मुख्य मजकुरावर जा

Babylon

255 verses · 3 known names

हे नावानेही ओळखले जाते: Babylon's, Sheshach

32.5300, 44.4200 गूगल नकाशावर पाहा

Babylon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “बाबेलच्या बाहेर पळा; बाबिलोनच्या लोकांच्या भूमीचा त्याग करा, आणि त्या बोकडांसारखे व्हा, जे कळपाचे नेतृत्व करतात.

  2. कारण मी उत्तरेकडील महान राष्ट्रांना एकवटून बाबेलवर हल्ला करण्यास प्रेरित करणार. ते बाबेलवर हल्ला करण्यास सज्ज होतील, आणि उत्तरेकडून तिचा पाडाव होईल. त्यांचे बाण लक्ष्यवेधी योद्ध्यांसारखे असतील ते रिकाम्या हाताने परत जात नसतात.

  3. याहवेहच्या क्रोधामुळे ती आवासित होणार नाही, पण पूर्णपणे ओसाड होईल. आणि तिची अवस्था पाहून बाबेलातून येजा करणार्‍यांना दहशत वाटेल; तिच्या जखमा पाहून ते तिचा उपहास करतील.

  4. “बाबेलच्या सभोवती तिच्याविरुद्ध मोर्चा बांधा, धनुर्धाऱ्यांनो तिच्यावर बाणांचा नेम धरा. तिच्यावर बाण मारा, कोणताही बाण राखून ठेवू नका. कारण तिने याहवेहविरुद्ध पाप केले आहे.

  5. बाबेलच्या शेतकऱ्यांना तिथून काढून टाका, कापणी करणारे आपले विळे घेऊन निघून जावोत. अत्याचाऱ्याच्या तलवारीमुळे प्रत्येकाने आपल्या लोकांकडे परत जावे. प्रत्येकाने आपल्या देशाकडे पलायन करावे.

  6. “इस्राएली लोकांची मेंढराप्रमाणे पांगापांग झाली आहे, सिंहाने पाठलाग करून त्यांना पळविले आहे. प्रथम ज्याने त्यांना गिळंकृत केले तो अश्शूरचा राजा होता; नंतर त्यांच्या हाडांचा चुराडा केला तो बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होता.”

  7. म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: “मी बाबेलच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन, अश्शूरच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन.

  8. कसा मोडणारा व चुराडा करणारा संपूर्ण पृथ्वीतलावरील अत्यंत जबरदस्त असा हा हातोडा! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड बनले आहे!

  9. अगे बाबिलोन, मी तुझ्यासाठी सापळा लावला आणि तुला कळण्या आधीच तू त्यात अडकलीस; तू सापडलीस व पकडण्यात आलीस कारण तू याहवेहस विरोध केला.

  10. बाबेलमधील फरारी व निर्वासित लोक सीयोनात काय म्हणतात ते ऐका याहवेह, आमच्या परमेश्वराने कसा सूड घेतला, त्यांच्या मंदिराबद्दल सूड घेतला. हे याहवेह जाहीर करतात.

  11. “धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा, धनुष्य ताणणाऱ्या सर्वांना बोलवा. नगरीला वेढा घाला; कोणालाही निसटून जाऊ देऊ नका. तिच्या कृत्याची परतफेड करा; तिने इतरांचे जसे केले, तसे तिचे करा. तिने याहवेहला, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला उद्दामपणे तुच्छ लेखले,

  12. परंतु त्यांचे उद्धारकर्ता सामर्थ्यशाली आहेत; सर्वसमर्थ याहवेह असे त्यांचे नाव आहे. ते जोमाने त्यांचा बचाव करतील आणि इस्राएली देशात त्यांना शांतीने राहता यावे, म्हणून ते त्यांच्या भूमीला शांती प्रदान करतील, परंतु, बाबेलच्या लोकांना अशांती मिळेल.

  13. “बाबेलवर तलवारीचा प्रहार होईल! ती बाबेलमध्ये राहणाऱ्या लोकांवर आणि तिच्या अधिपतींवर, सुज्ञ लोकांवरही प्रहार करेल! याहवेह असे जाहीर करतात.

  14. त्यांचे सैनिक धनुष्ये व भाल्यांसहित सज्ज आहेत. ते अत्यंत क्रूर व दयाहीन आहेत. ते घोड्यांवर स्वार झाले असता त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. हे बाबिलोन कन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.

  15. बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे. त्याचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी त्याला ग्रासले आहे.

  16. बाबेलविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. बाबेलच्या लोकांच्या भूमीविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.

  17. बाबेलच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्याचा आक्रोश राष्ट्रांत प्रतिध्वनित होईल.

  18. याहवेहचे म्हणणे हे असे आहे, “बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांवर चाल करून जाण्यास मी एका संहारक आत्म्याला प्रेरित करेन.

  19. त्यांना पाखडण्यात यावे व त्यांच्या भूमीचा विध्वंस व्हावा म्हणून मी बाबेलविरुद्ध विदेशी लोकांना पाठवेन; तिच्या विनाशाच्या दिवशी ते प्रत्येक दिशेने तिच्या विरोधात येतील.

  20. “बाबेलमधून पलायन करा! आपला जीव वाचविण्यास पळा! तिच्या पापांमुळे तुम्ही तुमचा नाश करून घेऊ नका. हा याहवेहचा सूड घेण्याचा समय आहे; ज्यास ती पात्र आहे, त्याचा मोबदला ते तिला देतील.

  21. बाबिलोन याहवेहच्या हातातील सुवर्णपात्र होते; तिने संपूर्ण पृथ्वीला ते पाजून मद्यधुंद केले. सर्व राष्ट्र तिचे मद्य प्याले; म्हणून आता ते वेडे झाले आहेत.

  22. बाबिलोनचे अचानक पतन होईल व ती मोडली जाईल. तिच्यासाठी विलाप करा! तिच्या वेदना जाण्यासाठी औषध आणा; कदाचित ती बरी होऊ शकेल.

  23. “ ‘आम्ही बाबेलला बरे केले असते. पण ती बरी होऊ शकत नाही. आपण तिला सोडून आपल्या देशात परत जाऊ या. कारण तिचा न्याय आता आकाशापर्यंत पोचला आहे, तो स्वर्गाच्या उंचीपर्यंत पोहोचला आहे.’

  24. “बाणांना धार लावा, ढाली उचलून घ्या! याहवेहनी मेदियाच्या राजाला प्रेरित केले आहे, कारण त्यांचा हेतू बाबेलचा नाश करण्याचा आहे. याहवेह बाबेल्यांचा सूड उगवतील, हा त्यांच्या मंदिराबद्दलचा सूड आहे.

  25. बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, दबा धरून बसण्याची तयारी करा! याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील.