God
God चा उल्लेख असलेली वचने
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जसा तुमच्यावर अरिष्ट आणण्याचा व तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला तेव्हा मुळीच करुणा न करण्याचा मी निर्धार केला,
तर आता मी यहूदीया व यरुशलेमचे परत भले करण्याचा निर्धार केला आहे. तुम्ही भिऊ नका.
एकमेकांविरुद्ध दुष्ट कारस्थान करू नका आणि खोटी शपथ घेण्याची आवड धरू नका. मला या सर्वाचा अतिशय तिरस्कार वाटतो,” असे याहवेह जाहीर करतात.
सर्वसमर्थ याहवेहकडून मला वचन आले.
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “चवथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्यातील उपवास आता यहूदीयाच्या घराण्यास आनंदाचा व उल्हासाचा काळ व हर्षोत्सव म्हणून पाळले जातील. म्हणून सत्य व शांती यावर प्रीती करा.”
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जगभरचे लोक व अनेक नगरांमधील रहिवासी येतील,
आणि एका नगरामधील रहिवासी दुसऱ्या नगरात जातील व त्यांना म्हणतील, ‘चला आपण याहवेहला विनंती करू व सर्वसमर्थ याहवेहचा शोध घेऊ. मी स्वतःच जात आहे.’
आणि पुष्कळ लोक आणि बलाढ्य राष्ट्रे देखील यरुशलेमला येतील व सर्वसमर्थ याहवेहकडे विनंती करतील.”
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “त्या दिवसात सर्व राष्ट्रांतील व सर्व भाषिक अशी दहा माणसे एका यहूदीच्या अंगरख्याच्या टोकास पकडून म्हणतील, ‘आम्हाला तुमच्याबरोबर येऊ द्या, कारण परमेश्वर तुम्हासोबत आहेत असे आम्ही ऐकले आहे.’ ”
ही एक भविष्यवाणी आहे: हद्राख देशाविरुद्ध याहवेहचे वचन आले, आणि याचा प्रभाव दिमिष्कवरही पडेल; कारण सर्व लोकांची व इस्राएलच्या सर्व कुळांची दृष्टी याहवेहवर लागलेली आहे;
परंतु प्रभू तिची सर्व संपत्ती हिरावून घेतील आणि तिची समुद्रावरील शक्ती नष्ट करतील, आणि ती अग्नीत भस्म होईल.
मिश्रजातीचे लोक अश्दोदास व्यापून टाकतील, आणि मी पलिष्ट्यांच्या गर्वाचा अंत करेन.
मी त्यांच्या मुखातून रक्त व त्यांच्या दातांमधून अमंगळ अन्न बाहेर काढेन. जे अवशिष्ट लोक राहतील ते आपल्या परमेश्वराचे होतील आणि यहूदीयाच्या कुळात समाविष्ट करण्यात येतील पलिष्टी आणि एक्रोनचे पूर्वी जसे होते तसे हे लोक यबूसी लोकांप्रमाणे होतील.
परंतु लुटारूंच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी मी माझ्या मंदिराभोवती ठाण मांडेन. यापुढे माझ्या लोकांवर कोणीही जुलूम करणारे अधिकार गाजविणार नाहीत, आता मी त्यांच्यावर लक्ष ठेवेन.
मी एफ्राईमचे रथ आणि यरुशलेमचे युद्धाचे अश्व काढून घेईन, आणि युद्धाचे धनुष्य मोडून टाकले जातील. आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल. त्याच्या राज्याचा विस्तार एका समुद्रापासून दुसर्या समुद्रापर्यंत आणि फरात नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत असेल.
तुमच्या बाबत बोलायचे तर, रक्ताने शिक्कामोर्तब करून तुमच्याशी केलेल्या करारामुळे, मी तुमच्या बंदिवानांना निर्जल गर्तेतील मृत्यूपासून सोडविणार आहे.
अहो सर्व सुटकेची आशा करणाऱ्या बंदिवानांनो, तुमच्या गडात परत या; आता मी ही घोषणा करतो की, तुमची दुप्पटीने परतफेड करेन.
यहूदाहास मी असे वाकवेन, जसे माझे धनुष्य वाकवितो आणि एफ्राईमने ते बाणासारखे भरेन. अगे, सीयोना, मी तुझ्या पुत्रांना हे ग्रीस देशा, तुझ्या पुत्रां विरुद्ध प्रोत्साहित करेन, आणि तुला योद्ध्याच्या तलवारीसारखे करेन.
मग याहवेह त्यांच्यावर प्रगट होतील; त्यांचे बाण विजेसारखे चमकतील. सार्वभौम याहवेह रणशिंग फुंकतील; ते दक्षिणेतील वादळातून चालतील,
आणि सर्वसमर्थ याहवेह त्यांचे रक्षण करतील. ते नष्ट करतील, आणि गोफणीच्या दगडांनी विजयी होतील. ते प्राशन करतील व मद्यपीसारखे गर्जना करतील; ते वाटीसारखे ओतप्रोत भरतील आणि वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडण्यासाठी उपयोगात येतील.
त्या दिवशी मेंढपाळ जसा आपल्या मेंढरांना वाचवितो, त्याप्रमाणे याहवेह त्यांचे परमेश्वर त्यांच्या लोकांना वाचवतील. मुकुटामध्ये बसविलेल्या रत्नांप्रमाणे ते त्यांच्या देशात चमकतील.
ते सर्व किती अद्भुत व सुंदर असतील! धान्य तरुणांची आणि नवा द्राक्षारस तरुणींची भरभराट करेल.
“वसंतॠतूमध्ये पाऊस पडावा म्हणून याहवेहस विनंती करा; याहवेहच कडाडणाऱ्या मेघगर्जना पाठवितात. तेच सर्व लोकांवर पावसाचा वर्षाव करतात आणि प्रत्येकाला शेतातील पीक देतात.
“माझा संताप मेंढपाळांविरुद्ध भडकतो, आणि मी पुढार्यांना शिक्षा करेन; कारण आपल्या कळपाची, यहूदीयाच्या लोकांची काळजी सर्वसमर्थ याहवेह करतील, आणि त्यांना युद्धातील कुशल घोड्यांप्रमाणे करतील.
एकत्र ते योद्ध्यांसारखे होतील ते आपले शत्रू रस्त्यातील चिखलात तुडवतील. ते लढतील कारण याहवेह त्यांच्याबरोबर आहेत, आणि ते त्यांच्या शत्रूंच्या घोडेस्वारांना लज्जित करतील.