Skip to content

Paul बद्दल बायबलमधील वचने

619 वचने · 103 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते.

  2. अचानक तीव्र भूकंपाने तुरुंगाचा पाया डळमळला. एकाएकी तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि सर्व कैद्यांचे साखळदंड मोकळे झाले.

  3. तुरुंगाचा नायक झोपेतून जागा झाला आणि तुरुंगाचे सर्व दरवाजे सताड उघडे पाहून, सर्व कैदी पळून गेलेले असावेत असे समजून तो तलवार उपसून स्वतःला ठार करणार होता.

  4. परंतु पौल ओरडून म्हणाला, “तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!”

  5. तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला.

  6. त्याने त्यांना बाहेर आणले आणि विचारले, “महाराज, माझे तारण व्हावे, म्हणून मी काय करावे?”

  7. त्यांनी सांगितले, “प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”

  8. तेव्हा त्यांनी त्याला व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.

  9. मग रात्रीच्या त्याच घटकेस तुरुंगाच्या नायकाने त्यांच्या जखमा धुतल्या आणि लगेच त्याने व त्याच्या सर्व कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला.

  10. त्या नायकाने त्यांना आपल्या घरी आणले व त्यांच्यापुढे भोजन वाढले; तो व त्याच्या कुटुंबातील सर्व लोक परमेश्वरावरील विश्वासात आल्यामुळे अत्यंत आनंदित झाले होते.

  11. पहाट झाल्यानंतर, न्यायाधीशांनी त्यांच्या अधिकार्‍यांना त्या तुरुंगाच्या नायकाकडे पाठवून त्यांना हुकूम दिला: “त्या माणसांना सोडून द्या.”

  12. तेव्हा तुरुंगाच्या नायकाने पौलाला सांगितले, “न्यायाधीशांनी हुकूम दिला आहे की, पौल व सीला यांना जाऊ द्यावे, आता तुम्ही जाऊ शकता. शांतीने जा.”

  13. परंतु पौल अधिकार्‍यांना म्हणाला: “त्यांनी आमची चौकशी न करता आम्हाला जाहीरपणे फटके मारले आणि आम्ही रोमी नागरिक असतानाही आम्हास तुरुंगात डांबले. आता आम्ही गुपचूप निघून जावे, अशी त्यांची इच्छा आहे काय? त्यांनी स्वतः येऊन आम्हास मुक्त करावे.”

  14. अधिकार्‍यांनी जाऊन हे शब्द न्यायाधीशांना कळविले, पौल व सीला हे रोमी नागरिक आहेत, हे त्यांना समजले तेव्हा ते घाबरले.

  15. आणि त्यांना शांत करण्यासाठी ते स्वतः तुरुंगात आले आणि तुरुंगाच्या बाहेर आणून, ते शहर सोडून जावे अशी त्यांना विनंती केली.

  16. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पौल व सीला हे लुदियेच्या घरी गेले आणि बंधू भगिनींना भेटून त्यांना उत्तेजित केले. नंतर ते तिथून निघाले.

  17. जेव्हा पौल व त्याचे सहकारी प्रवास करीत अंफिपुली व अपल्लोनिया या शहरांमधून जात होते तेव्हा ते थेस्सलनीका येथे आले, ज्या ठिकाणी यहूद्यांचे सभागृह होते.

  18. आपल्या रीतीप्रमाणे, पौल सभागृहामध्ये गेला आणि लागोपाठ तीन शब्बाथ दिवस त्याने धर्मशास्त्रावरून त्यांच्याशी संवाद केला,

  19. त्याने त्यांना स्पष्टीकरण करून पटवून दिले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यामधून पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तो त्यांना म्हणाला, “या येशूंची मी तुम्हाला घोषणा करीत आहे, तेच ख्रिस्त आहेत.”

  20. ऐकणार्‍यांपैकी काही यहूदीयांची खात्री झाली आणि ती माणसे पौल व सीला यांना येऊन मिळाली. यामध्ये परमेश्वराचे भय धरणार्‍या ग्रीक लोकांची संख्या मोठी होती आणि त्यात काही प्रमुख स्त्रियाही समाविष्ट होत्या.

  21. परंतु इतर यहूदीयांना मत्सर वाटला; म्हणून त्यांनी रस्त्यावरील काही गुंड लोकांना घेऊन शहरात त्यांना दंगल करण्यास चिथावणी दिली. पौल व सीला यांना बाहेर काढून लोकांकडे आणण्यासाठी ते त्यांना शोधीत यासोनाच्या घराकडे धावले.

  22. पण ते तिथे नाहीत, असे पाहून त्यांनी यासोन व इतर काही विश्वासणार्‍यांना ओढून काढले व त्यांना शहर न्यायाधीशांपुढे नेऊन आरडाओरड करून म्हणाले, “या माणसांनी सर्व जगात उलथापालथ केली आहे आणि आता ते येथेही आलेले आहेत;

  23. आणि यासोनाने त्यांचे आपल्या घरामध्ये स्वागत केले आहे. हे सर्व कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात आणि म्हणतात की येशू म्हणून कोणी एक दुसरा राजा आहे.”

  24. शहरातील अधिकारी व लोकसमुदाय यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांची धांदल उडाली.

  25. मग यासोन व इतरांकडून जामीन घेतल्यानंतरच त्यांना जाऊ दिले.