मुख्य मजकुरावर जा

Dedication बद्दल बायबलमधील वचने: Temple of Solomon

63 वचने · 28 पैलू

Temple of Solomon बद्दल वचने

  1. तेव्हा शलोमोन राजाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना त्याच्यापुढे येण्यास यरुशलेमास बोलाविले.

  2. इस्राएलचे सर्व लोक एथानीम महिन्यात, म्हणजे सातव्या महिन्यातील सणाच्या काळात शलोमोन राजाकडे एकत्र आले.

  3. जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला,

  4. आणि त्यांनी याहवेहचा कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजक व लेवींनी ती वाहून आणली,

  5. राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचा आणि गुरांचा बळी दिले की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.

  6. नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या नियोजित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला.

  7. करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे आच्छादले जात होते.

  8. ते दांडे इतके लांब होते की, त्यांची टोके आतील खोलीसमोरील पवित्रस्थानातून दिसत असत, परंतु पवित्रस्थानाच्या बाहेरून ती दिसत नसे; आणि ते आजही तिथेच आहेत.

  9. इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर याहवेहने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबमध्ये मोशेने ठेवलेल्या दोन दगडी पाट्यांशिवाय त्या कोशात दुसरे काहीही नव्हते.

  10. जेव्हा याजक पवित्रस्थानातून बाहेर आले, तेव्हा याहवेहचे मंदिर मेघाने भरले.

  11. आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने याहवेहचे मंदिर भरले होते.

  12. तेव्हा शलोमोन म्हणाला, “याहवेहने म्हटले आहे की ते घनदाट मेघात राहतील;

  13. खचितच मी आपणासाठी एक भव्य मंदिर बांधले आहे, की आपण त्यात सर्वकाळ वस्ती करावी.”

  14. इस्राएलची सर्व मंडळी तिथे उभी असताना, राजाने मागे वळून त्यांना आशीर्वाद दिला.

  15. तेव्हा राजाने म्हटले: “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीद, यांना स्वतःच्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की,

  16. ‘मी माझ्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, तेव्हापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, परंतु माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करावे म्हणून मी दावीदाची निवड केली.’

  17. “याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते.

  18. पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले.

  19. तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’

  20. “याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे.

  21. आमच्या पूर्वजांना जेव्हा याहवेहने इजिप्त देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांच्याशी याहवेहने जो करार केला तो ज्यात आहे त्या कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे.”

  22. नंतर शलोमोनने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत याहवेहच्या वेदीसमोर उभे राहून वर स्वर्गाकडे आपले हात पसरले

  23. आणि म्हटले: “हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, वर स्वर्गात किंवा खाली पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात.

  24. आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे.

  25. “आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीद यांना आपण जे वचन दिले होते ते आपण पाळावे, आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर विश्वासूपणे चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही खुंटणार नाही.’