Araunah बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
जेव्हा यरुशलेमचा नाश करण्यासाठी दूताने आपला हात लांब केला, तेव्हा याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि लोकांचा नाश करणार्या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ होता.
दावीदाने जेव्हा लोकांचा नाश करणार्या दूताला पाहिले, तो याहवेहला म्हणाला, “मी पाप केले आहे; जो मी मेंढपाळ, तो मी चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो.”
त्या दिवशी गाद दावीदाकडे आला आणि त्याला म्हणाला, “जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध.”
तेव्हा गादद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेनुसार दावीद वर गेला.
राजा व त्याची माणसे आपल्याकडे येत आहेत असे जेव्हा अरवनाहने पाहिले, तेव्हा त्याने राजासमोर जाऊन भूमीकडे तोंड करून दंडवत घातले.
अरवनाहने विचारले, “माझे स्वामी आपल्या सेवकाकडे का आले आहेत?” दावीदाने उत्तर दिले, “मी तुझे खळे विकत घेण्यासाठी आलो आहे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन.”
अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामींना मनास येईल ते त्यांनी घ्यावे व अर्पण करावे. हे पाहा होमार्पणासाठी बैल इकडे आहेत आणि लाकडासाठी मळणीची आऊते व बैलाचे जू येथे आहे.
महाराज, अरवनाह हे सर्व राजाला देत आहे.” त्याचप्रमाणे अरवनाह हे सुद्धा म्हणाला, “याहवेह आपले परमेश्वर आपला स्वीकार करो.”
परंतु राजा अरवनाहला म्हणाला, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. फुकट मिळालेले होमार्पण याहवेह माझ्या परमेश्वराला मी अर्पिणार नाही.” म्हणून दावीदाने जात्याचे खळे आणि बैल चांदीचे पन्नास शेकेल देऊन विकत घेतले.
आणि परमेश्वराने आपले दूत पाठवून यरुशलेमचा नाश केला. परंतु दूत जे करणार होता तेव्हा ते पाहून याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि नाश करणार्या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ उभा होता.
दावीदाने वर दृष्टी केली आणि याहवेहच्या दूताला स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या मध्ये यरुशलेमकडे तलवार उगारून उभे असलेले पाहिले, तेव्हा दावीद आणि वडीलजनांनी अंगावर गोणपाटाची वस्त्रे घालून दंडवत घातले.
दावीदाने परमेश्वराला म्हटले, “योद्ध्यांची शिरगणती करण्यासाठी मीच आज्ञा केली होती ना? मी मेंढपाळ असून पाप केले आहे आणि चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो. परंतु तुमच्या या लोकांवर मरी राहू देऊ नका.”
तेव्हा याहवेहच्या दूताने गादला दावीदाला सूचना देण्यास सांगितले की, जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध.
मग याहवेहच्या नावाने गादने जे सांगितले होते त्यानुसार दावीद वर गेला.
आर्णोन गव्हाची मळणी करीत होता, त्याने वळून पाहिले, तर त्याच्या दृष्टीस एक दूत पडला. आर्णोनाचे चार पुत्र सोबत होते, तिथून ते गेले व लपून राहिले.
जेव्हा दावीद जवळ गेला, आर्णोनाने त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्याने खळ्यापासून निघून दावीदासमोर भूमीकडे तोंड करून दंडवत घातले.
दावीद अरवनाहला म्हणाला, “मला तुझे हे खळे दे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन. मला हे विकत दे, मी तुला त्याची संपूर्ण किंमत देईन.”
अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या धनीराजांना मनास येईल ते त्यांनी करावे. पाहा, होमार्पणासाठी मी बैल देईन, लाकडासाठी मळणीची आऊते व धान्यार्पणासाठी गहू, मी हे सर्व तुम्हाला देत आहे.”
परंतु दावीद राजाने अरवनाहला उत्तर दिले, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. जे तुझे आहे, ते मी याहवेहसाठी तसेच घेणार नाही. फुकट मिळालेले होमार्पण मी अर्पिणार नाही.”
मग दावीदाने आर्णोनला जागेबद्दल सोन्याची सहाशे शेकेल दिली.