Skip to content

Intercession बद्दल बायबलमधील वचने

72 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु त्याअगोदरच 14,700 लोक मरण पावले होते. आदल्याच दिवशी कोरहाबरोबर मेलेल्या लोकांव्यतिरिक्त हे आणखी लोक मरण पावले होते.

  2. यानंतर अहरोन मोशेकडे सभामंडपाच्या दाराशी परत आला, कारण पीडा थांबली होती.

  3. म्हणूनच मी याहवेहपुढे चाळीस दिवस व चाळीस रात्र पालथा पडून राहिलो, कारण याहवेह म्हणाले होते की, ते तुमचा नाश करतील.

  4. मी याहवेहला प्रार्थना केली आणि म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, तुमच्या प्रचंड शक्तीने व तुमच्या बलाढ्य हाताने इजिप्त देशातून वाचविलेल्या तुमच्या लोकांचा, तुमच्या वारसांचा संहार करू नका.

  5. तुमचे सेवक अब्राहाम, इसहाक व याकोब यांची आठवण करा. या लोकांचा हट्टीपणा, त्यांच्या दुष्टपणाकडे व त्यांच्या पापाकडे लक्ष देऊ नका.

  6. कारण जर तुम्ही यांचा नाश केला, तर ज्या देशामधून तुम्ही आम्हाला बाहेर आणले ते लोक म्हणतील, ‘वचनदत्त देशात त्यांना नेण्यास त्यांचा याहवेह असमर्थ होता आणि तो त्यांचा द्वेष करीत होता म्हणून त्याने त्यांचा नाश केला व त्यांना ठार मारण्यासाठीच त्याने त्यांना रानात नेले.’

  7. पण हे तुमचे लोक, तुमचे वारसदार आहेत. तुम्हीच त्यांना तुमच्या महान सामर्थ्याने आणि पसरलेल्या बाहूने इजिप्तमधून बाहेर आणले.”

  8. तेव्हा शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएली लोकांना मिस्पाह येथे जमा करा, म्हणजे मी याहवेहकडे तुमच्यासाठी मध्यस्थी करेन.”

  9. जेव्हा ते मिस्पाह येथे एकत्र जमले, तेव्हा त्यांनी पाणी काढले व ते याहवेहसमोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास करून कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” त्यावेळी शमुवेल मिस्पाहमध्ये इस्राएलचा पुढारी म्हणून सेवा करीत होता.

  10. इस्राएली लोक मिस्पाह येथे जमले आहेत, हे जेव्हा पलिष्ट्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले. हे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले.

  11. इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, “याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला पलिष्ट्यांच्या हातातून वाचवावे म्हणून आमच्यासाठी मध्यस्थी करावयाचे थांबवू नको.”

  12. शौल शमुवेलास म्हणाला, “मी पाप केले आहे, मी याहवेहच्या आज्ञेचा व तुमच्या सूचनांचा भंग केला आहे; मला लोकांचे भय वाटले, म्हणून मी त्यांचे म्हणणे ऐकले.

  13. आता मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या पापाची क्षमा करा आणि मी याहवेहची उपासना करावी म्हणून परत माझ्याबरोबर या.”

  14. परंतु शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही. तू याहवेहच्या वचनाचा धिक्कार केला आहे आणि याहवेहनेही तुला इस्राएलचा राजा म्हणून धिक्कारले आहे.”

  15. “कारण ते माझ्यासारखे मानव नाहीत की मी त्यांना उत्तर द्यावे, किंवा न्यायालयात आम्ही समोरासमोर येऊन वाद घालू.

  16. परंतु आमच्यामध्ये जर कोणी मध्यस्थी करणारा असता, कोणी आम्हाला एकत्र आणणारा असता,

  17. म्हणून आता सात बैल व सात मेंढे घेऊन माझा सेवक इय्योब याच्याकडे जा आणि स्वतःसाठी होमबलीचे अर्पण करा. माझा सेवक इय्योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याची प्रार्थना स्वीकारेन व तुमच्या मूर्खतेनुसार तुमच्याशी वागणार नाही. माझा सेवक इय्योब माझ्याबद्दल जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही माझ्याबद्दल बोलला नाही.”

  18. मग एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी याहवेहनी त्यांना सांगितल्याप्रमाणे केले आणि याहवेहने इय्योबाची प्रार्थना मान्य केली.

  19. इय्योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केल्यानंतर, याहवेहने त्याची मालमत्ता पुनर्स्थापित केली आणि त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट त्याला परत दिले

  20. अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत; ते रात्री किंवा दिवसा, असे कधीही स्तब्ध राहणार नाहीत. तू जी याहवेहचा धावा करते, स्वतःला विसावा देऊ नको,

  21. आणि ते यरुशलेमची पुन्हा स्थापना करेपर्यंत व सर्व पृथ्वीवर तिला स्तुतीस योग्य करेपर्यंत, परमेश्वरालाही विसावा घेऊ देऊ नको.

  22. मग सर्व सैन्यप्रमुख म्हणजे कारेहाचा पुत्र योहानान, होशयाहचा पुत्र यजन्याह, व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक

  23. यिर्मयाह संदेष्ट्याकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही सर्व उरलेल्या लोकांसाठी याहवेह, तुझे परमेश्वर यांची प्रार्थना कर. कारण आम्ही पूर्वी पुष्कळ होतो, आता फारच थोडे उरलो आहोत, हे तू पाहतोस.

  24. आम्ही काय करावे, कुठे जावे हे आम्हाला दाखवावे, म्हणून याहवेह, तुझ्या परमेश्वराला विनवणी कर.”

  25. यिर्मयाह संदेष्ट्याने उत्तर दिले, “मी तुमचे ऐकले आहे, मी निश्चितच याहवेह, तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या विनवणीप्रमाणे प्रार्थना करतो; आणि ते काय म्हणतात ते तुम्हाला मी सांगतो, मी तुमच्यापासून काही लपविणार नाही.”