मत्तय २६:१६-४०
१६
त्या वेळेपासून यहूदाह येशूंना धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
१७
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी?”
१८
येशूंनी उत्तर दिले, “शहरात जा आणि या एका माणसाची भेट घ्या. त्याला सांगा की, ‘गुरुजी म्हणतात: माझी नेमलेली वेळ जवळ आली आहे. मी माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन तुझ्या घरी करेन.’ ”
१९
येशूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केले आणि वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
२०
संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर मेजावर टेकून बसले होते.
२१
आणि ते भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल.”
२२
येशूंचे हे उद्गार ऐकताच शिष्यांची अंतःकरणे दुःखी झाली आणि ते त्यांना विचारू लागले, “प्रभूजी, खरोखर तो मी तर नाही ना?”
२३
येशूंनी उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला आहे तोच माझा विश्वासघात करणार आहे.
२४
कारण त्यांच्याबद्दल लिहिल्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.”
२५
मग जो त्यांना धरून देणारा होता, त्या यहूदाहने येशूंना विचारले, “खरोखर रब्बी, तो मी तर नाही ना?” त्यावर येशूने उत्तर दिले, “तू स्वतःच तसे म्हटले आहेस.”
२६
भोजन करीत असताना, येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागितल्यावर ती मोडली आणि आपल्या शिष्यांना दिली. मग ते म्हणाले, “घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे.”
२७
त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला व म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण यामधून प्या;
२८
हे माझ्या कराराचे रक्त आहे. बहुतांना पापक्षमा मिळावी म्हणून ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे.
२९
मी तुम्हाला सांगतो की, येथून पुढे मी पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”
३०
मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले.
३१
मग येशू शिष्यांना म्हणाले, “आज रात्री तुम्ही सर्वजण मला एकट्याला सोडून पळून जाल, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: “ ‘मी मेंढपाळावर प्रहार करेन, आणि कळपातील मेंढरांची पांगापांग होईल.’
३२
परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.”
३३
यावर पेत्राने त्यांना म्हटले, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही.”
३४
येशू म्हणाले मी तुला निश्चित सांगतो, “आज रात्रीच, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”
३५
परंतु पेत्र जाहीरपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व शिष्यही असेच म्हणाले.
३६
मग येशू आपल्या शिष्यांसोबत गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले आणि येशू त्यांना म्हणाले, “मी तिथे जाऊन प्रार्थना करेपर्यंत येथे बसा.”
३७
मग त्यांनी पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र, याकोब व योहानला बरोबर घेतले आणि ते अस्वस्थ आणि दुःखीकष्टी होऊ लागले.
३८
ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा विव्हळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा.”
३९
मग थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडून त्यांनी प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर करा. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.”
४०
यानंतर ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण ते झोपी गेले आहेत असे त्यांना आढळले. पेत्राला त्यांनी म्हटले, “तुम्ही माणसे एक तासभरही माझ्याबरोबर जागे राहू शकला नाही का?
Settings