Skip to content

Egypt बद्दल बायबलमधील वचने

328 वचने · 105 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह योसेफाबरोबर होते, म्हणून तो सफल व्यक्ती बनला आणि तो इजिप्तच्या धन्याच्या घरी राहत असे.

  2. पोटीफराने पाहिले की याहवेह योसेफाबरोबर आहेत आणि जे काही तो करतो त्यामध्ये याहवेह त्याला यश देतात,

  3. त्यामुळे साहजिकच योसेफ त्याचा आवडता झाला व त्याचा व्यक्तिगत सेवक बनला. लवकरच पोटीफराच्या घराची व्यवस्था व त्याचे सर्व व्यवहार त्याच्या ताब्यात देण्यात आले.

  4. जेव्हापासून त्याने योसेफाला त्याच्या घरावर, व त्याचे जे काहीही होते त्या सर्वांवर अधिकारी म्हणून नेमले, तेव्हापासून योसेफामुळे याहवेहने त्या इजिप्तच्या धन्याला आशीर्वादित केले; पोटीफराचे जे काही होते, त्याचे कुटुंब व शेती यावर याहवेहचा आशीर्वाद होता.

  5. म्हणून पोटीफराने आपले सर्वकाही योसेफाला सोपवून दिले. आपण काय खावे यापलीकडे त्याने कशाचीच काळजी केली नाही. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता.

  6. काही वेळेनंतर योसेफ पोटीफराच्या पत्नीच्या डोळ्यात भरला व ती त्याला म्हणाली, “माझ्याशी समागम कर!”

  7. योसेफाने तिला नाकारले. तो तिला म्हणाला. “हे पाहा, मी कारभारी असताना माझे धनी या घरातील कोणत्याही गोष्टीची काळजी करीत नाही, त्यांच्या मालकीचे सर्वकाही त्यांनी माझ्या हाती सोपविले आहे.

  8. या घरामधे मला सर्वांपेक्षा अधिक अधिकार आहेत. तुम्ही त्यांची पत्नी आहात, तुम्हाला वगळून इतर प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्या हाती दिली आहे. तेव्हा असे दुष्कर्म मला कसे करता येईल? ते परमेश्वराविरुद्ध एक घोर पातक ठरेल.”

  9. ती दिवसेंदिवस योसेफाला आग्रह करीत असली तरी त्याने तिच्यासोबत निजण्यास किंवा तिच्या सहवासात असण्याचे नाकारले.

  10. एके दिवशी असे घडून आले की, तो कामानिमित्त घराच्या आत आला असताना, घरात दुसरे कोणतेही सेवक नव्हते;

  11. तिने त्याच्या झग्याला पकडले आणि म्हणाली, “माझ्याबरोबर नीज!” पण त्याने त्याचा झगा तिच्या हातातच सोडला आणि घराबाहेर पळाला.

  12. त्याचा झगा आपल्याच हातात आहे आणि तो पळून गेला आहे हे तिच्या लक्षात आले,

  13. तेव्हा तिने घरातील सेवकांना बोलाविले. ती म्हणाली, “आमच्या घराचा उपमर्द करण्यासाठीच हा इब्री गुलाम घरात आणला आहे! त्याने माझ्यासोबत निजण्याचा प्रयत्न केला, पण मी किंचाळले.

  14. जसे त्याने माझे किंचाळणे ऐकले तसे तो स्वतःचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.”

  15. तिने तिचा धनी घरी येईपर्यंत तो झगा आपल्याजवळच ठेवला.

  16. नंतर तिने त्याला आपली कथा सांगितली: “जो इब्री गुलाम तुम्ही इकडे आणला आहे, त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

  17. पण जसे मी मदतीसाठी किंचाळले, त्याचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.”

  18. “तुमचा गुलाम माझ्याशी असा वागला.” असे म्हणून पत्नीने सांगितलेला वृतांत ऐकताच त्याचा धनी रागाने बेभान झाला.

  19. योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाच्या कैद्यांना ज्या तुरुंगात ठेवीत, तिथे त्याने योसेफाला ठेवले, परंतु जेव्हा योसेफ तुरुंगात होता,

  20. एके रात्री दोघांनाही—इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार, ज्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते—स्वप्ने पडली आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा विशिष्ट अर्थ होता.

  21. दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा योसेफ त्यांना भेटला, तेव्हा ते दोघेही खिन्न असल्याचे त्याच्या लक्षात आले.

  22. योसेफाने त्याच्यासोबत त्याच्या धन्याच्या वाड्यात तुरुंगात असलेल्या त्या फारोहच्या अधिकार्‍यांना विचारले, “आज तुम्ही इतके खिन्न का आहात?”

  23. त्यांनी उत्तर दिले, “काल रात्री आम्हा दोघांनाही स्वप्न पडले, पण आम्हाला त्यांचा अर्थ सांगणारा येथे कोणीच नाही.” यावर योसेफ म्हणाला, “स्वप्नांचा उलगडा करून सांगणे हे परमेश्वराकडूनच असते ना? स्वप्नात तुम्ही काय पाहिले ते सांगा.”

  24. मुख्य प्यालेबरदारने आपले स्वप्न योसेफाला सांगितले. तो म्हणाला, “स्वप्नात मी एक द्राक्षवेल पाहिली.

  25. तिला तीन फांद्या होत्या. त्यांना कळ्या व फुले आली आणि लवकरच त्याला पिकलेल्या द्राक्षांचे घोसही लागले.