Skip to content
मत्तय २७:३२-६१

मत्तय २७:३२-६१

३२
ते त्यांना घेऊन क्रूसावर खिळण्याच्या जागेकडे निघाले. वाटेत त्यांना कुरेने गावचा शिमोन नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले.
३३
मग ते गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्‍या जागी आले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा”.
३४
त्या ठिकाणी त्यांना पित्त मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्यांनी तो चाखून पाहिल्यावर घेतला नाही.
३५
येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर त्यांची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.
३६
मग क्रूसावर टांगलेल्या येशूंवर पहारा करीत ते जवळच बसले.
३७
त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला दोषपत्राचा लेख लावण्यात आला होता, त्यावर लिहिले होते: हा येशू, यहूद्यांचा राजा आहे.
३८
त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता.
३९
जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, ते डोकी हालवीत
४०
म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना! जर तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव.”
४१
त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक यांनीही त्यांची थट्टा केली.
४२
ते म्हणाले, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो इस्राएलाचा राजा आहे! मग त्याला क्रूसावरून खाली उतरून येऊ दे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू.
४३
तो परमेश्वरावर भरवसा ठेवतो. मग परमेश्वराची इच्छा असल्यास त्याने त्याची सुटका करावी, कारण तो म्हणाला होता की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे.’ ”
४४
त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्या त्या चोरांनीही त्यांचा अपमान केला.
४५
त्या दिवशी दुपारपासून तीन वाजेपर्यंत सर्व प्रांतावर अंधार पडला.
४६
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एली, एली,लमा सबकतनी,” म्हणजे, “माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”
४७
तिथे उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले की तो, “एलीयाहला बोलावित आहे.”
४८
लागलीच त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन शिरक्यात भिजविलेला एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला,
४९
इतर म्हणाले, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरावयास व तारावयास येतो की काय हे आपण पाहू!”
५०
मग येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारली आणि आपला प्राण सोडला.
५१
त्याच क्षणाला, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, पृथ्वी हादरली, खडक फुटले
५२
आणि कबरा उघडल्या. मृत पावलेल्या अनेक पवित्र लोकांची शरीरे पुन्हा उठविली गेली.
५३
येशूंच्या पुनरुत्थानानंतर ते कबरेच्या बाहेर आले आणि पवित्र शहरात गेले आणि पुष्कळ लोकांनी त्यांना पाहिले.
५४
जेव्हा शताधिपतीने आणि त्याच्याबरोबर येशूंवर पहारा करणारे रोमी शिपायांनी भूकंप आणि घडलेल्या इतर सर्वगोष्टी पाहिल्या, तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले आणि त्यांनी उद्गार काढले, “खरोखरच हा परमेश्वराचा पुत्र होता!”
५५
अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्या गालील प्रांतातून येशूंची सेवा करीत त्यांच्यामागे आल्या होत्या.
५६
त्या स्त्रियांमध्ये मरीया मग्दालिया; याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहानाची आई होती.
५७
संध्याकाळ झाली असताना, येशूंचा अनुयायी झालेला, अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य,
५८
पिलाताकडे गेला व त्याने येशूंचे शरीर मागितले आणि पिलाताने ते त्याला देण्यात यावे अशी आज्ञा दिली.
५९
योसेफाने येशूंचे शरीर घेतले, एका स्वच्छ तागाच्या वस्त्रात गुंडाळले,
६०
आणि खडकात खोदलेल्या आपल्या मालकीच्या एका नव्या कबरेमध्ये ते ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने एक मोठी शिला लोटून ठेवली. नंतर तो तिथून निघून गेला.
६१
मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया या दोघीजणी कबरेसमोर बसल्या होत्या.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options