मुख्य मजकुरावर जा

इय्योब२४

देव अन्याय सहन का करतो?

“सर्वसमर्थ आपल्या न्यायाचा समय नेमून का ठेवीत नाही? जे त्यांना ओळखतात त्यांनी त्या दिवसांची व्यर्थ वाट का पाहावी?
असे काही लोक आहेत की जे हद्दीच्या खुणा सरकवितात; चोरी करून आणलेले कळप ते चारतात.
अनाथांची गाढवे ते हाकलून लावतात आणि विधवेचा बैल तारण म्हणून ठेवून घेतात.
गरजवंतांना वाटेवरून बाजूला ढकलून देतात देशातील सगळ्या गरिबांना लपून राहण्यास भाग पाडतात.
रानातील रानगाढवां प्रमाणे, गरीब मनुष्य अन्नासाठी कष्ट करीत भटकतात; पडीक जमिनीतून त्यांच्या लेकरांस भोजन पुरवठा होतो.
ते रानातून चारा गोळा करतात आणि दुष्टांच्या द्राक्षमळ्यातून वेचून घेतात.
पुरेशी वस्त्र नसल्याने त्यांना वस्त्रहीनच झोपावे लागते. थंडीत पांघरण्यास देखील त्यांच्याकडे काही नसते.
पर्वतीय वृष्टीने ते ओलेचिंब होतात आणि आश्रय नसल्यामुळे ते खडकांचा आधार घेतात.
पितृहीन बालकांस मातेच्या स्तनापासून ओढून काढले जाते; ऋण फेडून घेण्यासाठी गरिबांची तान्ही बाळे जप्त करतात.
१०
पुरेशी वस्त्र नसल्याने, ते उघडेच असतात; ते धान्याच्या पेंढ्या वाहतात तरी उपाशीच राहतात.
११
आपल्याच आवारात ते जैतुनाचे तेल काढतात; द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवितात, परंतु तहानेने व्याकूळ झालेले असतात.
१२
मरणासन्न असलेल्‍यांचे कण्हणे शहरातून ऐकू येते, आणि घायाळ झालेल्यांचा मदतीसाठी आक्रोश चालू आहे. तरी देखील परमेश्वर कोणालाही दोष देत नाही.

प्रकाशाविरुद्ध बंड करणारे दुष्ट

१३
“काहीजण प्रकाशाविरुद्ध बंड करतात, ज्यांना तो मार्ग अवगत नाही ते त्या मार्गात टिकूनही राहत नाहीत.
१४
दिवस मावळला म्हणजे हत्यारा सज्ज होतो, गरीब आणि गरजवंतांना तो ठार करतो, आणि रात्रीच्या वेळी चोरासारखी चोरी करतो.
१५
व्यभिचार्‍याचा डोळा दिवस मावळण्याची वाट पाहत असतो; तो म्हणतो, ‘मला कोणीही पाहत नाही.’ तो आपला चेहरा झाकून घेतो.
१६
चोर अंधारात घरे फोडतात, परंतु दिवसा ते लपून राहतात; त्यांना प्रकाशाशी काहीही देणे घेणे नको असते.
१७
मध्यरात्र त्या प्रत्येकासाठी सकाळ असते, अंधारातील आतंकाशी त्यांचे सख्य असते.

दुष्टांचा वेगवान व निश्चित न्याय

१८
“तरीही पृथ्वीच्या पाठीवर ते फेसासारखे आहेत; त्यांच्या वाट्याची भूमी इतकी शापित असते, की त्यांच्या द्राक्षमळ्यात कोणीही जात नाही.
१९
जसे उष्णता आणि दुष्काळ वितळलेल्‍या हिमाला शोषून घेते, त्याचप्रमाणे पाप्‍यांची कबर त्यांना ओढून घेते.
२०
त्यांनी जन्म घेतलेले उदर त्यांना विसरते, किडे त्यांचा फडशा पाडतात; दुष्टांची आठवण देखील पुन्हा केली जात नाही आणि वृक्षाप्रमाणे ते मोडले जातात.
२१
पुत्रहीन व वांझ स्त्रीस ते भक्ष करतात, आणि विधवांशी ते दयेने वागत नाहीत.
२२
परंतु परमेश्वर बलवानाला आपल्या सामर्थ्याने राखतात; त्याला जीवनाची खात्री नसली तरी ते स्थिरावतात.
२३
आम्ही सुरक्षित आहोत असे त्यांना वाटू दिले, तरी परमेश्वराची नजर त्यांच्या मार्गावर असते.
२४
त्यांची बढती केवळ क्षणभंगुर आहे आणि ते लवकरच नष्ट होतात; इतरांप्रमाणे ते देखील गळून पडतात; धान्याच्या कणसाप्रमाणे ते कापले जातील.
२५
“जर असे नाही तर, कोण मला खोटे ठरवेल आणि माझे शब्द कोणाला शून्यात जमा करता येतील?”
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options