारे इ.स.पू. ६९८

    “जरी तुझा तिरस्कार व त्याग करण्यात आला होता, तुझ्यामधून कोणीही प्रवास करीत नसत, तरी मी तुला कायमचे अभिमानास्पद स्थान बनवेन, आणि सर्व पिढ्यांकरिता हर्षदायक करेन.

  8. यशायाह ६०:१६सुमारे इ.स.पू. ६९८

    तू अनेक देशांचे दूध प्राशन करशील आणि तुला राजांचे स्तनपान करविण्यात येईल. तेव्हा तुला कळेल कि मी, याहवेह तुझा उद्धारकर्ता मी तुझा तारणारा, याकोबाचा सर्वसमर्थ आहे.

  9. यशायाह ६०:१७सुमारे इ.स.पू. ६९८

    कास्याच्या ऐवजी मी तुझ्यासाठी सोने, तुझ्या लोखंडाच्या ऐवजी चांदी आणेन, लाकडाच्या ऐवजी कास्य, आणि तुझ्या दगडांच्या ऐवजी लोखंड आणेन. शांतता हे तुझ्यावरील अधिकारी, व कल्याण हे तुझ्यावरील शासक नियुक्त करेन.

  10. यशायाह ६०:१८सुमारे इ.स.पू. ६९८

    यापुढे तुझ्या देशातून हिंसाचार, किंवा अधोगती व विध्वंस तुझ्या सीमेत ऐकिवात येणार नाही, परंतु तुझ्या तटबंदीस तू तारण व तुझ्या वेशींना स्तुती असे म्हणशील.

  11. यशायाह ६०:१९सुमारे इ.स.पू. ६९८

    यापुढे दिवसा सूर्यप्रकाश व चंद्राचे तेज तुझ्यावर पडणार नाही, कारण तुझे याहवेहच तुझा अक्षय प्रकाश होतील व तुझे परमेश्वर तुझा गौरव होतील.

  12. यशायाह ६०:२०सुमारे इ.स.पू. ६९८

    तुझा सूर्य पुन्हा कधीही मावळणार नाही, आणि तुझ्या चंद्राचा कधी ऱ्हास होणार नाही. कारण याहवेहच तुझा सर्वकाळचा प्रकाश असतील; आणि तुझे शोकाचे दिवस संपतील.

  13. यशायाह ६०:२१सुमारे इ.स.पू. ६९८

    मग तुझे सर्व लोक नीतिमान होतील आणि ते त्यांच्या भूमीचे सर्वकाळचे मालक बनतील. कारण ते मी रोपलेली फांदी आहेत, माझा गौरव प्रकट करण्यासाठी माझी हस्तकृती आहेत.

  14. यशायाह ६०:२२सुमारे इ.स.पू. ६९८

    तुमच्यातील सर्वात कनिष्ठ, हजारोंच्या संख्येत बहुगुणित होतील, सर्वात लहान एक बलाढ्य राष्ट्र होईल, मी याहवेह आहे; योग्य त्या समयी, मी हे सर्व वेगाने घडवेन.”

  15. यशायाह ६१:१सुमारे इ.स.पू. ६९८

    सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी याहवेहने माझा अभिषेक केला आहे. भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी, कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

  16. यशायाह ६१:२सुमारे इ.स.पू. ६९८

    याहवेहच्या कृपेचे वर्ष आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

  17. यशायाह ६१:३सुमारे इ.स.पू. ६९८

    सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.

  18. यशायाह ६१:४सुमारे इ.स.पू. ६९८

    ते प्राचीन भग्नावशेषाची पुनर्बांधणी करतील फार पूर्वी उद्ध्वस्त झालेल्या शहरांची डागडुजी करतील; ते पुरातन पडीक नगरांचा, जी पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त झाली होती, त्यांचा जीर्णोद्धार करतील.

  19. यशायाह ६१:५सुमारे इ.स.पू. ६९८

    अपरिचित लोक तुमचे कळप राखतील; विदेशी तुमची शेते व द्राक्षमळ्यांची निगा राखतील.

  20. यशायाह ६१:६सुमारे इ.स.पू. ६९८

    तुम्हाला याहवेहचे याजक म्हणतील तुम्ही आमच्या परमेश्वराचे सेवक म्हणून संबोधले जाल. राष्ट्रांच्या संपत्तीतून तुमचे पोषण होईल, व तुम्ही त्यांच्या समृद्धीचा अभिमान बाळगाल.

  21. यशायाह ६१:७सुमारे इ.स.पू. ६९८

    लज्जेच्या ऐवजी तुम्ही दुपटीने सन्मान मिळवाल, आणि अप्रतिष्ठे ऐवजी तुम्हाला तुमच्या वतनात आनंद प्राप्त होईल. आणि तुम्ही दुपटीने तुमच्या वतनभूमीचे वारसदार व्हाल, आणि तुम्ही अनंतकाळचा आनंद प्राप्त कराल.

  22. यशायाह ६१:८सुमारे इ.स.पू. ६९८

    “कारण मी याहवेह, मी न्याय प्रिय आहे; चोरी आणि अन्यायाचा मला तिटकारा आहे. माझ्या विश्वासूपणाने मी माझ्या लोकांना मोबदला देईन आणि त्यांच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन.

  23. यशायाह ६१:९सुमारे इ.स.पू. ६९८

    राष्ट्रांमध्ये त्यांच्या वंशजांचा लौकिक होईल, आणि त्यांची संतती लोकांमध्ये बहुमानीत होतील. जे सर्व त्यांना बघून हे कबूल करतील की ते याहवेहचे आशीर्वादित लोक आहेत.”

  24. यशायाह ६१:१०सुमारे इ.स.पू. ६९८

    मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो; माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो. जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते, किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते, तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.

  25. यशायाह ६१:११सुमारे इ.स.पू. ६९८

    जशी माती अंकुराला उगविते आणि बाग बीज वाढविते तसे सार्वभौम याहवेह नीतिमत्व आणि प्रशंसा सर्व राष्ट्रासमोर अंकुरित करतील.