मुख्य मजकुरावर जा

Wife बद्दल बायबलमधील वचने

171 वचने · 13 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तिने नवस केल्यावर किंवा तिच्या ओठांनी अविचाराने शपथ उच्चारली व स्वतःला बांधील केल्यानंतर जर तिने विवाह केला

  2. आणि तिच्या पतीने त्याविषयी ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर तिचे नवस किंवा शपथ ज्याने तिने स्वतःला बांधील केले ते तिच्यावर कायम राहील.

  3. पण त्याविषयी ऐकून जर तिच्या पतीने तिला मनाई केली, तर ज्या नवसाने व शपथेने तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे, ते तो रद्द करतो व याहवेह तिला क्षमा करतील.

  4. “विधवा किंवा घटस्फोट झालेली स्त्री शपथेने किंवा नवसाने स्वतःला बांधील करून घेते, तर ते तिच्यावर कायम राहील.

  5. “आपल्या पतीबरोबर राहून एखादी स्त्री जर नवस करते किंवा स्वतःला बांधील करून शपथ घेते

  6. आणि तिचा पती त्याविषयी ऐकून तिला काही बोलत नाही किंवा तिला मनाई करीत नाही, तर ज्या नवसांनी व शपथांनी तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे ते कायम राहतील.

  7. पण त्याविषयी ऐकून जर त्याने ते रद्द केले, तर तिच्या मुखातून आलेले कोणतेही नवस किंवा शपथ कायम राहणार नाहीत. तिच्या पतीने ते रद्द केले आहेत आणि याहवेह तिला क्षमा करतील.

  8. तिचा पती तिने केलेला नवस किंवा स्वतःचा त्याग करण्यासाठी घेतलेली शपथ कायम करेल किंवा रद्द करेल.

  9. पण रोजच्यारोज जर तिचा पती त्याविषयी तिला काहीही बोलत नाही, तर तिने केलेले सर्व नवस व शपथ ज्यांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले आहे ते तो कायम करतो. तो काहीही बोलला नाही म्हणून तिने केलेले नवस तो कायम करतो.

  10. पण ते ऐकल्यानंतर काही काळाने जर त्याने ते रद्द केले, तर तिचा दोष त्याला भोगावा लागेल.”

  11. पुरुष व त्याची पत्नी, यांच्यामधील नाते व पिता व त्याची तरुण मुलगी जी अजूनही त्याच्या घरात राहते यांच्यामधील नाते याविषयी याहवेहने मोशेला दिलेले नियम ते हे आहेत.

  12. मोआबी रूथ, म्हणजे महलोनची विधवा हिलासुद्धा माझी पत्नी म्हणून, त्या मनुष्याचे नाव त्याच्या मालमत्तेसहित चालवावे यासाठी माझ्या ताब्यात घेत आहे, म्हणजे त्याच्या कुटुंबातून किंवा त्याच्या गावातून त्याचे नाव पुसले जाणार नाही. याविषयी तुम्ही आज साक्षी आहात!”

  13. त्याचे नाव नाबाल आणि त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते. ती बुद्धिमान व सुंदर स्त्री होती, परंतु तिचा पती कालेबच्या वंशाचा असून कठोर व दुष्ट वृत्तीचा होता.

  14. चाकरांपैकी एकाने नाबालाची पत्नी अबीगईल हिला सांगितले, “दावीदाने रानातून आपल्या धन्याला अभिवादन देण्यासाठी निरोप्यांना पाठविले, परंतु त्यांनी त्यांचा अपमान केला.

  15. तरीही ही माणसे आमच्याबरोबर चांगलीच होती. ते आमच्याशी वाईट वागले नाहीत आणि संपूर्ण वेळ आम्ही शेतामध्ये त्यांच्याजवळ होतो तेव्हा आमचे काहीही हरवले नाही.

  16. जेव्हा आम्ही आमची मेंढरे त्यांच्याबरोबर राखीत होतो, तेव्हा रात्रंदिवस ते भिंतीसारखे आमच्या सभोवती होते.

  17. आता काय करावे याचा तुम्ही विचार करा, कारण आमच्या मालकावर आणि त्यांच्या संपूर्ण घराण्यावर संकट येत आहे. ते इतके दुष्ट मनुष्य आहेत की, त्यांच्याबरोबर बोलण्यास कोणी धजत नाही.”

  18. तेव्हा अबीगईलने घाई केली. तिने दोनशे भाकरी, दोन बुधले द्राक्षारस, पाच मेंढरांचे शिजविलेले मांस, पाच सिआह भाजलेले धान्य, मनुक्यांच्या शंभर व अंजिराच्या दोनशे ढेपा घेऊन ते सर्व गाढवांवर लादले.

  19. आणि ती आपल्या सेवकांना म्हणाली, “तुम्ही पुढे जा; मी तुमच्यामागे येते.” परंतु तिने तिचा पती नाबाल याला काहीही सांगितले नाही.

  20. ती गाढवावर बसून डोंगराच्या ओढ्याकडून जात असताना, तिथे दावीद आणि त्याची माणसे तिच्या समोरून येत होती व ती त्यांना भेटली.

  21. दावीद नुकताच म्हणाला होता, “त्याचे काही हरवू नये म्हणून मी रानात या लोकांच्या मालमत्तेवर पहारा ठेवला, ते व्यर्थच गेले. त्याने मला चांगल्याची फेड वाईटाने केली आहे.

  22. उद्या सकाळपर्यंत त्याच्या लोकांपैकी मी एकही पुरुष जिवंत ठेवला तर परमेश्वर दावीदाचे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो!”

  23. जेव्हा अबीगईलने दावीदाला पाहिले, तेव्हा ती घाईने गाढवावरून उतरली आणि तिने दावीदासमोर तोंड जमिनीकडे करून अभिवादन केले.

  24. ती त्याच्या पायावर पडली आणि म्हणाली, “माझ्या धन्या, आपल्या सेवकाच्या अपराधांची क्षमा करा, आणि मला तुमच्याशी बोलू द्या; तुमच्या दासीचे बोलणे ऐकून घ्या.

  25. माझ्या धन्या, तो दुष्ट मनुष्य नाबाल याच्याकडे लक्ष देऊ नका. तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे, त्याच्या नावाचा अर्थ मूर्ख आहे आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे. परंतु ज्या पुरुषांना माझ्या धन्याने पाठवले त्यांना मी पाहिले नाही.”