Unity of God बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
परमेश्वराने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले त्या दिवसापासून आतापर्यंत तुमच्या आधी होऊन गेलेल्या दिवसांना विचारा आणि आकाशाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत विचारा की, अशा प्रकारची महान गोष्ट पूर्वी कधी घडली होती का किंवा अशी गोष्ट कुठे घडल्याचे कोणी कधी ऐकले आहे का?
अग्नीमधून बोलताना परमेश्वराची वाणी कोणी कधी ऐकली, ज्याप्रकारे तुम्ही ऐकली आणि जिवंत राहिले आहेत काय?
कोणत्या दैवताने एका राष्ट्रातून दुसर्या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता भयानक पीडा पाठविल्या, चिन्हे, चमत्कार केले, युद्ध व अद्भुत कृत्ये केली, जसे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने पराक्रमी बाहू आणि उगारलेल्या हाताने चमत्कार केले, असे एक तरी उदाहरण इतरत्र तुम्हाला सापडेल का?
त्यांनी या गोष्टी अशासाठी केल्या की, याहवेहच परमेश्वर आहेत हे तुम्हाला कळून यावे; त्यांच्यासारखा अन्य कोणीही नाही हे देखील समजावे.
वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर याहवेहच परमेश्वर आहेत, हे आजच स्वीकारा आणि तुमच्या अंतःकरणात ठेवा. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही.
आज जे विधी व आज्ञा मी तुम्हाला सांगणार आहे, यांचे तुम्ही पालन केले, तर तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या या देशामध्ये तुम्ही चिरकाल वस्ती कराल.
हे इस्राएला ऐक: याहवेह आपले परमेश्वर एकच याहवेह आहेत.
याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.
“आता पाहा मीच एकमेव आहे तो आहे! माझ्याशिवाय इतर कोणताही ईश्वर नाही. माझ्या आदेशानेच मृत्यू येतो आणि जीवनही मीच प्रदान करतो. मी जखम केली आणि मी ती बरीही करेन, माझ्या हातून सोडविणारा कोणीही नाही.
“हे सार्वभौम याहवेह, तुम्ही किती थोर आहात! तुमच्यासारखा कोणीही नाही, जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार, तुमच्याशिवाय दुसरे कोणी परमेश्वर नाही.
आणि हिज्कीयाहने याहवेहला प्रार्थना केली: “अहो याहवेह इस्राएलांचे परमेश्वर, करुबांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे तुम्ही एकमेव परमेश्वर आहात. स्वर्ग व पृथ्वी तुम्हीच उत्पन्न केली आहे.
“हे याहवेह, तुमच्यासारखे कोणी परमेश्वर नाही. जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार तुमच्याशिवाय कोणीही परमेश्वर नाही.
केवळ तुम्हीच एकटे याहवेह आहात. तुम्ही आकाश, अत्युच्च स्वर्ग व त्यातील सर्व तारकामंडल, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. तुम्ही सर्वांना जीवन देता आणि स्वर्गातील असंख्य सेना तुमची आराधना करतात.
त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.
कारण तुम्ही महान आहात आणि अद्भुत चमत्कार करता; तुम्हीच एकटे परमेश्वर आहात.
“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक, याहवेह असे म्हणतात— मी आदि व अंत आहे. माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही.
भिऊ नका, थरथर कापू नका. मी अशी घोषणा केली नव्हती का व हे फार पूर्वी जाहीर केले नव्हते का? तुम्ही माझे साक्षीदार आहात. माझ्याशिवाय कोणी दुसरा परमेश्वर आहे काय? नाही, माझ्याशिवाय दुसरा खडक नाही; माझ्या माहितीत कोणी नाही.”
“याहवेह असे म्हणतात; तुमचे उद्धारकर्ता, ज्यांनी तुमची गर्भाशयात घडण केली: मी याहवेह आहे, संपूर्ण आकाश मी एकट्याने पसरले, मीच सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता, ज्याने आकाश ताणले, ज्याने स्वतः पृथ्वी पसरविली,
मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही; माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही परमेश्वर नाही. तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला सामर्थ्य देईन.
मग सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सर्व लोकांना कळेल की माझ्याशिवाय दुसरा परमेश्वर नाहीच. मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही;
मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो. मीच कल्याण व अरिष्ट आणतो, या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे.
“अहो वरील आकाशांनो, माझ्या नीतिमत्तेचा पाऊस पडू द्या; मेघ त्यांचा वर्षाव करोत, पृथ्वी पूर्ण रुंदीने उघडून जावो, तारण उसळून वर येवो त्यासह नीतिमत्वाचीही भरभराट होवो; मी, याहवेहने हे निर्माण केले आहे.
याहवेह असे म्हणतात— ज्यांनी आकाशे निर्माण केली तेच परमेश्वर आहेत; ज्यांनी पृथ्वीची निर्मिती केली व घडण केली, ती प्रस्थापित केली; ती ओसाड व निर्जन घडविली नाही, परंतु त्यावर वसतिस्थान व्हावे म्हणून निर्माण केली— ते म्हणतात: “मीच याहवेह आहे. माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.
पुढे काय होणार आहे ते विचारार्थ हजर करा— आपसात विचारविनिमय करा. पुरातन कालातच हे सर्व भविष्य कोणी सांगितले, अत्यंत जुन्या काळी हे कोणी घोषित केले? तो मीच, याहवेह नव्हतो काय? कारण मजवेगळा दुसरा परमेश्वरच नाही, न्यायी परमेश्वर व उद्धारकर्ता माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.
“पृथ्वीच्या सर्व टोकांनो, माझ्याकडे वळा व उद्धार पावा; कारण मीच परमेश्वर आहे, अन्य कोणीही नाही.