Skip to content
उत्पत्ती ४३:१५-२५

भाऊ येतात आणि भयभीत होतात

उत्पत्ती ४३:१५-२५
१५
मग त्यांनी भेट व दुप्पट चांदी आणि बिन्यामीनाला सोबत घेतले आणि खाली इजिप्तला गेले आणि योसेफापुढे उपस्थित झाले.
१६
बिन्यामीन त्यांच्याबरोबर आहे हे योसेफाने पाहिले, तेव्हा तो आपल्या घराच्या कारभार्‍याला म्हणाला, “या माणसांना माझ्या घरी घेऊन जा, पशू मार आणि भोजन तयार कर; ते दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”
१७
त्या मनुष्याने योसेफाच्या सांगितल्याप्रमाणे केले आणि त्याने माणसांना योसेफाच्या घरी नेले.
१८
त्यांना योसेफाच्या घरी नेल्यावर त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “पहिल्यांदा आपल्या पोत्यात जी चांदी टाकण्यात आली होती त्यासाठी आपल्याला इथे आणण्यात आले आहे. आपल्यावर हल्ला करून आपल्यावर विजय मिळवून आपल्याला गुलाम करावे व आपल्या गाढवांना हस्तगत करावे असा त्याचा बेत असावा.”
१९
घराच्या दाराशी आल्यानंतर ते योसेफाच्या घरकारभार्‍याकडे गेले;
२०
आणि त्याला म्हणाले, “महाराज, पहिल्या फेरीत आम्ही इथे धान्य खरेदीसाठी आलो होतो.
२१
तेव्हा परत घरी जाताना आम्ही रात्री जिथे थांबलो आणि आमची पोती उघडली तेव्हा आम्हा प्रत्येकाचा पोत्यात त्याची चांदी—अचूक वजनाची—पोत्याच्या तोंडाशी सापडली. आम्ही ती परत देण्यासाठी बरोबर आणली आहे.
२२
या रकमेबरोबरच धान्य विकत घेण्यासाठी आम्ही वेगळी चांदी आणली आहे. आमच्या पोत्यांमध्ये आमची चांदी कोणी ठेवली हे आम्हाला माहीत नाही.”
२३
“ते सर्व ठीक आहे,” तो म्हणाला, “घाबरू नका. तुमचा परमेश्वर, तुमच्या पित्याचा परमेश्वर यांनीच तुमच्या पोत्यात ते धन दिले आहे; तुमची चांदी मला मिळाली आहे.” मग त्याने शिमओनाला बाहेर काढून त्यांच्याकडे आणले.
२४
नंतर घरकारभार्‍याने त्यांना योसेफाच्या घरात नेले, त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि त्यांच्या गाढवांना चाराही दिला.
२५
योसेफ दुपारी येणार त्यावेळी त्याला देण्यासाठी त्यांनी आपली भेट तयार करून ठेवली, कारण त्यांना तिथेच भोजन करावयाचे आहे असे सांगण्यात आले होते.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options