मुख्य मजकुरावर जा

यशायाह४०

सांत्वन आणि क्षमेचा संदेश

सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, तुमचे परमेश्वर असे म्हणतात.
यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला, आणि तिला असे घोषित करा की, तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे, तिच्या पापाची परतफेड झाली आहे, याहवेहच्या हातातून तिला तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे.

परमेश्वराचा मार्ग तयार करा

बोलविणार्‍याचा आवाज म्हणतो: “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली याहवेहसाठी मार्ग तयार करा; आणि आमच्या परमेश्वरासाठी वाळवंटामध्ये महामार्ग सरळ करा,
प्रत्येक दरी उंच केली जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी खाली केली जाईल; खडबडीत जमीन सपाट होईल, खडकाळ जागा सखल भूप्रदेश करण्यात येईल.
आणि याहवेहचे गौरव प्रगट होईल, आणि सर्व लोक ते एकत्र पाहतील. कारण याहवेहच्या मुखाने हे बोलले आहे.”

देवाच्या वचनाची सनातनता

एक वाणी म्हणाली, “आरोळी द्या.” आणि मी म्हणालो, “मी काय आरोळी देऊ?” “सर्व लोक गवतासारखे आहेत, आणि त्यांचे विश्वासूपण वनातील फुलांसारखे आहे.
गवत सुकते आणि फुले गळून पडतात, कारण याहवेहचा श्वास त्यावर फुंकर घालतो. निश्चितच लोक गवत आहेत.
गवत सुकते आणि फुले गळून पडतात, परंतु आपल्या परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.”

देवाच्या आगमनाची घोषणा करा

तुम्ही जे सीयोनसाठी सुवार्ता आणता, उंच डोंगरावर जा. यरुशलेममध्ये सुवार्ता आणणारे तुम्ही, तुमचा आवाज उंचावून आरोळी द्या, आवाज उंच करा, घाबरू नका; यहूदीयाच्या नगरांना सांगा, “तुमचे परमेश्वर येत आहेत!”
१०
पाहा, सार्वभौम याहवेह सामर्थ्याने येत आहेत, आणि ते बलाढ्य हाताने राज्य करतात. पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याबरोबर आहे, आणि ते देत असलेला मोबदला त्यांच्याबरोबर आहे.
११
ते मेंढपाळाप्रमाणे त्यांच्या कळपाचे संगोपन करतात: ते कोकरांना त्यांच्या कवेत एकत्र करतात आणि आपल्या हृदयाजवळ ठेवतात; जे अजून पिल्ले आहेत, त्यांना ते सौम्यपणाने नेतात.

अतुलनीय निर्माणकर्ता

१२
त्यांच्या ओंजळीत असलेले पाणी कोणी मोजले आहे, किंवा त्यांच्या हाताच्या रुंदीने आकाशात चिन्हे मापली आहेत? पृथ्वीवरील धूळ टोपलीत कोणी ठेवली आहे, किंवा पर्वतांचे वजन तराजूवर कोणी केले आहे आणि कोणी टेकड्या तोलल्या आहेत?
१३
याहवेहचा आत्मा कोण जाणू शकेल, किंवा याहवेहना सल्ला देऊ शकेल असा कोण सल्लागार आहे?
१४
ज्ञान प्राप्त करण्यासाठी याहवेह यांना कोणी सल्ला दिला, आणि त्यांना योग्य मार्ग कोणी शिकवला? असा कोण होता ज्याने त्यांना ज्ञान शिकविले, किंवा कोणी त्यांना समंजसपणाचा मार्ग दाखविला?
१५
राष्ट्रे ही निश्चितच बादलीतील थेंबासारखी आहेत; त्यांना तराजूवर असलेली धूळ समजले जाते; बेटांना ते असे तोलतात, जणू ते धूलिकण आहेत.
१६
लबानोनांच्या विशाल वनाची लाकडे वेदीच्या अग्नीसाठी पुरेशी नाहीत, तसेच होमार्पणासाठी तेथील असंख्य जनावरे सुद्धा पुरेशी नाहीत.
१७
त्यांच्यापुढे सर्व राष्ट्रे काहीच नसल्यासारखी आहेत; ते त्यांना निरुपयोगी असे समजतात. त्यांच्या दृष्टीने शून्यवत आहेत.

मूर्तिपूजेचा मूर्खपणा

१८
तर मग तुम्ही परमेश्वराची तुलना कोणाबरोबर कराल? तुम्ही कोणत्या प्रतिमेला त्यांची उपमा द्याल?
१९
एक धातूकाम करणारा ओतीव मूर्ती तयार करतो, आणि सोनार त्याला सोन्याने मढवितो आणि तिची चांदीच्या साखळ्यांनी सजावट करतो.
२०
गरीब लोक अशा प्रकारचे अर्पण करू शकत नाही सडले जाणार नाही, असे लाकूड ते निवडतात; ती मूर्ती पडणार नाही अशी तिची रचना करण्यासाठी ते एका कुशल कारागिराला शोधतात.
२१
तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? तुम्हाला ते सुरुवातीपासूनच सांगितले नव्हते काय? पृथ्वीची स्थापना होताच तुम्ही ते कधी जाणले नाही काय?
२२
जे पृथ्वीवरील मंडलावर विराजमान होतात, त्यावरील लोक त्यांना टोळांप्रमाणे दिसतात. ते आकाशे एखाद्या आच्छादनाप्रमाणे पसरवितात, आणि तंबूप्रमाणे त्याला फैलावून आपला डेरा तयार करतात.
२३
ते राजपुत्रांना तुच्छतेस आणतात आणि या जगातील राज्यकर्त्यांना शून्यवत करून टाकतात.
२४
लागण करताच, पेरणी करताच, ते जमिनीत मूळ धरू लागते तोच, ते त्यांच्यावर फुंकर घालतात आणि ते कोमेजून जाते, आणि भुशाप्रमाणे वारा ते वाहून नेतो.
२५
“माझी तुलना तुम्ही कोणाशी कराल? माझी बरोबरी करेल असा कोण आहे?” असे पवित्र परमेश्वर विचारतात.
२६
तुमची दृष्टी वर करा व आकाशाकडे पाहा: हे सर्व कोणी निर्माण केले आहे? एकामागून एक असे हे तारांगण कोणी अस्तित्वात आणले आहे, आणि त्यातील प्रत्येकाला ते नावाने हाक मारतात. त्यांच्या थोर सामर्थ्यामुळे व त्यांच्या अमर्याद शक्तीमुळे त्यातील एकही कधी हरवत नाही.

थकलेल्या इस्राएलासाठी आश्वासन

२७
हे याकोबा, तू अशी तक्रार का करतो? हे इस्राएला, असे तू कसे म्हणतोस, “याहवेहपासून माझे मार्ग लपलेले आहेत; माझे परमेश्वर माझ्या संकटाकडे दुर्लक्ष का करतात”?

थकलेल्यांसाठी सामर्थ्य

२८
तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? याहवेहच सनातन परमेश्वर आहेत, पृथ्वीच्या दिगंताचे उत्पन्नकर्ता तेच आहेत. ते कधी थकणार वा कंटाळणार नाहीत, त्यांची आकलन शक्ती अगम्य आहे.

वाट पाहणाऱ्यांसाठी सामर्थ्य

२९
थकलेल्यास ते शक्ती देतात आणि बलहीनाचे सामर्थ्य वाढवितात.
३०
तरुण थकतात व कंटाळतात, तरुण पुरुष देखील ठेचाळतात व पडतात;
३१
पण जे याहवेहवर आशा ठेवतात ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात, ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील; ते धावतील पण दमणार नाहीत, ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options