Skip to content

Queen बद्दल बायबलमधील वचने

49 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनची किर्ती व याहवेहशी असलेले त्याचे नाते याविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती आली.

  2. मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली.

  3. शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही राजासाठी कठीण नव्हते.

  4. जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनचे ज्ञान व त्याने बांधलेला राजवाडा पाहिला,

  5. त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्‍यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे झगे, त्याचे प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेले होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली.

  6. ती राजाला म्हणाली, “तुमचे ज्ञान व तुमची प्राप्ती याविषयी माझ्या देशात मी जो अहवाल ऐकला तो सत्य आहे.

  7. परंतु मी येथे येऊन या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहीपर्यंत त्यावर मी विश्वास ठेवला नाही. खचितच तुमचे ज्ञान व संपत्ती याबद्दल मला जे सांगितले गेले त्यापेक्षा ते कितीतरी अधिक आहे.

  8. तुमचे लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील!

  9. याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला इस्राएलच्या राजासनावर ठेवले. इस्राएल प्रीत्यर्थ याहवेहच्या सर्वकाळच्या प्रीतिकरिता न्याय व नीतिमत्व राखून ठेवण्यासाठी त्यांनी तुम्हाला राजा केले आहे.”

  10. आणि तिने राजाला एकशेवीस तालांत सोने, पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला इतकी सुगंधी द्रव्ये आणली की त्यानंतर तेवढी द्रव्ये परत कोणी आणली नाहीत.

  11. (त्याचप्रमाणे हीरामच्या गलबतांवर ओफीर येथून सोने व मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड व मोलवान रत्ने आणली.

  12. शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात कठडे बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. तेव्हापासून आजपर्यंत हे चंदन ना कुठे आणले गेले ना ते कोणाच्या दृष्टीस पडले.)

  13. शबाच्या राणीने शलोमोन राजाकडून ज्या गोष्टींची इच्छा केली व जे काही तिने मागितले ते सर्व राजाने तिला दिल्या, त्या शिवाय राजाच्या खजिन्यातूनही राजाने तिला भेटी दिल्या. मग ती तिच्या सेवकांसह आपल्या देशास परत गेली.

  14. फारोह हदादवर इतका प्रसन्न झाला की त्याने आपली पत्नी, तहपनीस राणीची बहीण त्याला पत्नी म्हणून दिली.

  15. नंतर राजाच्या शेजारी राणी बसलेली असताना, राजाने मला विचारले, “किती काळासाठी तुला जावे लागेल व तू केव्हा परत येशील?” मला पाठविण्याचे राजाच्या मर्जीस आले म्हणून मी माझ्या जाण्याची वेळ ठरविली.

  16. वश्ती राणीनेही अहश्वेरोश राजाच्या शाही महालातील स्त्रियांना मेजवानी दिली.

  17. सातव्या दिवशी, अहश्वेरोश राजा मद्य पिऊन पूर्णपणे उल्लसित झाला असताना त्याने त्याच्या तैनातीस असलेल्या खोजांना—महूमान, बिजथा, हरबोना, बिग्था, अबग्था, जेथर व कर्खस यांना—

  18. राणी वश्तीला मस्तकावर राजमुकुट घालून आपणाकडे आणण्यास सांगितले. हेतू हा की जमलेले सर्व लोक व प्रतिष्ठितांसमोर तिच्या सौंदर्याचे प्रदर्शन करावे, कारण ती एक अतिशय सुंदर स्त्री होती.

  19. परंतु राजाची आज्ञा जेव्हा खोजांनी वश्ती राणीला कळविली, तेव्हा तिने येण्यास नकार दिला. त्यामुळे राजा अहश्वेरोश संतापला व त्याचा क्रोधाग्नी भडकला.

  20. परंतु चालीरीतींना अनुसरून राजाने कायदा व न्यायात पारंगत व्यक्तीचा सल्ला घेतला. ते ज्ञानी गृहस्थ होते व त्यांना त्या काळाच्या परिस्थितीचे योग्य आकलन होते.

  21. शिवाय जे राजाचे जिवलग मित्र होते—कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सेना व ममुकान—ते पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील सात प्रतिष्ठित लोक व सर्वात उच्चाधिकारी होते, ज्यांना राजाच्या सानिध्यात प्रवेश करण्याची खास मुभा होती.

  22. राजाने त्यांना विचारले, “कायद्यानुसार, वश्ती राणीच्या बाबतीत काय करावे? खोजाद्वारे पाठविलेली अहश्वेरोश राजाची आज्ञा तिने पाळली नाही.”

  23. राजा व प्रतिष्ठितांच्या समक्षतेत ममुकानाने उत्तर दिले, “वश्ती राणीने चूक केली आहे, केवळ राजाच्याच विरुद्ध नव्हे तर अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रतिष्ठित व नागरिकांच्या विरुद्ध केली आहे.

  24. कारण राणी वश्तीची वागणूक सर्व ठिकाणच्या स्त्रियांना समजल्यावर त्याही आपआपल्या पतीची अवज्ञा करून म्हणतील, ‘अहश्वेरोश राजाने वश्ती राणीस त्याच्या समक्षतेत आणण्याची आज्ञा दिली होती, पण ती आली नाही.’

  25. आजच्या दिवशी पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील प्रतिष्ठितांच्या स्त्रिया राणीच्या आचरणाबद्धल ऐकून राजाच्या सर्व प्रतिष्ठितांना असाच प्रतिसाद देतील. संपूर्ण साम्राज्यात अपमान व मतभेदाचा अंत राहणार नाही.