मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह, महासागर उसळत आहेत; महासागरांनी त्यांचा स्वर उंच केलेला आहे; समुद्राच्या प्रचंड लाटांचा प्रहार उग्र होत आहे.

  2. सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली, तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात— सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत.

  3. हे याहवेह, तुमच्या आज्ञा अटळ आहेत; पवित्रता हे तुमच्या भवनाचे अनंतकाळचे आभूषण आहे.

  4. या हो या, आपण याहवेहचा जयजयकार करू या; आपल्या तारणाच्या खडकासाठी आनंदाने जयघोष करू या.

  5. कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ; आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.

  6. कारण याहवेह हे महान परमेश्वर आहेत; समस्त दैवतांवर ते सर्वोच्च राजा आहेत.

  7. पृथ्वीची खोल स्थळे त्यांच्या नियंत्रणात आहेत, आणि पर्वताची शिखरेही त्यांचीच आहेत.

  8. समुद्र त्यांचेच आहेत, कारण ते त्यांनी उत्पन्न केले, आणि कोरडी भूमीही त्यांचीच हस्तरचना आहे.

  9. या हो या, आपण नतमस्तक होऊन आराधना करू या, आपले उत्पन्नकर्ता याहवेह, यांच्यापुढे गुडघे टेकू;

  10. कारण ते आपले परमेश्वर आहेत. आपण त्यांच्या कुरणातील प्रजा आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत. आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!

  11. “मरीबाह येथे असताना केली तशी, जसे मस्सा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.

  12. माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही, तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.

  13. चाळीस वर्षे त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘या लोकांची हृदये भटकलेली आहेत आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.’

  14. मग मी रागाने शपथ घेतली की, ‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”

  15. याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा; हे सर्व पृथ्वी, याहवेहला समर्पित गीत गा.

  16. याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा; दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.

  17. सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.

  18. कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे.

  19. इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत. परंतु याहवेहनी आकाशमंडलांची रचना केली आहे.

  20. राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात. त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि महिमा असतो.

  21. अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.

  22. याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या; अर्पणे आणून त्यांच्या समक्षतेत या.

  23. त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा; त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो!

  24. राष्ट्रांमध्ये म्हणा, “याहवेह राज्य करतात.” सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही सर्व लोकांचा ते न्यायीपणाने न्याय करतील.

  25. आकाशे हर्ष करो, पृथ्वी उल्लास करो; सागर व त्यातील सर्वकाही त्यांच्या गौरवाची गर्जना करोत.