मुख्य मजकुरावर जा

Parables बद्दल बायबलमधील वचने: Rich man and Lazarus

13 वचने · 74 पैलू

Rich man and Lazarus बद्दल वचने

  1. येशू म्हणाले, “कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो दररोज जांभळी आणि सुंदर वस्त्रे परिधान करीत असे आणि चैनीत राहत असे.

  2. त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा भिकारी पडून होता, तो फोडांनी भरलेला होता.

  3. त्या श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून खाली पडलेला चुरा मिळावा या आशेने तो तिथे पडलेला असताना कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.

  4. “अशी वेळ आली की तो भिकारी मरण पावला आणि दूतांनी त्याला अब्राहामाजवळ नेले. श्रीमंत मनुष्यही मरण पावला, तेव्हा त्याला पुरण्यात आले.

  5. आणि त्याचा आत्मा अधोलोकात गेला. तिथे तो यातना भोगीत असताना, तिथून त्याने दूर अंतरावर लाजराला अब्राहामाच्या जवळ असलेले पाहिले.

  6. त्याने त्याला हाक मारली, ‘हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठीव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या अग्निज्वालांमध्ये मी कासावीस झालो आहे.’

  7. “परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘मुला, तुझ्या आयुष्यात तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, पण लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, म्हणून तो आता सांत्वन पावत आहे आणि तू क्लेश भोगीत आहेस.

  8. आणि याव्यतिरिक्त, आमच्या आणि तुमच्यामध्ये एक मोठी दरी स्थापलेली आहे, जे येथून तुझ्याकडे जाण्याची इच्छा करतात ते जाऊ शकत नाहीत किंवा तिथून आम्हापर्यंत ती दरी ओलांडून कोणीही येऊ शकत नाही.’

  9. “तो म्हणाला, ‘मग हे पित्या, मी तुम्हाला विनवितो की, लाजाराला माझ्या कुटुंबाकडे पाठवा.

  10. कारण मला पाच भाऊ आहेत. ते सुद्धा या यातना स्थळी येऊ नयेत, म्हणून त्याने त्यांना सावध करावे.’

  11. “पण अब्राहामाने उत्तर दिले, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे.’

  12. “ ‘हे पित्या अब्राहामा, असे नाही. परंतु मृतातून त्यांच्याकडे कोणी गेले तर, ते पश्चात्ताप करतील.’

  13. “अब्राहाम त्याला म्हणाला, ‘ते मोशे किंवा संदेष्ट्यांचे ऐकत नाहीत, तर मृतातून जिवंत होऊन कोणी गेला, तरी ते निश्चितच ऐकणार नाहीत.’ ”