God
God चा उल्लेख असलेली वचने
त्यांनी बघितले की कोणीही नाही, कोणीच मध्यस्थी करणारा नाही, हे पाहून ते अस्वस्थ झाले; म्हणून स्वतःच्या भुजेने त्यांनी त्यांच्याप्रीत्यर्थ तारण निर्माण केले, आणि स्वतःच्या नीतिमत्वाने त्यांना आधार दिला.
त्यांनी नीतिमत्वास त्यांचे चिलखत म्हणून चढविले आणि त्यांच्या मस्तकावर तारणाचे शिरस्त्राण घातले; सूडरूपी वस्त्र परिधान केला आवेश हा अंगरखा म्हणून स्वतःला पांघरले.
त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांच्या प्रमाणात ते परतफेड करतील. त्यांच्या शत्रूंचा क्रोध आणि शत्रूंच्या अपराधाबद्दल योग्य शिक्षा देतील; द्वीपांची त्यांच्या कृत्यानुसार ते परतफेड करतील.
पश्चिमेकडील लोक याहवेहच्या नावाचे भय धरतील, आणि सूर्योदयाकडील लोक त्यांच्या वैभवाचा गौरव करतील. ज्याला याहवेहचा श्वास जोराने पुढे नेतो तसे ते कोंडलेल्या महापूरासारखे येतील.
“याकोबातील ज्या लोकांनी आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आहे, सीयोनात त्यांचा उद्धारक येईल,” अशी याहवेह घोषणा करतात.
याहवेह म्हणतात, “माझ्याबाबतीत म्हणाल, तर त्यांच्याशी केलेला हा माझा करार आहे. माझा पवित्र आत्मा जो तुमच्यावर आहे, तो तुमचा त्याग करणार नाही आणि माझे वचन जे मी तुमच्या मुखात घातले आहे, ते सदोदित तुमच्या ओठांवर, तुमच्या संततीच्या ओठांवर आणि त्यांच्या वंशजांच्या ओठांवर; आतापासून आणि सदासर्वकाळ राहील,” असे याहवेह म्हणतात.
“ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि याहवेहचे गौरव तुझ्यावर उदय पावले आहे.
पाहा, काळोख पृथ्वीला आच्छादित आहे, आणि गडद अंधकार लोकांवर येत आहे, परंतु याहवेहचा तुझ्यावर उदय होत आहे, आणि त्यांचे गौरव तुझ्यावर प्रकट होत आहे.
उंटांचे काफिले तुझी भूमी व्यापतील, तरुण उंट मिद्यान व एफाह येथून येतील. आणि सर्व शबातून सोने व ऊद घेऊन तुझ्याकडे येतील. आणि याहवेहच्या स्तुतीची घोषणा केली जाईल.
केदारचे सर्व कळप तुला दिले जातील व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील; ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील, आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन.
निश्चितच द्वीप माझ्याकडे बघतात; सर्वात पुढे तार्शीशची गलबते आहेत, तुझी लेकरे दूरवरून तुझ्याकडे आणत आहेत, त्यांनी आपले चांदी व सोनेही बरोबर आणले आहे, इस्राएलचे पवित्र परमेश्वर याहवेह, आमच्या परमेश्वराला गौरविण्यासाठी त्यांनी तुला ईश्वरदत्त तेजस्विता बहाल केली आहे.
“परदेशी तुझ्या तटबंदीची पुनर्बांधणी करतील, राजे तुझी सेवा करतील. जरी मी माझ्या क्रोधाने तुला फटकारले, तरी आता कृपावंत होऊन मी तुझ्यावर दया करेन.
“लबानोनांचे वैभव तुझ्याकडे येईल, सुरू, देवदारू व भद्रदारू माझे पवित्रस्थान शोभिवंत करतील; आणि माझ्या पावलांचे स्थान गौरवशाली करतील.
तुमच्यावर अत्याचार करणार्यांचे पुत्र येऊन तुला नमन करतील; जे सर्व तुझा तिरस्कार करीत, ते तुझ्या पायावर लोटांगण घालतील. ते तुला याहवेहचे शहर, आणि इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचे सीयोन असे म्हणतील.
“जरी तुझा तिरस्कार व त्याग करण्यात आला होता, तुझ्यामधून कोणीही प्रवास करीत नसत, तरी मी तुला कायमचे अभिमानास्पद स्थान बनवेन, आणि सर्व पिढ्यांकरिता हर्षदायक करेन.
तू अनेक देशांचे दूध प्राशन करशील आणि तुला राजांचे स्तनपान करविण्यात येईल. तेव्हा तुला कळेल कि मी, याहवेह तुझा उद्धारकर्ता मी तुझा तारणारा, याकोबाचा सर्वसमर्थ आहे.
कास्याच्या ऐवजी मी तुझ्यासाठी सोने, तुझ्या लोखंडाच्या ऐवजी चांदी आणेन, लाकडाच्या ऐवजी कास्य, आणि तुझ्या दगडांच्या ऐवजी लोखंड आणेन. शांतता हे तुझ्यावरील अधिकारी, व कल्याण हे तुझ्यावरील शासक नियुक्त करेन.
यापुढे दिवसा सूर्यप्रकाश व चंद्राचे तेज तुझ्यावर पडणार नाही, कारण तुझे याहवेहच तुझा अक्षय प्रकाश होतील व तुझे परमेश्वर तुझा गौरव होतील.
तुझा सूर्य पुन्हा कधीही मावळणार नाही, आणि तुझ्या चंद्राचा कधी ऱ्हास होणार नाही. कारण याहवेहच तुझा सर्वकाळचा प्रकाश असतील; आणि तुझे शोकाचे दिवस संपतील.
मग तुझे सर्व लोक नीतिमान होतील आणि ते त्यांच्या भूमीचे सर्वकाळचे मालक बनतील. कारण ते मी रोपलेली फांदी आहेत, माझा गौरव प्रकट करण्यासाठी माझी हस्तकृती आहेत.
तुमच्यातील सर्वात कनिष्ठ, हजारोंच्या संख्येत बहुगुणित होतील, सर्वात लहान एक बलाढ्य राष्ट्र होईल, मी याहवेह आहे; योग्य त्या समयी, मी हे सर्व वेगाने घडवेन.”
सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी याहवेहने माझा अभिषेक केला आहे. भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी, कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
याहवेहच्या कृपेचे वर्ष आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.
तुम्हाला याहवेहचे याजक म्हणतील तुम्ही आमच्या परमेश्वराचे सेवक म्हणून संबोधले जाल. राष्ट्रांच्या संपत्तीतून तुमचे पोषण होईल, व तुम्ही त्यांच्या समृद्धीचा अभिमान बाळगाल.