Parables बद्दल बायबलमधील वचने: Tares
Tares बद्दल वचने
येशूंनी त्यांना दुसरा दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य, आपल्या शेतामध्ये उत्तम प्रतीचे बी पेरणार्या एका मनुष्यासारखे आहे.
पण रात्री सर्व झोपलेले असताना त्याचा शत्रू आला. आणि गव्हामध्ये रानगवताचे बी पेरले, आणि निघून गेला.
पीक वाढू लागले, आणि दाणे आले तसे त्याच्याबरोबर रानगवतही दिसू लागले.
“तेव्हा शेतातील मजूर मालकाकडे आले आणि म्हणाले, ‘महाराज, शेतात तुम्ही उत्तम प्रतीचे बी पेरले होते की नाही? तर मग रानगवत कुठून आले?’
“तेव्हा मालकाने म्हटले, ‘हे शत्रूने केले आहे.’ “मजुरांनी त्याला विचारले, आम्ही ते उपटून टाकावे काय?
“ ‘नाही,’ मालक म्हणाला, ‘तुम्ही रानगवत उपटून काढीत असताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल.
तर हंगामापर्यंत दोघांनाही बरोबरच वाढू द्या. त्यावेळी मी कापणी करणार्यांना सांगेन की पहिल्याने रानगवत गोळा करून ते जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधा, मग गहू गोळा करून माझ्या कोठारात आणा.’ ”
गर्दीला बाहेर सोडून ते घरात गेले, तेव्हा त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “शेतातील रानगवताच्या दाखल्याचा अर्थ आम्हाला स्पष्ट करून सांगा.”
ते म्हणाले, “उत्तम प्रतीचे बी पेरणारा मानवपुत्र आहे.
जग हे शेत आहे आणि चांगले बी हे परमेश्वराच्या राज्याचे लोक आहेत. रानगवत सैतानाच्या लोकांचे प्रतीक आहे.
गव्हामध्ये रानगवताचे बी पेरणारा शत्रू म्हणजे सैतान आहे. हंगाम म्हणजे युगाचा अंत आणि कापणी करणारे म्हणजे देवदूत आहेत.
“जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल.
मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवेल आणि पाप व दुष्टाई करणार्या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढेल.
त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल.
मग नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.