उत्पत्ती ४३:३-२७
३
तेव्हा यहूदाह त्यास म्हणाला, “त्या मनुष्याने आम्हाला चेतावणी दिली होती की, ‘तुमच्या भावास सोबत आणल्याशिवाय तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’
४
जर तुम्ही आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवाल तरच आम्ही जाऊन धान्य विकत घेऊ.
५
जर तुम्ही त्याला पाठवित नसाल तर आम्ही जाणार नाही, कारण त्या मनुष्याने आम्हाला म्हटले, ‘जर तुम्ही तुमच्या भावास सोबत आणले नाही तर तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’ ”
६
इस्राएल म्हणाला, “तुम्हाला आणखी एक भाऊ आहे असे तुम्ही त्याला सांगून माझ्यावर हे अनर्थ का आणले?”
७
यावर ते म्हणाले, “पण त्या मनुष्याने आपल्याबद्दल आणि आपल्या कुटुंबाची खोल चौकशी केली. त्याने आम्हाला विचारले, ‘तुमचे वडील अजून जिवंत आहेत काय? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे काय?’ आम्ही सहजपणे त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ‘तुमच्या भावाला घेऊन या’ असे तो म्हणेल, असे आम्हाला कसे ठाऊक असणार?”
८
तेव्हा यहूदाह आपला पिता इस्राएलला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा, आम्ही लगेच जाऊ, म्हणजे तुम्ही, आम्ही व आमची मुले जगणार आणि मरणार नाही.
९
त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो. जर मी त्याला परत आणले नाही व तुमच्या स्वाधीन केले नाही, तर त्याचा दोष माझ्या माथ्यावर कायमचा राहील.
१०
जर आम्ही उशीर केला नसता तर इतक्या दिवसात आम्ही तिकडे दोनदा जाऊन आलो असतो.”
११
नंतर त्यांचे वडील इस्राएल त्यांना म्हणाले, “जर असेच असेल तर मग हे करा: या देशात उत्पादन होणारे सर्वोत्तम पदार्थ—थोडे औषधी बलसान, थोडे मध, मसाले, गंधरस, पिस्ते व बदाम आपल्या गोण्यात घ्या आणि या वस्तू त्या मनुष्याला देणगी म्हणून घेऊन जा.
१२
दुप्पट चांदी सोबत घेऊन जा म्हणजे तुमच्या पोत्याच्या तोंडाशी असलेला चांदीचा पैसाही तुम्हाला परत करता येईल. कदाचित काही तरी चूक झाली असेल.
१३
तुमच्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे लगेच जा.
१४
त्या माणसापुढे, सर्वसमर्थ परमेश्वराने तुमच्यावर कृपा करावी म्हणजे तो दुसर्या भावाला आणि बिन्यामीनालाही तुमच्यासोबत परत पाठवेल. पण जर मी माझ्या पुत्रांना मुकलो तर मुकलो.”
१५
मग त्यांनी भेट व दुप्पट चांदी आणि बिन्यामीनाला सोबत घेतले आणि खाली इजिप्तला गेले आणि योसेफापुढे उपस्थित झाले.
१६
बिन्यामीन त्यांच्याबरोबर आहे हे योसेफाने पाहिले, तेव्हा तो आपल्या घराच्या कारभार्याला म्हणाला, “या माणसांना माझ्या घरी घेऊन जा, पशू मार आणि भोजन तयार कर; ते दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”
१७
त्या मनुष्याने योसेफाच्या सांगितल्याप्रमाणे केले आणि त्याने माणसांना योसेफाच्या घरी नेले.
१८
त्यांना योसेफाच्या घरी नेल्यावर त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “पहिल्यांदा आपल्या पोत्यात जी चांदी टाकण्यात आली होती त्यासाठी आपल्याला इथे आणण्यात आले आहे. आपल्यावर हल्ला करून आपल्यावर विजय मिळवून आपल्याला गुलाम करावे व आपल्या गाढवांना हस्तगत करावे असा त्याचा बेत असावा.”
१९
घराच्या दाराशी आल्यानंतर ते योसेफाच्या घरकारभार्याकडे गेले;
२०
आणि त्याला म्हणाले, “महाराज, पहिल्या फेरीत आम्ही इथे धान्य खरेदीसाठी आलो होतो.
२१
तेव्हा परत घरी जाताना आम्ही रात्री जिथे थांबलो आणि आमची पोती उघडली तेव्हा आम्हा प्रत्येकाचा पोत्यात त्याची चांदी—अचूक वजनाची—पोत्याच्या तोंडाशी सापडली. आम्ही ती परत देण्यासाठी बरोबर आणली आहे.
२२
या रकमेबरोबरच धान्य विकत घेण्यासाठी आम्ही वेगळी चांदी आणली आहे. आमच्या पोत्यांमध्ये आमची चांदी कोणी ठेवली हे आम्हाला माहीत नाही.”
२३
“ते सर्व ठीक आहे,” तो म्हणाला, “घाबरू नका. तुमचा परमेश्वर, तुमच्या पित्याचा परमेश्वर यांनीच तुमच्या पोत्यात ते धन दिले आहे; तुमची चांदी मला मिळाली आहे.” मग त्याने शिमओनाला बाहेर काढून त्यांच्याकडे आणले.
२४
नंतर घरकारभार्याने त्यांना योसेफाच्या घरात नेले, त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि त्यांच्या गाढवांना चाराही दिला.
२५
योसेफ दुपारी येणार त्यावेळी त्याला देण्यासाठी त्यांनी आपली भेट तयार करून ठेवली, कारण त्यांना तिथेच भोजन करावयाचे आहे असे सांगण्यात आले होते.
२६
योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला आणि त्याला देणग्या दिल्या ज्या त्यांनी घरात आणल्या होत्या.
२७
त्याने त्यांना अभिवादन केले, मग त्याने विचारले, “त्या वृद्ध माणसाविषयी तुम्ही बोलला, ते तुमचे वडील कसे आहेत? ते अजून जिवंत आहेत काय?”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings