Skip to content

Consolation Under Affliction बद्दल बायबलमधील वचने

87 वचने · 22 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.

  2. त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेह, मी तुमची स्तुती करेन, जरी तुम्ही माझ्यावर रागावला होता, तरी तुमचा राग दूर झाला आहे आणि तुम्ही माझे सांत्वन केले आहे.

  3. सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, तुमचे परमेश्वर असे म्हणतात.

  4. यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला, आणि तिला असे घोषित करा की, तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे, तिच्या पापाची परतफेड झाली आहे, याहवेहच्या हातातून तिला तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे.

  5. हे आकाशांनो, हर्षगर्जना करा; अगे पृथ्वी, आनंदित हो; अहो पर्वतांनो, गीते वर उचंबळून येऊ द्या! कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे व त्यांच्या पीडितांवर करुणा ते करतील.

  6. तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील आणि तिच्या सर्व ओसाड प्रदेशाकडे दयेने बघतील; ते तिचे वाळवंट एदेन बागेसारखे सुंदर करतील, तिची उजाड ठिकाणे याहवेहच्या बागेसारखी होतील. तिथे आनंद व उल्लास व्यक्त करण्यात येईल. उपकारस्मरण व गीतांचे स्वर तिथे ऐकू येतील.

  7. “मी, तो मीच आहे, जो तुमचे सांत्वन करेल. तुम्ही कोण आहात जे मर्त्य मानवांना भिता, मानवप्राणी, जे केवळ गवताप्रमाणे असतात,

  8. सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी याहवेहने माझा अभिषेक केला आहे. भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी, कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

  9. याहवेहच्या कृपेचे वर्ष आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

  10. कारण तिच्या सांत्वन करणाऱ्या स्तनाने तुमचे संगोपन होऊन तुम्ही तृप्त व्हाल; तान्हेबाळ मनमुरादपणे मातेचे स्तनपान करते, तसे तुम्हीही तिच्या ओसंडून वाहणाऱ्या विपुलतेत आनंद कराल.”

  11. जसे आई तान्ह्या बाळाचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करेन; आणि तुम्ही यरुशलेमाप्रीत्यर्थ सांत्वन पावाल.”

  12. रात्रभर ती अत्यंत रडत असते; तिच्या गालांवरून अश्रू ओघळत आहेत. तिच्या सर्व प्रियकरात तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिचा विश्वासघात केला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.

  13. तरीही त्यातून काही वाचतील; काही पुत्र व कन्या ज्यांना त्यातून बाहेर काढले जाईल. ते तुमच्याजवळ येतील आणि तुम्ही जेव्हा त्यांची वागणूक व त्यांची कृत्ये पाहाल, मी यरुशलेमवर आणलेल्या प्रत्येक अनर्थाविषयी तुम्ही सांत्वन पावाल.

  14. तुम्ही जेव्हा त्यांचे वर्तन व त्यांची कृत्ये पाहाल तेव्हा तुमचे सांत्वन होईल, कारण तुम्ही जाणाल की मी त्यात विनाकारण असे काहीही केले नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  15. “म्हणून तिला मी भुलविणार; तिला रानात घेऊन जाईन आणि तिच्याबरोबर कोमलतेने बोलेन.

  16. तुम्ही जे अन्यायाची क्षमा करतात, आपल्या वतनातील उरलेल्यांची पापे मागे टाकतात त्या तुमच्यासारखा कोण परमेश्वर आहे? तुम्ही सर्वकाळ क्रोध धरीत नाहीत, परंतु दया दाखविण्यात आनंद मानता.

  17. पुन्हा एकदा तुम्ही आम्हावर दया कराल; तुम्ही आमची पापे आपल्या पायाखाली तुडविणार; आणि आमची दुष्कृत्ये समुद्राच्या खोलीत फेकून द्याल.

  18. “आणखी पुढे घोषणा करा: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘माझी नगरे पुन्हा समृद्धीने ओसंडून वाहू लागतील आणि याहवेह पुन्हा सीयोनाचे सांत्वन करतील आणि यरुशलेमची निवड करतील.’ ”

  19. “परमेश्वराचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी प्रभूने माझा अभिषेक केला आहे. कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी, अंधांना दृष्टी देण्यासाठी, त्यांनी मला पाठविले आहे.

  20. “तुमची हृदये अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा; आणि माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवा.

  21. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या अनेक खोल्या आहेत आणि तसे नसते तर, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे असे तुम्हाला सांगितले असते का?

  22. आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील—

  23. सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये राहील.

  24. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन.

  25. शांती मी तुम्हासाठी ठेऊन जातो; माझी शांती मी तुम्हाला देतो. ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका व भिऊ नका.