Skip to content

Ascension बद्दल बायबलमधील वचने

28 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा याहवेहने एलीयाहला वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. तेव्हा एलीयाह आणि अलीशा गिलगालहून निघाले होते.

  2. एलीयाहने अलीशाला म्हटले, “इथे थांब; याहवेहने मला बेथेलला पाठवले आहे.” परंतु अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ आणि तुमच्या जीविताची शपथ मी आपणास सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे खाली बेथेलला गेले.

  3. तिथे बेथेलातील संदेष्ट्यांचा एक समूह अलीशाकडे आला आणि विचारले, “आज याहवेह तुझ्या स्वामीला तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” अलीशाने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.”

  4. नंतर एलीयाह त्याला म्हणाला, “अलीशा तू येथेच राहा; कारण याहवेह मला यरीहोस पाठवित आहे.” आणि त्याने म्हटले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघेही यरीहोला गेले.

  5. तिथे यरीहोच्या संदेष्ट्यांचा एक समूह अलीशास म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला याहवेह तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.”

  6. मग एलीयाह अलीशास म्हणाला, “तू येथेच राहा; कारण याहवेह मला यार्देनला पाठवित आहेत.” आणि त्याने उत्तर दिले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला सोडणार नाही.” मग ते दोघेही पुढे चालले.

  7. संदेष्ट्यांच्या सभेतील पन्नास लोकांचा समूह त्यांच्याजवळ आला आणि दूर थांबला व जिथे एलीयाह आणि अलीशा यार्देनजवळ थांबले होते, त्या दिशेने तोंड करून उभा राहिला.

  8. तिथे एलीयाहने आपल्या झग्याची घडी केली आणि ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि ते दोघे कोरड्या भूमीवरून चालत पैलतीराला गेले.

  9. ते पार गेल्यावर एलीयाह अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून घेतले जाण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करावे ते मला सांग?” “अलीशाने उत्तर दिले, तुमच्यामध्ये असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”

  10. एलीयाह म्हणाला, “तू एक कठीण गोष्ट मागितली आहेस; तरी देखील जेव्हा तू मला तुझ्यापासून दूर जात असताना पाहिलेस, तर ते तुझे होईल; अन्यथा ते होणार नाही.”

  11. ते एकत्र असे बोलत चालत असताना, अचानक अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे प्रगट झाले आणि त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे केले आणि वावटळीद्वारे एलीयाह स्वर्गात वर घेतला गेला.

  12. अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्याला पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले.

  13. तेव्हा अलीशाने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा उचलला आणि तो यार्देन काठी परत गेला आणि उभा राहिला.

  14. त्याने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा घेतला आणि पाण्यावर मारला. “एलीयाहचा याहवेह परमेश्वर कुठे आहेत?” जेव्हा त्याने झग्याने पाण्यावर मारले तेव्हा पाणी हे उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि अलीशा पैलतीरावर गेला.

  15. यरीहोतील संदेष्ट्यांचा एक समूह, जो हे पाहत होता म्हणाला, “एलीयाहचा आत्मा अलीशावर उतरला आहे.” ते त्याला भेटण्यास गेले आणि भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले.

  16. ते त्याला म्हणाले, “पाहा, तुमच्या सेवकांकडे पन्नास बळकट पुरुष आहेत. त्यांना जाऊ द्या आणि तुमच्या स्वामीचा शोध घेऊ द्या. याहवेहच्या आत्म्याने त्यांना एखाद्या पर्वतशिखरावर, नाहीतर एखाद्या दरीत नेऊन टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नको, त्यांना पाठवू नका.”

  17. परंतु त्यांनी त्याला लाजिरवाणे वाटेपर्यंत आग्रह केला. तेव्हा तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” आणि त्यांनी पन्नास पुरुषांना पाठविले, ज्यांनी त्याचा तीन दिवस शोध घेतला, परंतु ते त्याला शोधू शकले नाही.

  18. जेव्हा ते अलीशाकडे परत आले, तेव्हा अलीशा यरीहोतच होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊ नका असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय?”

  19. प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर, ते स्वर्गात वर घेतले गेले आणि परमेश्वराच्या उजवीकडे बसले.

  20. मग शिष्य सर्वत्र संदेश सांगत फिरले, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होते आणि जी चिन्हे झाली त्यावरून त्यांचे वचन सत्य असल्याची खात्री होत होती.

  21. यानंतर येशूंनी त्यांना बेथानी गावापर्यंत नेले आणि आपले हात वर करून आशीर्वाद दिला.

  22. येशू त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांना सोडून स्वर्गात वर घेतले गेले.

  23. तेव्हा त्यांनी त्यांना नमन केले आणि मोठ्या आनंदाने ते यरुशलेमास परतले

  24. आणि ते मंदिरामध्ये नियमितपणे परमेश्वराची स्तुती करीत राहिले.

  25. असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले.