मुख्य मजकुरावर जा

Egypt बद्दल बायबलमधील वचने: Joseph interprets Pharaoh's dreams

19 वचने · 105 पैलू

Joseph interprets Pharaoh's dreams बद्दल वचने

  1. तेव्हा फारोहने योसेफाला बोलाविणे पाठविले. योसेफाला लगेच तुरुंगाच्या कोठडीतून बाहेर आणण्यात आले आणि योसेफ मुंडण करून व कपडे बदलून फारोहपुढे दाखल झाला.

  2. फारोह योसेफास म्हणाला, “मला एक स्वप्न पडले, पण येथे असलेल्या कोणाही मनुष्याला त्याचा अर्थ काय असेल हे सांगता येत नाही. पण मी असे ऐकले आहे की तू स्वप्न ऐकताच, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो.”

  3. योसेफाने उत्तर दिले, “मला स्वतःच्या बुद्धीने स्वप्नांचा अर्थ सांगता येत नाही, परंतु परमेश्वर फारोहला हितकारक उत्तर देतील.”

  4. तेव्हा फारोहने योसेफाला सांगितले, “मी स्वप्नात नाईल नदीच्या काठावर उभा होतो;

  5. तेवढ्यात एकाएकी नाईल नदीतून चांगल्या धष्टपुष्ट दिसणार्‍या सात गाई वर आल्या आणि लव्हाळ्यात चरू लागल्या.

  6. नंतर दुसर्‍या सात गाई वर आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या. सर्व इजिप्त देशात अशा अशक्त गाई मी कधीही पाहिल्या नाहीत.

  7. या कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या पहिल्या सात धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले.

  8. असे असूनही त्यांनी त्या सात धष्टपुष्ट गाई कशा खाल्ल्या हे समजू शकले नाही; पण धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकल्यानंतरही त्या अशक्त गाई अशक्तच राहिल्या आणि मग मी जागा झालो.

  9. “मग मला परत स्वप्नात, एकाच ताटाला टपोर्‍या दाण्यांची भरदार सात कणसे दिसली.

  10. मग त्याच ताटातून सात वाळलेली आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली कणसे निघाली.

  11. या अशक्त कणसांनी ती भरदार कणसे गिळून टाकली. मी हे सर्व माझ्या ज्योतिष्यांना सांगितले, परंतु त्यातील एकालाही स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.”

  12. स्वप्ने ऐकून योसेफ फारोहला म्हणाला, “फारोहला पडलेल्या या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. परमेश्वर काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रगट केले आहे.

  13. या दोन्हीचा अर्थ एकच आहे, सात लठ्ठ गाई म्हणजे सात वर्षांचा काळ आणि सात भरदार कणसे यांचाही अर्थ पुढील सात वर्षांचा काळ; जो अतिशय समृद्धीचा असेल.

  14. त्या सात अशक्त गाई म्हणजे या सात वर्षानंतर येणारी सात वर्षे आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली सात सुकलेली कणसे दुष्काळाची सात वर्षे दर्शवितात.

  15. “मी फारोहला जे सांगितले आहे ते असे असेल: परमेश्वर लवकरच काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रकट केले आहे.

  16. पुढील सात वर्षांचा काळ संपूर्ण इजिप्त देशासाठी अतिशय समृद्धीचा काळ असेल.

  17. पण त्यानंतरच्या सात वर्षांच्या काळात इजिप्त देशामध्ये इतका मोठा दुष्काळ पडेल की, आधीच्या सात वर्षांतील सर्व समृद्धी आणि भरभराट विसरली जाईल. दुष्काळ देशाचा विध्वंस करेल.

  18. तो इतका भयानक असेल की, आधीच्या समृद्धीची वर्षे आठवणार देखील नाहीत.

  19. आता हे स्वप्न फारोहला दोन स्वरुपात पडले, याचा अर्थ असा की परमेश्वराने दुष्काळाची बाब निश्चित केली आहे आणि परमेश्वर त्याप्रमाणे लवकरच घडवून आणतील.