Silas बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
मग प्रेषित आणि वडीलजन व सर्व मंडळीने ठरविले की त्यांची काही निवडलेली माणसे अंत्युखियास पौल व बर्णबा यांच्याबरोबर पाठवावीत. त्यांनी यहूदाह ज्याला बारसब्बास असेही म्हणत असत व सीला यांना निवडले. हे दोघे विश्वासणार्यामधील पुढारी होते.
त्यांनी आपल्याबरोबर नेलेल्या पत्राचा मजकूर असा होता: प्रेषित, वडीलजन आणि बंधुवर्ग यांच्याकडून, अंत्युखिया, सिरिया व किलिकिया येथील गैरयहूदी विश्वासणार्यांना: सलाम.
आमच्यामधून काहीजण आमच्या परवानगीशिवाय तिथे येऊन तुम्हाला गोंधळात पाडत आहेत आणि त्यांच्या बोलण्याने तुमची मने विचलित करीत आहेत असे आमच्या ऐकण्यात आले आहे.
तेव्हा आम्ही सर्वांनी ठरविले की आमचे प्रिय बंधू बर्णबा व पौल यांच्याबरोबर काही जणांना निवडून तुमच्याकडे पाठवावे.
या लोकांनी आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी आपले जीव धोक्यात घातले होते.
यास्तव यहूदाह व सीला यांना पाठविले असून ते स्वतः आम्ही लिहिलेल्या या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील.
पवित्र आत्म्याला आणि आम्हाला हेच योग्य वाटले की, ज्या आवश्यक गोष्टींशिवाय तुमच्यावर ओझे टाकले जाऊ नये त्या अशा आहेत:
मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्ताचे सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवावे. या गोष्टी टाळण्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर ते तुमच्या हिताचे होईल. निरोप द्यावा.
ती माणसे तिथून खाली अंत्युखियात आली आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी सर्व मंडळीला एकत्र जमवून ते पत्र त्यांच्याकडे सोपविले.
लोकांनी ते वाचले आणि त्यातील उत्तेजनपर संदेशाने ते आनंदित झाले.
मग यहूदाह आणि सीला, जे स्वतः संदेष्टे होते, त्यांनी विश्वासणार्यांना पुष्कळ गोष्टी बोलण्याद्वारे उत्तेजित करून स्थिरावले.
तिथे काही काळ राहिल्यानंतर, तेथील विश्वासणार्यांनी त्यांना शांतीचा आशीर्वाद देऊन, ज्यांनी त्यांना पाठविले होते त्यांच्याकडे परत पाठविले.
परंतु सीला तिथेच राहिला.
परंतु पौलाने सीलाची निवड केली व त्यासह तो निघाला. विश्वासणार्यांनी त्यांना शाबासकी देऊन प्रभूच्या कृपेवर सोपविले.
तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला.
आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले.
त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, “ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत
आम्ही रोमी लोकांनी जे नियम स्वीकारणे व आचरणे योग्य नाहीत, अशा नियमांची ते वकिली करत आहेत.”
मग पौल व सीलावर हल्ला करण्यात लोकसमूह सामील झाला, तेव्हा न्यायाधीशांनी त्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारण्याचा हुकूम दिला.
त्यांना निष्ठुरपणे पुष्कळ फटके मारल्यानंतर तुरुंगात टाकण्यात आले आणि तुरुंगाच्या पहारेकर्याला त्यांच्यावर बंदोबस्ताने पहारा ठेवण्याचा हुकूम देण्यात आला.
असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले.
मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते.
अचानक तीव्र भूकंपाने तुरुंगाचा पाया डळमळला. एकाएकी तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि सर्व कैद्यांचे साखळदंड मोकळे झाले.
तुरुंगाचा नायक झोपेतून जागा झाला आणि तुरुंगाचे सर्व दरवाजे सताड उघडे पाहून, सर्व कैदी पळून गेलेले असावेत असे समजून तो तलवार उपसून स्वतःला ठार करणार होता.
परंतु पौल ओरडून म्हणाला, “तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!”