Intercession बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“अहरोन जेव्हा पवित्रस्थानात जाईल, तेव्हा इस्राएलच्या पुत्रांची नावे असलेला निर्णयाचा ऊरपट एक नित्य स्मरण म्हणून आपल्या हृदयावर याहवेहसमोर घेऊन जाईल.
जेव्हा तो याहवेहच्या उपस्थितीत जाईल, तेव्हा अहरोनाने उरीम व थुम्मीम सुद्धा ऊरपटात, आपल्या हृदयावर ठेवून जावे. अशाप्रकारे अहरोनाने नित्यनेमाने इस्राएली लोकांसाठी निर्णय घेणार्या वस्तू आपल्या हृदयावर वाहत याहवेहसमोर यावे.”
याहवेह मोशेला पुन्हा म्हणाले, “मी या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत.
तर आता माझ्या आड येऊ नकोस. माझा राग मी त्यांच्याविरुद्ध भडकवीन आणि मी त्यांचा नाश करेन. मग मी तुला एक मोठे राष्ट्र बनवीन.”
पण याहवेह त्याचे परमेश्वर यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून विनंती करत मोशे म्हणाला, “याहवेह, तुमचे लोक ज्यांना तुम्ही महान सामर्थ्याने आणि बलवान हाताने इजिप्तमधून बाहेर आणले, त्यांच्याविरुद्ध तुमचा राग का पेटावा?
इजिप्तच्या लोकांनी असे का म्हणावे की, याहवेहने त्यांना डोंगरात मारून टाकावे व या पृथ्वीतून नाहीसे करावे अशा दुष्ट हेतूने बाहेर काढले? आपल्या तीव्र कोपापासून माघार घ्या; सौम्य व्हा आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणू नका.
आपले सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल यांची आठवण करा, ज्यांच्याशी आपण स्वतःच्या नावाने शपथ घेतलीः ‘मी तुझे वंशज आकाशातील तार्यांइतके करेन, आणि त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे हा सर्व देश मी त्यांच्या वंशजांना देईन, आणि तो सदासर्वकाळासाठी त्यांचे वतन राहील.’ ”
तेव्हा याहवेहने त्याविषयी अनुताप केला व जी विपत्ती आपल्या लोकांवर आणण्याचे म्हटले होते ती आणली नाही.
अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, “तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे:
“ ‘ “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो;
याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो आणि तुमच्यावर कृपा करो;
याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो, आणि तुम्हाला शांती देवो.” ’
याहवेह मोशेला म्हणाले, “हे लोक कुठवर माझा तिरस्कार करणार? त्यांच्यामध्ये मी केलेले सर्व चमत्कार पाहूनही कुठवर माझ्यावर विश्वास ठेवण्यास ते नकार देतील?
मी त्यांच्यावर पीडा आणून त्यांचा नाश करेन, परंतु मी तुझ्यापासून त्यांच्याहून मोठे व बलवान राष्ट्र करेन.”
मोशे याहवेहला म्हणाला, “मग इजिप्तचे लोक याविषयी ऐकतील! तुम्ही आपल्या सामर्थ्याने या लोकांना त्यांच्यामधून काढून बाहेर आणले आहे.
आणि ते त्या देशात राहणार्यांना याविषयी सांगतील. त्यांनी तर आधी तुमच्याविषयी ऐकले आहे की, तुम्ही याहवेह या लोकांबरोबर आहात, तुमचा मेघस्तंभ त्यांच्यावर असतो आणि याहवेह तुम्ही त्यांना समोरासमोर दिसता आणि तुम्ही दिवसा मेघस्तंभात व रात्री अग्निस्तंभात त्यांच्यापुढे असता.
जर तुम्ही या लोकांपैकी कोणालाही जिवंत न ठेवता मारून टाकले, तर ज्या राष्ट्रांनी तुमच्याविषयी ऐकले आहे ते म्हणतील,
‘याहवेहने या लोकांना शपथ देऊन जो देश देऊ केला होता, त्यात त्यांना नेण्यास याहवेह असमर्थ होते म्हणून त्यांनी लोकांना रानातच मारून टाकले.’
“आता प्रभूचे सामर्थ्य तुम्ही घोषित केल्याप्रमाणेच प्रकट होवो:
‘याहवेह मंदक्रोध, अत्यंत प्रीती करणारे, अन्याय व पापाची क्षमा करणारे आहेत. तरीही ते दोषीला निर्दोष सोडत नाहीत; तर तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततींना देतात.’
आपल्या महान प्रीतीनुसार, जसे इजिप्त सोडले तेव्हापासून आतापर्यंत क्षमा केली, तसेच आताही त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करावी.”
मग याहवेहने उत्तर दिले, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.
नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, “त्वरा कर. एक धुपाटणे घे. वेदीवरील अग्नी त्यावर ठेव. त्यावर धूप टाक आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर. कारण याहवेहचा कोप त्यांच्यावर भडकला आहे आणि पीडा सुरू झाली आहे.”
मोशेने सांगितल्याप्रमाणे अहरोनाने केले. तो लोकांमध्ये पळत गेला, कारण पीडा त्यांच्यामध्ये सुरू झाली होती. त्याने धूप जाळले आणि लोकांसाठी प्रायश्चित्त केले.
मग तो मृतांच्या आणि जिवंतांच्यामध्ये उभा राहिला आणि पीडा थांबली.